विडा येथे साधू शिवरामपुरी महाराज पुण्योत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता; भाविकांचा जनसागरकेज । प्रतिनिधीभक्तीचे अनेक प्रकार असले तरी स

विडा येथे साधू शिवरामपुरी महाराज पुण्योत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता; भाविकांचा जनसागर
केज । प्रतिनिधी
भक्तीचे अनेक प्रकार असले तरी सूक्ष्म देहाने श्रीकृष्ण तत्त्वाशी पूर्णतः एकरूप होणे म्हणजे गोपींची भक्ती होय. हीच आदर्श भक्ती असून ज्ञानोत्तर भक्ती करणार्या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था विरहाने व्याकुळ झालेली असते, असे प्रतिपादन ह.भ.प. महंत श्रीराम महाराज विडेकर यांनी केले.
केज तालुक्यातील विडा येथे श्री तपोनिधी साधू शिवरामपुरी महाराज यांच्या पुण्योत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी ते कीर्तनातून बोलत होते. ‘हरी बिन रही न जाये’ अभंगावर भावपूर्ण निरूपण कीर्तनासाठी महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘हरी बिन रही न जाये जिहिरा’ या गवळण प्रकरणातील प्रसिद्ध अभंगाची निवड केली. ईश्वराचा विरह झाल्यावर भक्त ज्या अवस्थेत व्याकुळ होतो, तीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी आणि गोपींची भक्ती हे तिचे जागतिक परिमाण आहे, असे ते म्हणाले. या धार्मिक सोहळ्यास केज मतदारसंघाचे युवा नेते अक्षयजी मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नामवंत महाराज मंडळींचीही या उत्सवाला हजेरी लाभली. अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, रामायण कथा, हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तन असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन ह.भ.प. बाबा महाराज वाघ यांच्या वतीने करण्यात आले होते. रात्री साधू शिवरामपुरी महाराज यांची पालखी मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. अरुण महाराज कदम व पुरुषोत्तम महाराज शास्त्री यांच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी पावले, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळ सादर करून मिरवणुकीत रंगत आणली. आरती व प्रसाद वाटपाने या पवित्र उत्सवाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीमंत भोसले, बळीराम देशमुख, बाबासाहेब पटाईत, काका जाधव, बाळू निर्मळ, दिलीप पटाईत तसेच समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS