काल अनेक दैनिकांमध्ये एका बातमीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. एरव्ही, सर्वसामान्य माणूस ज्या पध्दतीने त्याला राग आल्यावर कृती करतो, काहीशी त्या धा

काल अनेक दैनिकांमध्ये एका बातमीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. एरव्ही, सर्वसामान्य माणूस ज्या पध्दतीने त्याला राग आल्यावर कृती करतो, काहीशी त्या धाटणीची कृती पुणे च्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी केली. झाले असे की, सध्या देशभरात नवरात्र उत्सव सुरू आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम सलग ९ दिवसांसाठी होत आहेत. या गरबा नृत्य कार्यक्रमाच्या मैदानावर जाऊन खासदार मेधाताई यांनी थेट गरबा बंद पाडला. त्यासाठी, जवळच्या नागरिकांना या धांगडधिंगा चा त्रास होत असल्याचे सांगत गरबा बंद पाडून, यापुढे येथे कधीही गरबा कार्यक्रम ठेवला न जाण्याची तंबी दिली. जेष्ठ नागरिकांना हल्ली डीजे आणि एकंदरीत सांस्कृतिक उन्माद यांचा चांगलाच त्रास होऊ लागला आहे. डीजे सारख्या संगीतामुळे तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही, ना शासन संस्था याविरोधात बंदी आणत, ना काही कारवाई करत. म्हणायला आवाजाचे डिसेबल मर्यादित ठेवण्याचे नियम आहेत; पण, या नियमांचे पालन ना नागरिक करित ना यंत्रणा त्याविरुद्ध कठोर पावले उचलते. याचा परिणाम मेधाताई सारख्या खासदार व्यक्तिमत्वाला थेट रस्त्यावर उतरून एकप्रकारे धमकावे लागले. इथपर्यंत सारे ठिक आहे. परंतु, यापूर्वी, गणेश उत्सव आणि दहिहंडी चा उत्सव देखील झाला. या उत्सवादरम्यान देखील ढोल-ताशांचा गजर होताच. पण, याकाळात, मेधाताई आणि त्यांच्या समर्थकांना कोणताही त्रास झाला नाही. याउलट, भारतासारख्या देशातील स्त्री सत्ताक व्यवस्थेचे अंश सांस्कृतिक इतिहासातून संगणाऱ्या नवरात्र उत्सवादरम्यान ताईंना झालेला त्रास अधिक वाटला. पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये नवरात्र हा सांस्कृतिक महोत्सव वेगवेगळ्या प्रकारांनी साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गा नावाच्या देवीच्या पूजेचा हा महोत्सव असतों; तर, गुजरात राज्यात ९ दिवस गरबा नृत्य सादर करून हा कार्यक्रम केला जातो. महाराष्ट्रात मात्र घट स्थापना केली जाते. या स्थापनेत एका परडीत माती घेऊन त्यावर पाणी झिरपणारा मटका ठेवून मातीत काही धान्य पेरले जाते. यातून उगवणारे धान त्या परडीसह नवव्या दिवशी नदीत अर्पण केले जाते. या तिन्ही राज्यातील हा महोत्सव स्त्री शक्तीचे प्रतिक आहे. स्त्री शक्ती म्हणजे भारतातील प्राचीन संस्कृती. या संस्कृतीचे गोडवे आजही भारतात गायले जातात. महाराष्ट्रातील खान्देश या भागात भगत या परंपरेत स्त्री गौरवाच्या ओव्या गायल्या जातात. भगत ही परंपरा आदिम जमातींमधील एक प्रकारची सांस्कृतिक मार्गदर्शक परंपरा आहे. अशा या परंपरेला धांगडधिंगा या नावाखाली बंद पाडणे म्हणजे स्त्री सत्ताक परंपरेला विरोध करण्यासारखे आहे.अर्थात, मेधाताई या स्त्री म्हणून या परंपरेच्या विरोधात नसतीलही; परंतु त्या पुरूषप्रधान व्यवस्थेचा अविभाज्य भाग ठरल्याने, त्यांना काही भूमिका मनाविरुद्ध जाऊन ही घ्याव्या लागत असाव्यात, असं आम्हाला वाटतं. भारतीय समाज व्यवस्था आपल्या सांस्कृतिक परंपरा आजही नेणीवेत जपत असते; त्याचे एक स्पष्ट प्रतिक नवरात्र महोत्सव आहे. स्त्री प्रधान समाज व्यवस्थेत निसर्गाच्या मुळ घटनाक्रमांना किंवा घडामोडींना त्यांच्या प्रतिस्वरूपामध्ये जतन केले जाते. हे प्रतिस्वरूप जर महाराष्ट्राच्या नवरात्र महोत्सवात आपल्याला दिसते. नऊ दिवस धान उगवून त्याला नदीत समर्पित करणे म्हणजे जीवन प्रवाह करण्याचे प्रतिक आहे. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया गर्भधारणेनंतर नऊ महिन्यांनी प्रसूत होतात. शेतीचा हंगाम ही असा पुनरूत्पादनाचा असतो. हेच प्रतिकात्मक पध्दतीने घटस्थापनेच्या माध्यमातून आजही साजरे केले जाते. हे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजेच तंत्र होय. तंत्रशक्ती ही स्त्रीयांची शक्ती म्हणून मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपला दुसरा राज्याभिषेक तंत्र पध्दतीने केल्याचे प्राच्यविद्या पंडितांनी म्हटले आहे. आजचा दुर्गा महोत्सव, गरबा नृत्य आणि घटस्थापना या तिन्ही बाबी एकच आहेत. त्यामुळे, हा सांस्कृतिक इतिहास आता नावालाही उरायला नको म्हणून मेधाताई या अधिक आक्रमक झाल्या आहेत का? असा प्रश्न आमच्या मनात घिरट्या घालत आहे. आम्ही, यानिमित्ताने एवढेच म्हणणार की, मुळ भारतीय संस्कृतीचे निदर्शक असणारे हे महोत्सव निखळपणे सुरू रहावेत; त्यातील नागरिकांना त्रास होणाऱ्या ज्या काही बाबी असतील त्या धांगडधिंगा म्हणून बंद करा. परंतु, धांगडधिंगा चे निमित्त करून हे स्त्री शक्तीचे महोत्सवच बंद करणे, हा जर डाव असेल तर, आम्ही निश्चितपणे त्यास विरोध करू.

COMMENTS