अहिल्यानगर/राशीन सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे तसेच कामात कमिशन मागणे या प्रकरणाविषयी माझा काडीमात्र संबंध नाही. आमदार रोहित पवार यांनी के
अहिल्यानगर/
राशीन सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे तसेच कामात कमिशन मागणे या प्रकरणाविषयी माझा काडीमात्र संबंध नाही. आमदार रोहित पवार यांनी केवळ राजकीय द्वेषातून माझ्यावर पावसाळी अधिवेशनात बिनबुडाचे आरोप केले आहे. आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीची प्रथम मागणी करणारा राजकीय पदाधिकारी मी आहे. त्यावेळी मी त्यांना गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर वाटलो नाही असे प्रतिपादन राशीनचे शहाजी राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पुढे बोलताना शहाजी राजेभोसले म्हणाले की, मी आज विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्यासोबत काम करीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी राम शिंदे यांचा प्रचार केला व केवळ राम शिंदे यांच्यासोबत असल्यामुळेच रोहित पवार यांना त्याचा राग मनामध्ये धरून कालच्या घटनेत माझा काही संबंध नसताना केवळ राजकीय द्वेष पुढे आणून माझी राजकीय कारकीर्द बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात केला. त्यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात औचित्य मुद्द्यात खंडनीखोर आणि गुंड प्रवृत्तीचा उल्लेख केला.
वास्तविक पाहता त्यांच्या आमदारकीच्या उदयास याच शहाजी राजेभोसले यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती याचा विसर त्यांना पडला असावा. त्यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप केला. ज्या व्यक्तीने माझ्यावर खोटी फिर्याद दाखल केली तो कंपनीचा वाहनचालक आहे. वाहन चालकांकडे १५ कोटी रुपये खंडणी कोणी मागू शकतो का ? याची शहानिशा आमदार पवारांनी प्रथम करून नंतर सभागृहात बोलायला हवे होते.
केवळ राजकीय आकासापोटी त्यांनी शहाजी राजेभोसले यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला. आणि माझी स्वतासह विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. माझ्यावर सदरचा खोटा गुन्हा दाखल असताना आमदार पवारांनी केवळ राजकीय हेतू पुढे आणत बीड प्रकरणाशी त्याची तुलना करून खुनशी राजकारण करण्याचा डाव टाकत आहे. माझ्या जागेत काम सुरू असताना आम्हीच ते काम कसे बंद पाडू याची जाणीव आमदार पवारांना नसणे याचे दुर्दैव वाटते.
अधिकाऱ्यांने याबाबत खुलासा करावा असे आव्हान देखील शहाजी राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांना उद्देशून केले.


COMMENTS