‘आयाराम’ उमेदवारीवरचे भाजपकडून समर्थनमुंबई : महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल

‘आयाराम’ उमेदवारीवरचे भाजपकडून समर्थन
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, आत्मदहन, मंत्र्यांच्या गाडीला काळे फासण्याचे प्रकार घडले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले. निवडणूक जिंकण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून काही ठिकाणी नव्या चेहर्यांना संधी द्यावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले की, नाशिक आणि संभाजीनगरमधील घडामोडी गांभीर्याने घेतल्या असून, कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी पक्षस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जागा मर्यादित असताना इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तणाव निर्माण होतो, हे वास्तव आहे. नाशिकमध्ये 122 जागांसाठी सुमारे 700 अर्ज आले, तर संभाजीनगरमध्येही अर्जांची संख्या मोठी होती. अशा परिस्थितीत सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसते, असे त्यांनी नमूद केले. बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ज्या वॉर्डमध्ये भाजपला आजवर यश मिळालेले नाही, त्या ठिकाणी विजयाची शक्यता वाढवण्यासाठी नव्या उमेदवारांचा विचार करावा लागतो. जिथे पक्षाचा मूळ कार्यकर्ता जिंकू शकतो, तिथे बाहेरच्या उमेदवारांचा प्रयोग करण्यात आलेला नाही. मात्र जिथे कमकुवत स्थिती आहे, तिथे बळकटीकरण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. नाशिक, संभाजीनगरप्रमाणेच इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, त्यांची नोंद पक्षाने घेतली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. उमेदवारी वाटपात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन देत त्यांनी कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. दरम्यान, काही नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आल्याचे सांगत बावनकुळे यांनी पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप- महायुतीला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. डबल इंजिन सरकारच शहरांचा विकास करू शकते, यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात भाजपला भक्कम बहुमत मिळेल आणि 51 टक्क्यांहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.

COMMENTS