माध्यमांचा कणा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

माध्यमांचा कणा

भारतासारख्या लोकशाहीसंपन्न देशाची वाटचाल आज कोणत्या दिशेने सुरु आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. देशातील काही घटनांकडे लक्ष वेधल्यास माध्यमांची बदलत

अण्णाभाऊ मार्क्सवादी की, आंबेडकरवादी?
फसवणुकीचा गोरखधंदा  
शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण

भारतासारख्या लोकशाहीसंपन्न देशाची वाटचाल आज कोणत्या दिशेने सुरु आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. देशातील काही घटनांकडे लक्ष वेधल्यास माध्यमांची बदलती भूमिका लोकशाहीला पुरक आहे का, असा सवाल देखील उपस्थित करणे क्रमप्राप्त ठरते. नुपूर शर्मा, हिंदू-मुस्लिम धूव्रीकरण, या सर्व भूमिका पाहता आपण याच लोकशाहीप्रधान देशात राहतो का. ज्याप्रमाणे काही पक्षांचे नेते भडकावू भाषण करून, एका समुदायाला चिथावणी देण्याचे काम करतात, ते निषेधार्य आहे. मात्र त्याचबरोबर माध्यमांनी या बाबींचे वस्तूनिष्ठ परीक्षण करणे गरजेचे असतांना माध्यमे विशिष्ठ अजेंडा घेऊन चर्चा घडवून आणत आहे, आणि ते लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा यांनी नेमके यावर बोट ठेवले आहे. मीडिया ट्रायल्स या कांगारू कोर्टासारख्याच असल्याचे वक्तव्य रमणा यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. मीडिया ट्रायल्सचा परिणाम हा न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि तिच्या पारदर्शक कार्यप्रणालीवर देखील होत असल्याची खंत यावेळी रमणा यांनी व्यक्त केली.
भारतीय न्यायव्यवस्थेवर माध्यमांचे आक्रमण जरी होत नसले तरी, माध्यमे एका विशिष्ठ विचारधारेचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. माध्यमे ही आता स्वतंत्र राहिली नाहीत. तर ती भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे. त्यामुळे भांडवलदार ठरवेल, ती भूमिका माध्यमांना मांडावी लागते. त्यामुळे माध्यमांमध्ये काम करणार्‍या पत्रकारांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे का, त्यांना स्वतंत्र भूमिका घेण्याचे स्वतंत्र आहे का. असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होतात. तर अनेक पत्रकार डोळयांना झापडं बांधून मालक म्हणेल ती, भूमिका निभावत असतो. माध्यमे ही लोकशाहीचे रखवालदार आहेत. त्यामुळे त्यांनी नेहमीच सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या चुका, त्यांच्या दोषासह दाखवून देण्याचे काम माध्यमांचे आहे. तरच सरकारवर अंकुश राहील, ही त्यामागची भूमिका. मात्र माध्यमे आपली भूमिका विसरत चालल्याचे दिसून येत आहे. माध्यमे देखील कुणाच्या तरी वळचणीला जात, राजकीय नेत्यांची स्तुती करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. भारतीय राजकारणाला विभूतीपुजा हा शाप आहे. त्यामुळे राजकीय नेता म्हणजे सर्वस्व असे अनेक कार्यकर्त्याला वाटते. त्यासाठी ते आपला जीव ओवाळून टाकायला मागेपुढे पाहत नाही. राजकीय नेता चुकत असेल, तर त्याला सुनावण्याचे धारिष्टय कार्यकर्त्यांमध्ये नाही. नेता म्हणेल तीच पूर्व दिशा, अशी आजच्या अंधभक्तांची भूमिका असल्यामुळे राजकीय नेत्यांचे वस्तूनिष्ठ परीक्षण करण्याचे धारिष्टय कार्यकर्ते दाखवत नाही. कार्यकर्ते जरी अंधभक्त असले तरी, माध्यमांनी देखील अंधभक्त कार्यकर्त्यांसारखे अंधानुकरण करण का करायला हवे. त्याचे मुख्य कारण म्हणजे माध्यमं आज स्वतंत्र राहिलेली नाही. त्यांच्यावर भांडवलदारांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांनी नेहमीच विशिष्ठ विचारधारेचा अजेंडा राबविण्याचे ठरविलेले दिसून येत आहे. स्वतंत्र भारतानंतर असा अजेंडा राबविला जात नव्हता असे नव्हे. तर तो छुप्या पद्धतीने, आणि काही प्रमाणात राबविला जात होता. मात्र अलीकडच्या काही वर्षांत हा अजेंडा खुलेआम वापरला जात आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रतारणा करत आहोत, असे कोणत्याही माध्यमकर्मींना वाटत नाही. कारण ते स्वतंत्र असल्याचे विसरले आहेत. ते भांडवलदार मीडियाचे गुलाम झाल्यासारखे त्यांची विचारसरणी घेऊन थाटात ते जगत आहे. त्यामुळे माध्यमे स्वतंत्र आहेत, ही भूमिकाच ते विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांनी केलेली टिपण्णी माध्यमांच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारी आहे. त्यामुळे माध्यमांनी आपला कणा ताठ असल्याचे दाखवून देण्याची आजच्या काळात तरी खरी गरज आहे.

COMMENTS