छाया - विजय भागवत गोंदवले / प्रतिनिधी : सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे मागील आठवड्यापासून सातारा, सांगली, सोलापूर विशेषत माण तालुक्याच्या सी
गोंदवले / प्रतिनिधी : सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे मागील आठवड्यापासून सातारा, सांगली, सोलापूर विशेषत माण तालुक्याच्या सीमेवर असणार्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. 148 वर्षापूर्वी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी मातीनिर्मित बांधलेल्या या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे.
स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत माण देशात दुष्काळाचे सावट ओढवल्यामुळे ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी त्या काळातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच भविष्यात दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून माणगंगा नदीवर राजेवाडी तलावाची निर्मिती केली. राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1876 मध्ये उभारणी सुरुवात केलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पाचे बांधकाम 1885 मध्ये पूर्ण झाल्याची नोंद आहे. सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देते. 148 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक सौदर्याचे महत्त्व जाणले होते. परंतू, स्वतंत्र भारतातील शासन आणि सध्याचे शासनाने या परिसराला कायम दुर्लक्षित केल्याचे दिसून येते. जलसाठा आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते
ब्रिटिशकाळातील राजेवाडी तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकर्यांसाठी हा तलाव उपयुक्तच आहे. पण, शासनाने लक्ष दिल्यास सिंचन व्याप्ती पुन्हा वाढेल. त्यासाठी हा तलाव कायमस्वरूपी भरून ठेवला तर शेतकर्यांसहित नव्याने सुरु होणार्या बंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (बीएमआयसी) साठी उपयुक्त ठरेल.
कोणत्याही सुविधा नसताना पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे राजेवाडी तलावाच्या निसर्ग सौंदर्याचेच प्रतीक आहे. जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन स्थळाच्या तुलनेत या तलावाचे सौंदर्य व वेगळेपणा नजरेत भरतो. तलावाच्या परिसराला विकसित करण्यासाठी शासनाने पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकरी सक्षम होतील
राजेवाडी तलावांतर्गत देवापुर, पळसावडे, हिंगणी, ढोकमोड व परिसरातील क्षेत्र लाभक्षेत्रात येते. इथल्या नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून हा ब्रिटिशकालीन तलाव कायमस्वरूपी भरून ठेवला तर इथल्या शेतकर्यांच्या शेतीवर आधारित शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळून शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास रोजगार संधी निर्माण होऊ शकतात. देश-विदेशतील पक्षांचे या तलावावर होणारे स्थलांतरण अभ्यासाचा विषय आहे. परिसरातील वन्यप्राणी हे सुध्दा पर्यटनाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात. या तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे येवून परिसराचा विकास करावा. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल, असा आशावाद पर्यटकांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS