एचआरसीटी माहिती लपवल्याने नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एचआरसीटी माहिती लपवल्याने नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढ

एखाद्या रुग्णाची एचआरसीटी तपासणी केली व त्यात कोविड लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यासाठी त्या व्यक्तीची माहिती महापालिकेला कळवणे बंधनकारक असताना

जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप
दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गावठी कट्ट्यासह पकडली

अहमदनगर/प्रतिनिधी- एखाद्या रुग्णाची एचआरसीटी तपासणी केली व त्यात कोविड लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यासाठी त्या व्यक्तीची माहिती महापालिकेला कळवणे बंधनकारक असताना शहरातील अनेक डायग्नोसीस सेंटर्सने (लॅब) ही माहिती मनपाला कळवलेली नाही व मनपा प्रशासनानेही अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. दोन्हीकडून माहिती लपवण्याच्या या प्रकारामुळे शहरात कोरोना रुग्णवाढ झाल्याचा दावा येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला असून, तशी तक्रार त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली आहे. तसेच मनपा व डायग्नोस्टिक सेंटर्सवर कायदेशीर कारवाईची मागणीही केली आहे.  

या तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे की, कोविड-19 ची आरटीपीसीआर-अँटीजन चाचणी प्रयोगशाळेद्वारे केल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यास साधारण 4 ते 5 दिवस लागत असल्याने रुग्णावरील उपचाराला विलंब होतो. त्यामुळे तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून अनेक वैद्यकिय तज्ञांद्वारे रुग्णांची हाय रिझोल्यूशन कॉप्युटराईज्ड टोमोग्राफी (एच.आर.सी.टी.) करण्याचा आग्रह केला जात आहे. पण, एच.आर.सी.टी. करीत असताना आरोग्य विभागाद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत की, अन्य बर्‍याच आजारामध्ये कोविड-19 सदृश बाबी एच.आर.सी.टी.मध्ये दिसल्यामुळे चुकीचे निदान होऊन रुग्णास आवश्यक नसताना कोविड-19 चे उपचार दिले जातात. त्यामुळे केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 निदान निश्‍चितीसाठी आरटीपीसीआर-कोविड अँटीजेन प्रयोगशाळा चाचणी अहवाल सकारात्मक असणे आवश्यक आहे. पण एच.आर.सी.टी.द्वारे निदान केल्यानंतर प्रयोगशाळा चाचणी न केल्यामुळे कोविड-19 चा प्रसार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एच.आर.सी.टी. द्वारे कोविड-19 निदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावे, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता याची माहिती संबंधित निदान केंद्र (डायग्नोसीस सेंटर) यांनी स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे, परंतु नगरमधील अनेक डायग्नोसीस केंद्रांनी त्यांच्याकडे झालेल्या एचआरसीटी तपासणीची माहिती महापालिकेस सादर केलेली नाही तसेच महापालिकेनेही अशा माहिती संकलनासाठी स्वतंत्र कक्ष तयार केलेला नाही, असा दावा शेख यांनी या तक्रारीत केला आहे.

मशीनचेही होत नाही निर्जंतुकीकरण

मनपाने डायग्नोसीक सेंटरकडून माहिती घेऊन कोविड 19 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून व त्यांची कोविड-19 चाचणी करून कार्यवाही करणे आवश्यक असताना आजपर्यंत अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचे परिणाम मोठ्या संख्येने रुग्ण दगावले आहेत. तसेच डायग्नोसीससेंटरकडे एच.आर.सी.टी. करण्यासाठी आलेल्या रुग्णांचे निदान करण्यापूर्वी संबंधित सीटी स्कॅनिंग मशीन निर्जंतुकीकरण करून घेऊन मगच रुग्णाची तपासणी करणे आवश्यक असताना अशी प्रक्रिया होत नसल्याने अनेक व्यक्ती करोना रुग्ण नसतानाही त्या कारणामुळे त्यांना अन्य रुग्णांकडून लागण होण्याची शक्यता आहे. तसेच डायग्नोसीस सेंटरमध्ये रेडिओलॉजिस्ट उपस्थित असणे आवश्यक असताना एकाच व्यक्तीच्या नावाने 2-3 रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनिंग मशीनचा कारभार पाहिला जात आहे. अनेक केंद्रावर टेक्नीशियनच काम पाहात आहे. एच.आर.सी.टी. करुन ऑनलाईन रेडिओलॉजिस्टला माहिती कळविली जाते व त्यानंतर अहवाल तयार करुन स्कॅन केलेल्या स्वाक्षरीने अहवाल दिला जात आहे. हा प्रकार धक्कादायक व रुग्णांच्या जीवाशी खेळणारा आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने प्रयोगशाळावाल्यांना चाचणी अहवाल देताना मूळ स्वाक्षरी करून अहवाल देणे अभिप्रेत केले आहे. मात्र, त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन सर्रासपणे स्कॅन केलेल्या स्वाक्षरीने अहवाल मिळत आहे. त्यामुळे या मुद्यांची दखल घेऊन अहमदनगर महापालिका हद्दीतील सर्व डायग्नोसीस सेंटरविरोधात त्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे कारवाई करण्यात यावी तसेच अहमदनगर महापालिका आयुक्त व वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनीही यासंदर्भातील अधिसूचनेचे अनुपालन करुन अंमलबजावणी करणे बंधनकारक असताना आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

COMMENTS