शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण 82.51 टक्के भरले आहे. परिणामी आज मंगळवारी दुपारी 12 वाजता धरणाचे दोन वक्राकार
शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरण 82.51 टक्के भरले आहे. परिणामी आज मंगळवारी दुपारी 12 वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उचलण्यात आले आहे. यातून 2152 क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून 1648 कयुसेक्स असा एकूण 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. सलग पाच दिवस अतिवृष्टी झाल्याने आठवडाभरात जवळजवळ 8 टीएमसी पाण्याची धरणांमध्ये आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढून धरणाने सांडवा पातळी ओलांडली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे आज मंगळवारी धरणाचे दोन दरवाजे 1 मीटरने उघडून 2152 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्या टप्प्याने हा विसर्ग अजूनही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशाराही धरण प्रशासनाने दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली हे आशिया खंडतील दोन नंबरचे मातीचे धरण आहे. 34.40 टीएमसी या धरणाची पाणी साठवण क्षमता असून दर वर्षी हे धरण शंभर टक्के भरते. येथील पावसाचे प्रमाण हे तीन ते साडेचार हजार मिलिमीटरच्या दरम्यान आहे. याच धरणाच्या पाण्यावर महापारेषणचा सोळा मेगावॅट विद्युत क्षमतेचा तर चार मेगावॅट वीज निर्मिती महती कंपनीचा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे चांदोलीतून 16 मेगावाट वीज निर्मिती होते. पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने धरणांमध्ये 82.51 टक्के पाणीसाठा झाला. सध्याही पावसाचा जोर कायम असून लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची आशा आहे.
सध्या धरणाची पाणी पातळी 620.60 मीटर असून धरणात 28.39 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या 24 तासात 110 मिलीमीटर पावसासह आज अखेर 1755 मिलीमीटर पाऊस येथे पडला आहे तर धरणात 17153 कयुसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
COMMENTS