Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी गाढव मोर्चा : अ‍ॅड. राजू भोसले

म्हसवड / वार्ताहर : कोरोना काळात गाढवा सारखे प्रचंड काबाड कष्ट सफाई कर्मचार्‍यांकडून नगरपालिका प्रशासनाने करून घेतले आणि पगार द्यायची वेळ आली कि

शिष्यवृत्ती परीक्षेत सातारच्या ’पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निरंजन तोरडमल महाराष्ट्रात प्रथम
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त
इस्लामपूर येथील 400 कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

म्हसवड / वार्ताहर : कोरोना काळात गाढवा सारखे प्रचंड काबाड कष्ट सफाई कर्मचार्‍यांकडून नगरपालिका प्रशासनाने करून घेतले आणि पगार द्यायची वेळ आली कि प्रशासन गाढवाप्रमाणे गरीब कर्मचार्‍यांना लाथा मारण्याचे काम करत आहे. म्हणूनच नगरपालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांनी मोर्चामध्ये केले.
गरीब सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पीएफ व एक महिन्याचा इतर कंपनीचा पगार मिळण्यासाठी नगरपालिकेवर गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन सिध्दनाथ मंदिरापासून नगरपालिकेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी येऊन गरीब कर्मचार्‍यांच्या आंदोलनास पाठींबा दिल्याबद्दल अ‍ॅड. राजू भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. राजू भोसले यांनी आंदोलन उभारले असताना पक्ष गट-तट विसरून कर्मचार्‍यांच्या हितासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मुख्याधिकार्‍यांना आंदोलक कर्मचार्‍यांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष सूचना केल्या. तसेच दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सलग तीन तास नागपालिकेमध्ये थांबून मुख्याधिकारी व अ‍ॅड. राजू भोसले यांच्या बरोबर चर्चा व समेट घडवून आणून कर्मचार्‍यांना एका दिवसात कंपनीचा पगार देण्याचे नियोजन केले. तसेच कर्मचार्‍यांना पगार, विमा, आरोग्याबाबतचे सर्व साहित्य देण्याबाबत लेखी पत्र मुख्याधिकार्‍यांकडून स्वतः तयार करून घेतले. पगार देण्याचे तसेच सर्व कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात येईल, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थित मुख्याधिकारी यांनी अ‍ॅड. राजू भोसले यांना दिले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस महिला पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अ‍ॅड. पृथ्वीराज उर्फ गोविंदराजे राजेमाने, जय राजेमाने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, काँग्रेस नेते प्रा. विश्‍वंभर बाबर, नगरसेवक विकास गोंजारी, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगराध्यक्ष विजय धट, नगरसेवक अकील काझी, राजेंद्र माने, धर्मराज लोखंडे, प्रमोद लोखंडे, सतीश भोसले, राजकुमार डोंबे या प्रमुख नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांना आपापल्या परीने मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
गाढव मोर्चा वाजत गाजत सिदनाथ मंदिरा पासून छ. शिवाजी चौकपर्यंत आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर मोर्चा म. फुले चौक येथे आला या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर गाढव मोर्चा नगरपालिकेसमोर नेण्यात आला. याठिकाणी घोषणा देऊन मोर्च्याचे रूपांतर ठिय्या आंदोलनात करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, हणमंत लोखंडे, मारुती लोखंडे, रोहित लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS