य. मो. कृष्णा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला संस्थापक पॅनेलच्या संचालक, पूर्णवेळ उपस्थित होते.
कराड / प्रतिनिधी : य. मो. कृष्णा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला संस्थापक पॅनेलच्या संचालक, पूर्णवेळ उपस्थित होते. केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या सभेचे कामकाज केवळ तीस-चाळीस मिनिटात संपविले. चालू वर्षीच्या उसाची राहिलेली एफआरपी कधी देणार?, कामगारांच्या मागण्या याबद्दल चकार शब्द काढला नाही. सभेपुढे आलेल्या 59 प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. प्रश्नकर्त्यांना उपप्रश्न विचारायची संधी दिली नाही. माईक काढून घेतले. सभा ऑनलाईन होती. पण एकाही सभासदाला त्यात सहभागी होता आले नाही. एकंदरीत ही सभा एक सोपस्कार होते. सभेला आमच्यासारखे संचालक उपस्थित होते. विरोधक समोर पूर्णवेळ उपस्थित असणे हे त्यांना खूपच झोंबलेले होते हे ऑनलाईन सहभागी झालेल्या सभासदांनी पाहिले असल्याचा आरोप कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत आरोप केला आहे.
अविनाश मोहिते म्हणाले, कारखान्याची सप्टेंबर 2019 सर्वसाधारण सभा झाली होती. त्या सभेसाठीही उपस्थित
राहण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी भाजपचे सरकार असल्याने पोलिसांचा वापर करुन आम्हाला सभास्थळी प्रवेश करू दिला नाही. यावेळी सभा ऑनलाईन होती. आम्हांला ऑनलाईन सहभागी होणे शक्य होते. मात्र, सभासदांनी निवडून दिले असल्याने आम्ही प्रत्यक्ष सहभागी झालो. तत्पूर्वी मुदतीत लेखी स्वरुपात आम्ही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे त्यांनी
दिली नाहीत. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यावतीने प्रत्युत्तर देणारे पत्रक निघेल. पण ते नक्की थातूर-मातूर असेल. प्रश्नांची उत्तरे स्वत: अध्यक्षांनी सही केलेले पत्रक काढून द्यावीत. किंवा संपूर्ण साडेपाच वर्षात कारखान्याच्या विषयावर ट्रस्टच्याबाहेर पत्रकार परिषद द्यावी. सर्व कार्यरत पत्रकारांना बोलावून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे.
पुढे अविनाश मोहिते म्हणाले, आमचे त्यांच्यासाठीचे सभेत विचारलेले प्रश्न आजही कायम आहेत. अध्यक्षांनी आपल्या
भाषणात डिस्टीलरीला 30 कोटी नफा झाल्याचे जाहीर केले. तो अहवालातल्या कोणत्या पानावर नमूद आहे. असा नफा झाला असेल आणि अजूनही होत असेल तर सुमारे 45 कोटी रुपयांची एफआरपीची जी थकीत रक्कम आहे ती तातडीने सभासदांच्या खात्यावर जमा करावी. 55 कोटी रुपये खर्च करुन कारखान्याचे आधुनिकीकरण केले. त्यामुळे 11 ते 12 हजार मे. टन गाळप प्रतिदिनी होईल, असे वार्षिक अहवालामध्ये जाहीर केले. मग प्रत्यक्षात 200 ते 400 टनच ऊस जादा गाळला जातोय. याबद्दल अध्यक्ष म्हणतात कारखान्याचा उतारा वाढलाय, तसे असेल तर 55 कोटींचा खर्च उतारा वाढवायला केला होता की गळीत वाढवायला? मग गळीत वाढले नसेल तर 11 ते 12 हजार टन गाळप होईल, अशा बढाया वार्षिक अहवालाच्या भाषणात कशासाठी केल्या.
संस्थापक पॅनेलच्या काळात कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प जवळ जवळ कर्जमुक्त केला. त्या पाच वर्षाच्या काळात 15 कोटी 82 लाख युनिट वीज मंडळाला विकली. मात्र, विद्यमान अध्यक्षांच्या काळात त्यात वाढ व्हायच्या ऐवजी घट झाली. ही घट 2 कोटी 82 लाख युनिट इतकी आहे. हे अपयश का याचा खुलासा हवा. मुळात वीजेची विक्री पाच वर्षात
किती झाली याचा अहवाल बघून खुलासा करावा. आम्ही जे सभेच्या निमित्ताने प्रश्न मांडले ते हजारो सभासदांपर्यंत पोहोचले आहेत. त्याची उत्तरे देताना विद्यमान अध्यक्षांना गैरसोयीचे वाटत आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टबद्दलचे प्रश्न 30 वर्षापासूनही लोकांच्या मनात कायम आहेत. या ट्रस्टमधील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांसाठी प्रवेश राखीव होता. आता कायदे बदलले आहेत. मात्र, व्यवस्थापनाचा कोटा आहे. कारखान्याच्या मालकीच्या कृषी
महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. कारखान्याशी संबंधित व 100 टक्के कारखान्याच्या पैशातून उभ्या राहिलेल्या ट्रस्टच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जो व्यवस्थापन कोटा आहे. त्यात सभासद व कार्यक्षेत्रातील मुलामुलींना प्रवेश द्यावा. तसा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत करावा, अशीच आमची
मागणी होती. त्याला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, ते अजूनही द्यावे. सभा ऑनलाईन होती. त्यात काही सभासद ऑनलाईन सहभागी होते, मग त्यांना आपली मते का मांडू दिली नाहीत. सभेच्या ठिकाणी संचालकांच्या टेबलावरील माईक का काढून घेतले. आम्ही विरोधक आहे. आम्हाला बोलू द्यायचे नसेल हे समजू शकतो पण सत्ताधारी गटातील संचालकांनाही बोलायची बंदी का? स्वागत, प्रास्तविक, ठराव वाचन, 59 प्रश्नांपैकी दोनचार प्रश्नांची थातूर-मातूर उत्तरे आणि खुद्द अध्यक्षांनीच ’आता सभा संपवूया’ असे म्हणणे ते हजारो सभासदांनी ऑनलाईन पाहणे हे हास्यास्पद असल्याचे अविनाश मोहिते म्हणाले.
COMMENTS