नांदेड प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भक्कमपणे पुढे असून महापालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम विश्वास खा.
नांदेड प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भक्कमपणे पुढे असून महापालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम विश्वास खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या रणनीतीचा, सामाजिक समीकरणांचा आणि विकासाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला.
खा.प्रा. चव्हाण म्हणाले की, या निवडणुकीत काँग्रेसने ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाजाला एकत्र आणत व्यापक सामाजिक मोट बांधली आहे. केवळ समीकरणांसाठी नव्हे, तर समावेशक विकासाच्या विचारातून ही बांधणी करण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने अनेक नव्या, तरुण आणि सामान्य पार्श्वभूमीतील चेहर्यांना उमेदवारी देत राजकारणात नवे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. हीच बाब मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे. नांदेड शहराच्या विकासाबाबत बोलताना खा.चव्हाण यांनी सांगितले की, नांदेडमध्ये जे काही ठोस आणि लोकांना दिसणारे विकासकाम झाले आहे, ते महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात झालेले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांत महाविकास आघाडीच्या धोरणांचा लाभ नांदेडकरांना मिळाला. विकासाच्या नावाखाली केवळ जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नांदेडची जनता हुशार आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, विकास कोणी केला, कोण फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो, हे नांदेडकर चांगले ओळखतात. त्यामुळेच यावेळी मतदार भावनांवर नाही, तर वास्तवावर आधारित निर्णय घेतील. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन केलेला संपर्क, घराघरात पोहोचवलेले मुद्दे आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेला भर याचा निवडणुकीत निश्चित फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेतील आगामी कारभाराबाबत बोलताना प्रा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आल्यास महापालिकेचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासकेंद्री राहील. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नांदेड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर आमचा भर असेल. विशेषतः तरुण, महिला, कामगार आणि दुर्लक्षित घटकांसाठी ठोस योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, या निवडणुकीत नांदेडकर काँग्रेसलाच बहुमत देतील आणि महापालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल. खा.प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानामुळे नांदेडच्या राजकीय वातावरणात काँग्रेसचा उत्साह अधिकच वाढला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

COMMENTS