घरवापसी!

Homeसंपादकीय

घरवापसी!

राजकारणात काही मिळण्याची शक्यता नसली किंवा संबंधित पक्षात राहून विजयाची खात्री नसली, की नेते पक्षांतर करतात.

नबावावरून बेबनाव
एसटी संप आणि त्यातील बरेच काही…
अध्यक्ष पदासाठी कॅंग्रेसचे ओबीसी कार्ड !

राजकारणात काही मिळण्याची शक्यता नसली किंवा संबंधित पक्षात राहून विजयाची खात्री नसली, की नेते पक्षांतर करतात. बुडत्या जहाजात कशाला बसायचे, अशी अनेकांची भावना झालेली असते. त्यामुळे चलती की नाम गाडी या प्रमाणे ज्याच्या विजयाची जास्त खात्री, त्या पक्षाकडे धाव अशी राजकीय नेत्यांची संस्कृती असते. पक्षांतर करणार्‍यांनी काही काळ तरी नव्या घरोब्याशी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा असते; परंतु अलीकडच्या काळात सत्ता हेच जणू बाळकडू असते. सत्तेविना नेत्यांची तडफड होत असते. 

    पश्‍चिम बंगालमध्येही सध्या पक्षांतर केलेले दिल्या घरी सुखी राहायला तयार नाहीत. निवडणुकीअगोदर पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची सत्ता जणू आता संपलीच आणि भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळाल्याच असे गृहीत धरून उंदरासारख्या उडया मारणार्‍यांची जणू स्पर्धा लागली होती. तृणमूल काँग्रेसमधून सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय यांच्यासह सुमारे पन्नास नेत्यांनी भाजपत उडया घेतल्या. या सर्वांना आपण निवडून येऊ, असा आत्मविश्‍वास होता. भाजपची सत्ता आली, तर किमान काही पदे मिळतील, तरी असे वाटले होते. निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे 50 हून अधिक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता त्यांच्यापैकी बर्‍याच जणांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतायचे आहे. मुकुल रॉय आणि राजीब बॅनर्जी यांच्यासारख्या मोठ्या नावांचा दावाही केला जात आहेे. रॉय हे सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. तृणमूल काँग्रेस सोडणार्‍या ते पहिल्या मोठ्या नेत्यांपैकी एक होते. 2018 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपचा विजय मिळविण्यात रॉय यांचा मोठा वाटा होता. या वेळी त्यांनी कृष्णानगर उत्तर जागेवरुन निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतू शकतात, अशी चर्चा सुरू आहे; पण भाजपचे प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी याचा इन्कार केला आहे. रॉय आणि राजीब बॅनर्जीबद्दल सध्या अफवा आहेत, असे भट्टाचार्य म्हणतात. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. भट्टाचार्य काहीही म्हणत असले, तरी मुकुल रॉय यांचा मुलगा सुभ्रंशू रॉय यांनी त्यांच्याफेसबुक पेजवर भाजपलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. लोकांनी निवडलेल्या सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्मनिरीक्षण करणे चांगले, असे त्यांनी म्हटल्यानंतर मुकुल रॉय यांच्या या पोस्टनंतर ते आपल्या वडीलांसोबत तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भट्टाचार्य म्हणतात, की रॉय यांनी हे उत्कटतेने लिहिले. ते पक्ष सोडणार नाहीत.सुभ्रंशू यांना विजापूर येथून भाजपने तिकीट दिले, तेथे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांत तृणमूल काँग्रेसच्या 34 आमदारांचाही समावेश होता. त्यापैकी 13 जणांनाच भाजपने उमेदवारी दिली होती. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्यात दिनेश त्रिवेदी हे एक मोठे नाव होते. निवडणुकीअगोदर काही दिवस ते भाजपमध्ये दाखल झाले होते. बंगाल हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे लोकांचे जीवन पूर्णपणे राजकारणाशी जोडलेले आहे. सामाजिक सुरक्षा उपलब्ध आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्तेच्या राजकारणाचा प्रभाव असतो. ज्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, आता त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये परत जायचे आहे. विरोधकांना तिथे फार स्थान नसते. त्यामुळे भाजपत जाऊन सत्ता न मिळाल्याने तिथे गेलेले नेते आता सैरभैर झाले आहेत. भाजपत गेलेल्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर अजून कोणताही निर्णय झाला नसला, तरी तृणमूल काँग्रेसची पाच तारखेला बैठक होणार आहे. त्यात या बाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. कोणालाही पक्षात परत घेण्याअगोदर अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. निवडणुकीअगोदर संबंधितांनी पक्ष का सोडला, त्याला परत का यायचे आहे? या प्रश्‍नांची उत्तर शोधण्याबरोबरच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपत गेलेले नेते परत पाठविण्यामागे भाजपचे षडयंत्र आहे का त्याचा शोधही घेतला जाणार आहे. अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यानंतरच कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा, की नाही, याविषयी पक्ष निर्णय घेईल. बर्‍याच आमदार, खासदारांनाही तृणमूल काँग्रेसमध्ये परतायचे आहे. भारतीय जनता पक्षातून काही निवडून आले असले, तरी त्यांचे मन आता भाजपत रमत नाही. त्यांची मूळ संस्कृती आणि भाजपची संस्कृती यांच्यात त्यांना ताळमेळ घालता येत नाही. पराभूत झालेल्या नेत्यांना तर कुणीच विचारत नाही. तृणमूल सोडून भाजपत जाऊनही उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे हाल तर आणखीच वेगळे. सरला मुर्मू, माजी आमदार सोनाली गुहा आणि फुटबॉलपटू-राजकारणी दिलीपू बिस्वास यांनी आपल्याला पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये यायचे आहे. हलाबपूर येथून सरला मुर्मू यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तरी त्यांनी ती नाकारली आणि तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांना आता तृणमूल काँग्रेसमध्ये परत यायचे आहे. तसेच माजी आमदार सोनाली गुहादेखील घरी परत येण्याची वाट पाहत आहेत. त्यांनी म्हटले, की जसे मासे पाण्याशिवाय जगू शकत नाही, तशाच प्रकारे मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, दीदी.’.फुटबॉलर-नेत्या-राजकारणी दीपेनु विश्‍वास यांनीही दीदी यांना तृणमूल काँग्रेसमध्ये परत घेण्याची विनंती केली आहे. गेल्या दोन मे रोजी पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर अवघ्या एक महिन्याच्या आत पश्‍चिम बंगाल विधानसभेतील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे.

COMMENTS