Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी

रविवारी मुख्यालयात झाली परीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी ः मैदानी चाचणी झाल्यानंतर तीन महिन्याच्या प्रतीक्षेने रविवारी (दिनांक 2 एप्रिल) पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा झाली.

पारनेर सैनिक बँकेची ऑनलाइन सभा नियमबाह्य असल्याने रद्द करा
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
दुभंगलेली मने जुळवण्याचे काम न्या. नेत्रा कंक यांनी केले

अहमदनगर/प्रतिनिधी ः मैदानी चाचणी झाल्यानंतर तीन महिन्याच्या प्रतीक्षेने रविवारी (दिनांक 2 एप्रिल) पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. 1 हजार 606 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 781 उमेदवारांनीच परीक्षेसाठी हजेरी लावली. तब्बल 825 उमेदवार गैरहजर राहिले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात सकाळी 8.50 ते 10.20 वाजण्याच्या दरम्यान ही परीक्षा झाली.

जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाईच्या 129 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला मैदानी चाचणी झाली. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. 129 जागांसाठी 1 हजार 606 उमेदवार पात्र ठरले होते. त्यांना रविवारी पहाटे साडे चार वाजता येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र 781 उमेदवारच परीक्षेसाठी हजर राहिले. यामध्ये 594 पुरुष, 186 महिला व एक तृतीयपंथीयाचा सहभाग होता. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची घेण्यात आली. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलिस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडे तीनशे पोलिस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका लाईनमध्ये 30 याप्रमाणे एकूण 54 लाईनमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक लाईनमध्ये एक अधिकारी व त्यांच्या मदतीला अंमलदार देण्यात आले होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक, अप्पर अधीक्षक व स्वत: अधीक्षक ओला लक्ष ठेवून होते. मैदानावर चारही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते तसेच स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केले होते. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठ्याचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला होता. लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत का, याची खातरजमा याद्वारे परीक्षाकेंद्रावर केली जात होती.

दरम्यान पोलिस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पडली आहे. यासाठी अधीक्षक ओला यांनी विशेष काळजी घेतली. रविवारी परीक्षा असल्याने शनिवारीच प्रश्‍नयपत्रिका येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्या पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी प्रश्‍नपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या, तेथे बॅरेकेडींग करून प्रवेशबंदी करण्यात आली होती. बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले होते. रात्रभर अधीक्षक ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी अधीक्षक कार्यालयात हजर होते. पहाटे पोलिस बंदोबस्तात या प्रश्‍नपत्रिका परीक्षास्थळी रवाना करण्यात आल्या.

COMMENTS