सागरी आव्हान

Homeसंपादकीय

सागरी आव्हान

गेल्या महिन्यात एक बातमी प्रसिद्ध झाली होती.

फुटीरतेच्या वाटेवर!
भ्रष्टाचाराचा महारोग
दिव्यांगांना पाठबळ

गेल्या महिन्यात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. जगातील कोणत्या देशाचे लष्करी सामर्थ्य किती आहे, याचा त्यात उल्लेख होता. त्यात भारत चाैथ्या क्रमांकावर असल्याचे प्रसिद्ध झाले होते. 

सैन्यासाठी कोण किती तरतूद करते, कोणाकडे किती मनुष्यबळ आहे, कोणती युद्धसामुग्री आहे, यावर युद्धातील विजय ठरत नसतो, हे खरे असले, तरी या सर्व गोष्टी विजयात नक्कीच महत्वाच्या आहेत आणि त्या दुर्लक्षून चालणार नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. त्या बातमीत एक बाब प्रकर्षाने नमूद करण्यासारखी होती, ती म्हणजे चीन हा नाैदल सामर्थ्यांत जगात सर्वांत प्रबळ आहे  आणि तीच खरेतर भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. गेल्या काही वर्षांत चीन ज्या पद्धतीने हिंदी महासागर, दक्षिण चिनी समुद्रात वर्चस्व वाढवितो आहे, ते पाहिले, तर आपल्याला  खूपच काळजी करण्यासारखे  आहे. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी एक मोठे आव्हान बनला आहे. अर्थात भारत शांत बससेला नाही. भारताने अनेक देशांशी युद्धसराव सुरू केला आहे. अलिकडे स्थापन झालेला क्वाड राष्ट्रांचा समूह त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. गेल्या तीन दिवसांतही भारताने अमेरिकेच्या युद्धनाैकासोबत युद्धसराव केला. चीनच्या आव्हानाचा सामना करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने गेल्या काही वर्षांत हिंदी महासागरात मित्र देशांच्या नौदलांसोबत सागरी युद्धाभ्यास केला आहे. भारत आणि अमेरिकेच्या नौदलाने हिंदी महासागरात आपल्या युद्ध क्षमतेचा सराव केला. ‘पेसेक्स’ युद्धसरावात भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस  शिवालिक, हेलिकॉप्टर्स आणि समुद्रावर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पी8आई विमानांनी, अमेरिकन नौदलाच्या ‘यूएसएस थियोडोर रुझवेल्ट कॅरिअर स्ट्राइक ग्रुप’सोबत सहभाग घेतला होता. कॅरिअर स्ट्राइक ग्रुप नौदलाचा एक मोठा ताफा असतो. ज्यात विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, युद्धनौका आणि इतर बोटींचा सहभाग असतो. गेल्या मंगळवारी हिंदी महासागरात फ्रान्सचे संयुक्त लष्करी कमांडर रिअर अॅडमिरल जॅक फेगार्ड यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल हरि कुमार यांची भेट घेतली. दोन्ही पक्षात हिंदी महासागर परिसरातील सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या परस्पर सहयोगाबाबत चर्चा झाली. एप्रिल महिन्यात दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये वार्षिक ‘वरूण’ युद्धाभ्यास होणार आहे. या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. एप्रिल महिन्यातच भारतीय नौदल फ्रेंच नेव्हीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘ला पेरोस’ अभ्यासात भाग घेणार आहे. यात ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यासारखे ‘क्वाड’ मधील देश भाग घेणार आहेत. फ्रान्सच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोहिमेत भारताचा समावेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच वर्षी जानेवारीत भारतील नौदलाने ‘ट्रोपेक्स’ नावाचा सर्वांत मोठा युद्धाभ्यास केला होता. ज्यात नौदलाच्या बोटी, विमाने यांच्यासोबत लष्कर, वायूसेना आणि सागरी सुरक्षा दलाचा सहभाग होता.

भारतीय नौदलाचे परदेशी नौदलांसोबतचे युद्धसराव वाढल्याचे दिसते  आहे. याची सुरूवात गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात झाली. भारतीय नौदलाने ओमानच्या रॉयल नेव्हीसोबत ‘नसीम-अल-बकर’ नावाचा युद्धाभ्यास केला. • ओमानच्या अल-रसिख आणि अल-खास्सब यांच्यासोबत भारताकडून आयएनएस ब्यास आणि आयएनएस सुभद्रा यांचा सहभाग होता. सप्टेंबर 2020 मध्ये भारतीय नौदलाने रशियन फेडरेशन नेव्हीसोबत ‘इंद्रा नेव्ही’ नावाचा युद्धसराव केला. यात रशियाच्या युद्धनौका अॅडमिरल ट्रिब्यूट्स, अॅडमिरल विनोग्रोडोव आणि अॅडमिरल बोरिस बुटोमा सहभागी होत्या. भारताकडून रणविजय, किल्टन आणि शक्ती यांनी हा युद्धसराव केला. सप्टेंबरमध्येच भारतीय नौदलाने जपानच्या मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत अरबी समुद्रात झालेल्या युद्धाभ्यासात भाग घेतला. जपानच्या कागा आणि इकाजुची यांच्यासोबत आयएनएस चेन्नई, तरकश आणि दीपकने यात भाग घेतला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये भारतीय नौदलाने बांग्लादेशी नौदलासोबत ‘बोंगोसागर’ नावाच्या युद्धसरावात भाग घेतला. ऑक्टोबरमध्येच भारताने श्रीलंकेच्या नौदलासोबत ‘स्लाइनेक्स’ नावाचा युद्धाभ्यास केला. यात पहिल्यांदाच भारताचे अॅडव्हान्स लॅंडिंग हेलिकॉप्टर श्रीलंकेच्या ‘गजबाहु’ या युद्धनौकेवर लॅंड झाले होते. त्यानंतर भारताने सिंगापूरसोबत ‘सिम्बेक्स’, तर नोव्हेंबर महिन्यात अनेक देशांसोबत ‘मालाबार’ युद्धसरावाचे आयोजन हिंदी महासागरात केले होते. ज्यात रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, अमेरिकेचे नौदल आणि जपानच्या नौदलाचा सहभाग होता. सिंगापूर आणि थायलॅंडच्या नाैदलासोबत भारताने ‘सिट्मॅक्स’ नावाचा युद्धाभ्यास केला.  फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या नौदलासोबत ‘पेसेक्स’ युद्धसराव बंगालची खाडी, हिंदी महासागराचा पूर्वेकडील भाग आणि अदनच्या खाडीत करण्यात आला होता. हे खरे असले, तरी चीनने गेल्या दशकात हिंदी महासागर परिसरात आपली उपस्थिती वाढवली आहे. हिंदी महासागरात चीन एक मोठा धोका आणि आव्हान बनले आहे. आता भारताला जास्त सावध राहावे लागेल. हिंदी महासागर परिसरात काय होते, यावर नजर ठेवावी लागेल. चीनच्या नौदलाने पायरसीवर निर्बंध आणण्याच्या नावावर हिंदी महासागरात प्रवेश केला होता. चीनने हिंदी महासागरातील रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरात त्यांची उपस्थिती निश्चित केली आहे.

चीन आणि भारत यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत; मात्र आता समुद्री मार्गानेही चीन भारताजवळ येण्याचा प्रयत्न करतो आहे, या दृष्टीने याकडे पाहावे लागेल. हिंदी महासागरात चीनची उपस्थिती जिबुतीपासून अफ्रिकेपर्यंत पोहोचली आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. चीन आणि इराणने गेल्या तीन दिवसांपूर्वीच मोठा करार केला. इराण भारतासाठी महत्त्वाचा आहे आणि इराणमध्ये चीनची उपस्थिती गंभीर गोष्ट आहे. बांगला देशाने हल्लीच चीनकडून पाणबुड्या घेतल्या आहेत. ज्यामुळे चीनचा हिंदी महासागर परिसरात प्रभाव पडणार आहे. युद्धसराव नौदलांमध्ये देवाण-घेवाण आणि कामात समन्वयासाठी महत्त्वाचे आहेत. नौदल युद्धसरावासाठी निरंतर तयार असेल तर याचा परिणाम नौका, पाणबुडी यांच्या भौगोलिक स्थितीवर पडतो. काहीवेळा हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाची विश्वसनीयता दाखवण्यासाठी तर काहीवेळा आपात्कालीन परिस्थितीत बचावकार्यासाठी नौकांचा वापर केला जातो. अत्याधुनिक युद्धसरावांमुळे युद्धनौका आणि विनाशिकांवर याचा विपरित परिणाम होतो. भारतीय नौदलाला देण्यात येणाऱ्या निधीचा तात्काळ अभ्यास करणे गरजेचे आहे. नौदलाला देण्यात येणारा निधी वाढवण्यात आला पाहिजे. अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठीच्या बजेटमधील 14 टक्के दिल्याने एका नौदलाला आपण सक्षम करू शकतो अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. भारताला आता राजकीय स्तरावर इतर पर्याय शोधले पाहिजेत. भारत आता क्वाडचा सदस्य आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेकडून युद्धनौका काही वर्षांच्या करारावर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

COMMENTS