पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाची यंदाची सजावट न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा ठळक स
पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाची यंदाची सजावट न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा ठळक संदेश देणारी ठरणार आहे. भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना साकारण्यात आली आहे.
26 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभर ‘घर घर संविधान’ आणि ‘हमारा संविधान, हमारा स्वाभिमान’ या उपक्रमांतर्गत संविधानिक मूल्यांची जनजागृती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 जानेवारी 2026 रोजी होणार्या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाची विशेष सजावट करण्यात येणार आहे. विवेक बनसोडे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मान्यतेने आणि निबंधक विशाल लोंढे यांच्या स्वाक्षरीने ही सजावट साकारली जात आहे. निळ्या फुलांमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र, ‘सत्यमेव जयते’ घोषवाक्यासह अशोकस्तंभ, तसेच भारतीय राष्ट्रध्वज हे सजावटीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. शांततेचे प्रतीक असलेल्या पंचशीलाच्या चौकटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र आणि राष्ट्रीय बोधचिन्ह मांडण्यात येणार असून, खाली न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या संविधानिक मूल्यांचा अनोखा संगम पाहायला मिळेल. तिन्ही बाजूंनी महार रेजिमेंटचा लोगो, तर समोरच्या बाजूस 1927 साली डॉ. आंबेडकरांनी भेट दिलेले ऐतिहासिक तेलचित्र सजावटीत समाविष्ट असेल. कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेरावभाऊ वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे आणि रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही सजावट साकारली जात आहे. यंदाची विजयस्तंभ सजावट राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्यांचा ठाम संदेश देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS