धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी, काश्मीरमध्ये पर्यटन पुन्हा तेजीतनवी दिल्ली : नव वर्षाच्या स्वागतासाठी बुधवारी पर्यटनस्थळे पुन्हा एकदा हाऊसफुल पाहायला

धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी, काश्मीरमध्ये पर्यटन पुन्हा तेजीत
नवी दिल्ली : नव वर्षाच्या स्वागतासाठी बुधवारी पर्यटनस्थळे पुन्हा एकदा हाऊसफुल पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील पुण्या, मुंबईसह, कोकणातील समुद्रकिनार्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती, तर दुसरीकडे धार्मिक स्थळांवर देखील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांपासून ते हिमालयाच्या कुशीतल्या पर्यटनस्थळांपर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. श्रद्धा आणि पर्यटन यांचा संगम यंदाच्या नववर्षात ठळकपणे अनुभवायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि काशी येथे भक्तांची लाट उसळली आहे. रामलला आणि काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी भाविकांना दोन किलोमीटरहून अधिक लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. अयोध्येतील राम मंदिर, हनुमानगढी परिसर तसेच काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारांवर महाकुंभाची आठवण करून देणारी गर्दी दिसून येत आहे. वृंदावन, बरसाणा आणि मथुरेतील मंदिरांभोवतीच्या गल्ल्यांमध्येही भक्तीमय वातावरण असून प्रसाद, खाद्यपदार्थांच्या दुकानांवरही मोठी वर्दळ आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल लोकात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दहा ते बारा लाख भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थानमधील सीकर येथील खाटूश्यामजी मंदिरातही पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र असून भाविकांना नियोजित वेळेत दर्शन देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जैसलमेरमध्ये गेल्या दशकातील सर्वाधिक पर्यटकांची नोंद झाली असून वाळवंट पर्यटनालाही नवे बळ मिळाले आहे.
दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील पर्यटन नकाशावर काश्मीर पुन्हा एकदा उजळून निघत आहे. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेली भीती आणि अनिश्चितता आता ओसरताना दिसत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुलमर्ग, पहलगाम यांसारख्या हिवाळी पर्यटनस्थळांवरील हॉटेल बुकिंग जवळपास पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचले आहे. संभाव्य हिमवृष्टीमुळे पर्यटकांचा उत्साह अधिकच वाढला आहे. गुलमर्गमधील सर्वच हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेस पूर्णपणे भरले असून सुमारे चार हजार खोल्या आरक्षित झाल्या आहेत. पहलगाममध्येही आठ हजारांहून अधिक खोल्यांपैकी 95 टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग झाले आहे. देशाच्या विविध भागांतून, विशेषतः गुजरातसह पश्चिम भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरकडे येत आहेत. अनेक पर्यटकांनी काश्मीर हे सुरक्षित आणि मनमोहक पर्यटनस्थळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पर्यटन क्षेत्राला यंदा तेजी
हिवाळी पर्यटनाला यंदा लक्षणीय चालना मिळाली असून गुलमर्गला देशाची ‘विंटर स्पोर्ट्स कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे मंदिरांमध्ये भक्तीचा महोत्सव तर दुसरीकडे पर्यटनस्थळांवर आनंदोत्सव-नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात आशा, विश्वास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS