बोठेला मदत  करणार्‍या नऊजणांच्या चौकशीतून आणखी तीन नावे निष्पन्न

Homeअहमदनगर

बोठेला मदत करणार्‍या नऊजणांच्या चौकशीतून आणखी तीन नावे निष्पन्न

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज.

माझ्या विजयात थोरातांची श्रीकृष्णाची भूमिका ः खा. लंके
EXCLUSIVE: रेखा जरे हत्याकांडातील फिर्यादीचे वकील पटेकर यांची स्फोटक मुलाखत ; 750 पानांच्या चार्जशीटमध्ये दडलंय काय ?
राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला मदत करणार्‍या नऊजणांची चौकशी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या नऊजणांच्या चौकशीमध्ये त्यांच्याकडून बोठेला मदत करणार्‍यांमधील अन्य काही नावे स्पष्ट झाल्याने त्यांचीही आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. यामध्ये तीन नाने असून, यातील एकजण वैद्यकीय क्षेत्रातील व इतर दोन प्रतिष्ठित व्यक्तीचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया होऊन तो आता न्यायालयीन कोठडीत पारनेर पोलिसांच्या कारागृहात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला आहे. पोलिस आता बोठे फरार असतानाच्या काळात त्याला मदत करणारे तसेच विविध कारणाने त्याच्याशी संबंधित असलेल्यांना बोलावून चौकशी करीत आहेत. मागील आठवड्यात चार जणांची अशी चौकशी झाली होती व आता दोन दिवसांपूर्वी उर्वरित पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी नऊजणांची चौकशी केली आहे व त्यांच्या चौकशीमध्ये अन्य काही नावेसुद्धा पुढे आली आहेत. यामध्ये एक वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे समजते तसेच अन्य दोन प्रतिष्ठित व्यक्तींचासुद्धा यामध्ये समावेश आहे. या तिघांना आता पोलिसांनी बोलावणे धाडले आहे व त्यांच्या चौकशीतून त्यांनी बोठेला कशी व कोठे मदत केली तसेच त्यांचे व बोठेचे संबंध कसे होते, यासह अन्य अनुषंगिक बाबींची माहिती घेतली जाणार आहे. या तिघांच्या चौकशीत बोठेला मदत करणारांची आणखी काही नावे समोर येतात काय, हेही पोलिसांकडून तपासले जाणार आहे.

रेल्वेकडून मागवली माहिती

जरे यांच्या खुनानंतर बोठे हा तीन महिन्यापासून फरार होता. त्यावेळी तो कुठे राहिला, कसा राहिला याचा पोलिसांनी शोध घेतलेला असून, त्याचाही तपास पूर्ण केला आहे. तसेच या काळात तो नगरच्या रेल्वेस्थानकावर आठ दिवस थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडूनही माहिती घेण्यात आली आहे. 3 ते 10 डिसेंबरच्या काळातील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांची अडचण झाली आहे. पण याच विषयाच्या अनुषंगाने अन्य काही माहिती रेल्वे प्रशासनाकडे असेल तर ती देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्याची माहिती पुढील आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच ज्या वेळेला बोठे फरार होता, त्या वेळेस तो कोणा-कोणाच्या संपर्कात होता. तसेच त्याच्या जवळचे कोण-कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांचे जवाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. आता यात नवीन नावेही समोर आली असून, काही महत्त्वाची माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती लागली असल्याचे सूत्रांकडून समजले.

त्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा

बोठे याचा जप्त केलेला आयफोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच बरोबर इतर आरोपींकडून जप्त केलेले मोबाईलही फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले गेले आहे. पण त्यांच्या तपासणीची माहितीही अद्यापपर्यंत जिल्हा पोलिसांकडे आलेली नाही. तो अहवाल आल्यानंतर अनेक बाबी उजेडात येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS