कामात तांत्रिक बदल करून वाढीव निधी मंजूर करण्याची मागणी-प्राचार्य डी.जी.तांदळेबीड । प्रतिनिधीधानोरा रोडच्या कामात तात्काळ तांत्रिक बदल करून किमान

कामात तांत्रिक बदल करून वाढीव निधी मंजूर करण्याची मागणी-प्राचार्य डी.जी.तांदळे
बीड । प्रतिनिधी
धानोरा रोडच्या कामात तात्काळ तांत्रिक बदल करून किमान 50 फूट रुंदीकरणासह भक्कम व दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच त्यासाठी आवश्यक वाढीव निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेण्यात आली.
यावेळी बीड शहर बचाव मंचाचे प्राचार्य डी. जी. तांदळे यांनी, रस्त्याच्या कामात तांत्रिक बदल करण्याचे व वाढीव निधी मंजूर करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकार्यांकडेच असल्याचे स्पष्ट करत वस्तुस्थिती मांडली. यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित सर्व बाबी तपासून संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळाच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, धानोरा रोड हा बीड शहराला प्रस्तावित नूतन मुख्य रेल्वे स्थानकाशी तसेच अनेक गावे व खेड्यांना जोडणारा महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर नऊ ते दहा शाळा व विद्यालये असून, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे व लोकसंख्येमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर दळणवळण होत आहे. दैनंदिन रहदारीच्या गरजेनुसार धानोरा रोडचे नवनिर्माण भक्कम, दर्जेदार आणि पुरेशा रुंदीकरणासह होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतूनच सुरुवातीपासून किमान 50 फूट रुंदीकरणासह रस्त्याचे काम करण्यात यावे व त्यासाठी आवश्यक वाढीव निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. असे रस्ते निर्माण दीर्घकाळ उपयोगी ठरणार असून भविष्यातील शहरविस्ताराच्या दृष्टीनेही सोयीचे ठरणार असल्याचे मंचाने स्पष्ट केले. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक जनता व बीड शहर बचाव मंचाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये प्राचार्य डी. जी. तांदळे, अध्यक्ष नितीन जायभाये, प्राचार्य राजकुमार कदम, महा एनजीओ फेडरेशनचे बाजीराव ढाकणे, रणरागिनी प्रतिष्ठानच्या आम्रपाली साबळे, पत्रकार-संपादक साहस आदोडे, शिवसेनेचे रतन गुजर, एसडीपीआय पक्षाचे तखियोद्दिन काझी, कलीमभाई फारोकी, डॉ. संजय तांदळे, रामधन जमाले, अॅड. अनिल बारगजे व अॅड. नितीन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS