भारत हा विविधतेत एकता असलेला देश असल्याच्या वल्गना किंवा वास्तवता असणाऱ्या या देशाची मानसिकता खऱ्या अर्थाने विषमतेची गंगोत्री आहे. विविधतेत एकता

भारत हा विविधतेत एकता असलेला देश असल्याच्या वल्गना किंवा वास्तवता असणाऱ्या या देशाची मानसिकता खऱ्या अर्थाने विषमतेची गंगोत्री आहे. विविधतेत एकता असल्याचे सांगताना जे थकत नाही, त्याच मानसिकतेने विषमतेची परंपरा कशी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे; हे आता वेगळे सांगायला नको, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काल केंद्र सरकारने केंद्रीय सुट्यांचे दिवस जाहीर केले; यामध्ये १४ सुट्या अनिर्वाय आणि १२ सुट्या या वैकल्पिक आहेत. मात्र, या सुट्यांच्या अनिर्वाय आणि वैकल्पिक अशा दोन्ही प्रकारच्या सुट्यांमध्ये या देशाचे वैचारिक आधारस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, स्मृतीदिनी कोणत्याही प्रकारची अनिर्वाय आणि वैकल्पिक सुटी केंद्र सरकारने घोषित केलेली नाही. याचा अर्थ विविधतेत एकतेचा डांगोरा पिटणाऱ्या शक्ती जाणीवपूर्वक हा प्रयत्न करित आहे. वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ ला राष्ट्रीय सुटी जाहीर करण्याची परंपरा दिवंगत माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारपासून सुरू आहे. मात्र, या सुटीचा देखील केंद्राने जाहीर केलेल्या सुट्यांच्या वेळापत्रकात उल्लेख नाही. ही बाब खोडसाळ या प्रकारातच मोडणारी आहे. ३ एप्रिलला गुड फ्रायडे (अनिवार्य), ५ एप्रिल: ईस्टर रविवार (वैकल्पिक), ३१ मार्चला महावीर जयंती (अनिवार्य) सुट्टी असेल. या एप्रिलमध्ये दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुट्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या या सुट्ट्या सरकारी कार्यालये, बँका आणि शैक्षणिक संस्थांसाठी लागू असतील. प्रत्येक राज्यातील महत्वाच्या सणांप्रमाणे तिथल्या सुट्ट्या बदलत असतात. सरकारकडून वेळोवेळी याबद्दल सुचना जाहीर करण्यात येत असते.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्थात, कर्माचाऱ्यांना अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले असले तरी, महामानवांच्या जयंतीनिमित्त सुट्यांची प्रतिक्षा समाजाला असते.भारतात महामानवांच्या जयंती दिवस साजरे करण्यासाठी खूप आधीच तयारी केली जाते. त्यात समाजातील विविध वर्ग आणि घटकांचा व व्यक्तींचा समावेश असतो.कामाचे दिवस सांभाळून एक दिवस महोत्सव साजरा करण्यासाठी असणारा उत्साहच प्रभावी उत्सव साजरा करू शकतो. अर्थात, देशातील सार्वजनिक सुट्यांविषयी वादविवाद उभी करण्याची खुमखुमी काही उपद्रवी बुध्दिजीवींना असते. मुळातच भारतीय संस्कृती ही उत्सवांची आहे. भारतीय माणूस उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या कमाईचा हिस्सा खर्च करत असतो. उत्सवाला कुटुंबातील सर्व सदस्य आणि नातेवाईकांना कपडेलत्ते, गोडधोड जेवण, याव्यतिरिक्त त्या महोत्सवात आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी खर्च करतो. उत्सवांच्या या परंपरेत सुट्यांचे सांस्कृतिक महत्त्व यानुसार असते. वर्तमान शासन व्यवस्था ही भिन्न वैचारिकता जोपासणारी असली तरी, फुले-शाहू-आंबेडकरी विचार आणि प्रतिक म्हणून टाळता येत नाही आणि येणार नाहीत. त्यामुळे, केंद्राने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकावरून नसता वाद उद्भवू नये, हाच आमचा यामागे उद्देश आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण १४ अनिवार्य (राजपत्रित) सुट्ट्या आणि १२ वैकल्पिक (प्रतिबंधित) सुट्ट्या समाविष्ट आहेत. दिल्ली/नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यालयांसाठी कार्मिक विभागाकडून ३ वैकल्पिक सुट्ट्या निवडल्या जातात, तर इतर ठिकाणी स्थानिक प्रशासन ३ सुट्ट्या ठरवते. कर्मचाऱ्यांना अनिवार्य सुट्ट्यांव्यतिरिक्त २ अतिरिक्त वैकल्पिक सुट्ट्या घेता येतात. राज्यांनुसार काही बदल होऊ शकतात; अशी सूचना करण्यात आली आहे. अर्थात, हे सर्व मान्य करून एक स्पष्टपणे नमूद करायला हवे की, संकुचित विचार बाळगणाऱ्यांनी व्यापक होण्याची गरज आहे. विचारांमधील व्यापकता स्विकारणे हे आपल्या राष्ट्रीय व्यापकतेचे लक्ष्मण असते. हे लक्षण अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. ‘दखल’ नेहमीच सामाजिक व्यापकतेचा दृष्टीकोन लक्षात घेऊन दखल घेत असते. आपणा सर्व वाचकांना या दखल ची दखल म्हणून घ्यावी लागते; हे आम्ही जाणतो.

COMMENTS