आ. जगतापांमुळे येऊ शकते लॉकडाऊनची नामुष्की ; काँग्रेसच्या काळेंनी केला नाव न घेता दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जगतापांमुळे येऊ शकते लॉकडाऊनची नामुष्की ; काँग्रेसच्या काळेंनी केला नाव न घेता दावा

शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

डॉ. संजय दवंगे यांना शब्दगंधचा ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष’ पुरस्कार
बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार
काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

अहमदनगर/प्रतिनिधी-शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. काळे यांनी आ. जगताप यांचे थेट नाव न घेता त्यांच्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार केली असून, ते (जगताप) कोरोना नियमांचे पालन करीत नसल्यामुळे शहरावर लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते, असा दावा केला आहे. 

काळे यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जबाबदार लोकप्रतिनिधी स्वतः कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत असून शासन, प्रशासनाबरोबरच सामाजिक-राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असताना नागरिकांना, पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देत असतात. हीच अपेक्षा सर्व लोकप्रतिनिधींकडून समाजाची आहे आणि असणे यात काही गैर नाही. मात्र, नगर शहराच्या स्थानिक पातळीवर याचे उल्लंघन होताना दिसत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर राजकीय कार्यक्रम होत असताना, विविध ठिकाणी भेटी देताना लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः होऊन जबाबदारीने मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. या बाबींची दक्षता घेतली नाही तर अशा लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या भोवतालच्या मूठभर बेजबाबदार लोकांमुळे सबंध शहरावर लॉकडाऊन लादण्याची नामुष्की ओढवूशकते. असे झाल्यास सर्वसामान्य नागरिकांची, व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते, असा दावा काळे यांनी जगतापांचे नाव घेता केला आहे.

प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत

काळे यांनी या निवेदनात प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस धोका वाढत असून अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील रुग्ण संख्येत झपाट्याने होणारी वाढ, ही चिंतेची बाब आहे. विशेषत: मागील दहा ते बारा दिवसांमधील वाढलेली रुग्ण संख्या ही नगरवरील वाढत्या संकटाची आकडेवारी दर्शविते. या पार्श्‍वभूमीवर सध्या प्रशासनाकडून मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या अनुषंगाने कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ही कारवाई ठिकठिकाणी, चौका-चौकांमध्ये होताना दिसत आहे. तसेच विशेषत: शहरातील बाजारपेठेमध्ये देखील प्रशासनाची पथके कारवाई करताना दिसून येत आहेत. निश्‍चितच ही कारवाई स्वागतार्ह आहे. जिल्ह्यातील प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. आपण आणि आपली टीम यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. आपल्या या कार्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निश्‍चितच कौतुक करतो. मात्र, ही कारवाई होत असताना ती अधिक सर्वसमावेशक होण्याची आवश्यकता वाटते. प्रशासनाच्यावतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. ही कारवाई होत असताना दुजाभाव केला जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेषत: लोकप्रतिनिधी स्वतः प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांना पाहून समाजामध्ये देखील याबाबतचा चुकीचा संदेश जातो, असा दावा काळेंनी यात केला आहे. काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने दुजाभाव न होऊ देता सर्वसमावेशक कारवाई करावी, अशी मागणी करून, दुजाभाव प्रशासनाच्यावतीने केला जात नाही, हा संदेश नागरिकांमध्ये जाण्याच्यादृष्टीने योग्य ती पावले उचलण्यात यावीत तसेच प्रशासनाच्यावतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या अंमलबजावणीसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आपणास सर्वतोपरी सहकार्य राहील, अशीही ग्वाही यात दिली गेली आहे.

त्यांच्या तोंडावर कधीच मास्क नसतो

काळे यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकही दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मध्यंतरी शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त प्रशासनाला सॅनिटायझर भेट देण्याचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असल्याचे दाखवले जात असताना या ठिकाणी उपस्थित असणार्‍यांच्याच तोंडावर मास्क नव्हता. तसेच विविध ठिकाणी शहरांमध्ये भेटी देत असतानादेखील लोकप्रतिनिधींच्या तोंडावर कधीच मास्क नसतो. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे, ही काळाची गरज आहे. मात्र, अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याभोवतालच्या मूठभर लोकांमुळे शहरामध्ये चुकीचा संदेश जात आहे. अशा ठिकाणांवरून कोरोना प्रादूर्भाव वाढत असेल तर ही नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे, असा दावाही यात करण्यात आला आहे.

COMMENTS