पंतप्रधानांना भावली हिवरेबाजारची कोरोनामुक्ती गाथा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधानांना भावली हिवरेबाजारची कोरोनामुक्ती गाथा

नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने कोरोनावर कशी मात केली, याची यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावली.

प्रहारचा मराठा आरक्षण आमरण उपोषणाला पाठिंबा
१०० सेकंदात १५ ठळक बातम्या | सुपरफास्ट महाराष्ट्र | Marathi News | LokNews24
जो निर्णय घ्यायचा तो चोंडीत अहिल्याचरणी घ्या : बाळासाहेब दोडतले

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने कोरोनावर कशी मात केली, याची यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावली. गुरुवारी त्यांनी देशातील 60 जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला व यावेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्यासह देशभरातील जिल्हाधिकार्‍यांना हिवरे बाजारने कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची व त्यातून मिळालेल्या यशाची माहिती दिली. या माहितीची दखल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा व केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतली. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यांतील 60 जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या या उपक्रमांची माहिती मोदींनी समजून घेतली तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणार्‍या सर्व अधिकार्‍यांच्या प्रयत्नांची आणि अनुभवाची शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, असेही सुचवले. तसेच जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे, तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मोदी यांनी यावेळी केल्या. तिसर्‍या लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सिजन मास्क तयार ठेवावेत, कोरोनामुक्तीसाठी जनजागृती वाढवून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी अशा काही सूचनाही यावेळी केल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय,  पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी सहभागी झाले होते. या साठ जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हयांचे जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. त्यात अहमदनगरसह बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, बीड, परभणी, सांगली, अमरावती, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांचा समावेश होता.

हिवरेबाजारचे प्रयत्न पोहोचले देशात

नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने कोरोनातून मिळवलेल्या मुक्तीचे प्रयत्न यानिमित्ताने देशभरात पोहोचले. या गावात आरोग्य  व स्वयंसेवकाची चार पथके स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला गेला. कोरोना लक्षण आढळणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या पथकांनी घेऊन रुग्णांना गावातीलट संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दूधदुभत्याच्या कामाचे काय होणार, ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता, तेही या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच कोरोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती नगरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न आदर्शगाव योजना कार्यसमितीचे अध्यक्ष व गावचे उपसरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.

त्या मोहिमेचीही मदत

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी अभियानाची नगर जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी खूप मदत झाल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले की,  या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत प्रशासनाला पोहोचता आले, त्यातून कोरोनासह अन्य व्याधी असलेल्या लोकांची माहिती मिळाली. त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करणे शक्य झाले. करोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवताना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू केलेल्या माझा डॉक्टर उपक्रमातून राज्यभरातील डॉक्टरांना राज्य टास्कफोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असल्याची माहितीही डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक कामाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन त्यावर समाधान व्यक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले व ते करत असलेले कौतुकास्पद काम यापुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले.

COMMENTS