पुणे / प्रतिनिधी : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेल

पुणे / प्रतिनिधी : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत 1119 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने दि. 14 एप्रिलपासून ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे केवळ 500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील 5 समान मासिक हप्त्यांमध्ये वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या योजनेत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधून आतापर्यंत नवीन घरगुती वीजजोडण्यांसाठी 3152 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पुणे 599, सातारा 75, सोलापूर 292, कोल्हापूर 85 आणि सांगली जिल्ह्यात 58 नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 2033 अर्जांवर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता, वीजजोडणीच्या जागेची तांत्रिक तपासणी, विद्युत संच मांडणीचा चाचणी अहवाल, विद्युत पायाभूत सुविधा उभारणीबाबत कार्यवाही सुरु आहे.
या योजनेत वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे. अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी किंवा कृषी आकस्मिकता निधी तसेच इतर उपलब्ध होऊ शकणार्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकार्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
COMMENTS