शेतकरी आंदोलनात आणखी एक फूट

Homeसंपादकीय

शेतकरी आंदोलनात आणखी एक फूट

केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

निवडणुका आणि कालावधी !
रहबर ते रेडिओ ! 
महाराष्ट्राचा राजकीय गदारोळ ! 

केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर अनेक संघटनांनी त्यातून माघार घेतली. शेतकरी आंदोलनाचा दबाव कमी झाल्याने सरकारने सुटकेचा निश्वास टाकला होता; परंतु भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंची फुले झाली. त्यातून अंगार पेटला आणि शेतकरी आंदोलनात जान आली. असे असले, तरी प्रदीर्घ काळ आंदोलन चालविणे शक्य नाही. 

शेतीचे काम सोडून किती काळ शेतकरी दिल्लीत येऊन थांबतील, हा प्रश्नच होता. माध्यमे सातत्याने या आंदोलनाचे वृतांकन करू शकत नाही. त्यांच्यापुढे अनेक विषय असतात. त्याचा परिणाम आंदोलन आता ओसरते की काय अशी शंका यायला लागली होती. त्यातच पंजाबमध्ये भाजपच्या आमदाराला शेतक-यांनी मारहाण केली. कायदा हातात घेणे चुकीचे आहे; परंतु शेतक-यांची सहनशीलता आता संपायला लागली आहे. सरकारने संवादाचे दरवाजे बंद केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तो कोणत्याही थराला जाण्याअगोदर सरकार आणि शेतकरी दोघांनीही एक एक पाऊल मागे यायला हवे; परंतु तसे होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. सध्या शेती कायद्यांना स्थगिती आहे. सरकार मात्र साम, दाम, दंड, भेद अशा सर्वंच मार्गानी आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दुर्लक्ष करणे हा आंदोलन मोडण्याचा आणखी एक मार्ग या सरकारने दाखविला आहे.  भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगिंदर सिंह  आणि गुरनाम चादूनी यांच्यासह अनेक नेत्यांनी राकेश टिकैत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. युनायटेड मोर्चाचे नेते असे म्हणतात, की ‘आप’ चे झेंडे टिकैटच्या कार्यक्रमात दिसत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी  बांधकाम केल्याच्या विधानावर किसान मोर्चाचे अन्य नेतेही संतप्त आहेत. शेतकरी आंदोलन सुरू होऊन चार महिने झाले, तरी सरकार आणि शेतकरी यांच्यात कोणताही संवाद झालेला दिसत नाही. दुसरीकडे, सुमारे 40 शेतकरी संघटनांना एका छत्राखाली आणण्यासाठी बनविलेल्या संयुक्त शेतकरी आघाडीतील मतभेदाची दरी रुंदावते आहे. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर परेड व हिंसाचारानंतर आंदोलन जवळ जवळ संपण्याच्या मार्गावर होते; परंतु  टिकैत यांच्या अश्रूंनी ही चळवळ संपुष्टात येण्यापासून वाचवली आणि शेतकरी चळवळीचा चेहरा बनविला. टिकैत आंदोलन या चळवळीचा चेहरा बनल्यामुळे संयुक्त आघाडीत सामील झालेल्या शेतकरी संघटनांमध्ये नाराजी आहे. संयुक्त मोर्चाने आधीच स्पष्ट केले आहे, की आंदोलन स्थळी पक्की घरे बांधण्याचा त्यांचा निर्णय नाही.  टिकैत यांनी पुन्हा एकदा पक्की घरे बांधण्याचा सल्ला शेतक-यांना दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की वादळ, पाणी, उष्णता टाळण्यासाठी शेतक-यांना पक्की घरे बांधावी लागतात. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास आम्हाला ते करावे लागेल. सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपुरात पक्की घरेही बांधली जाऊ लागली. जोवर आंदोलन सरकार खेचत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, या वक्तव्यावरही मतभेद आहेत. शेतकरी आंदोलकांनी कोणत्याही निवडणुकीपासून दूर राहावे, असे आंदोलनातील काही संघटनांचे म्हणणे आहे. टिकैत यांच्यासह अन्य काही नेत्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार केला. त्यावरूनही आता संघटनांत फूट पडली. आम्ही शेतकरी संघटना आहोत, राजकीय पक्ष नाही. आम्ही या पक्षाला मत देऊ असे मतदारांना कसे सांगू शकतो? असा सवाल काही नेते करतात. त्यांचे म्हणणे आहे की जर आम्ही भाजपला मत न देण्यास सांगितले, याचा अर्थ असा आहे की ते दुस-या पक्षाला जिंकण्यास सांगत आहेत. क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दर्शनपाल आणि बलवीरसिंग राजेवाल हे  टिकैत यांच्यावर आणखी एका मुद्द्यावर नाराज आहेत. संसदेत भाजीपाला विकण्याच्या मुद्याशी ते सहमत नाहीत. टिकैत म्हणाले होते, की आम्ही आमची पिके विकण्यासाठी संसदेत जाऊ. सरकार म्हणते, की तुम्ही तुमचे पीक कोठेही विकू शकता, तर संसदेत बसलेल्या लोकांहून चांगला खरेदीदार कोण असेल? गुरनाम चाडू यांनीही यापूर्वीही राकेश टिकैत यांच्यावर आरोप केले आहेत. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी टिकैत यांच्यावर भाजपच्या मांडीवर बसल्याचा आरोप केला आहे. टिकैत यांनी हे आंदोलन विकल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही एका पक्षाच्या किंवा कोणत्याही एका व्यक्तीच्या निर्णयाने हे आंदोलन चालू नसल्याचे त्यांनी सांगितले. या चळवळीचा कोणी चेहरा नाही. ही चळवळ संयुक्त आघाडीची आहे. उत्तराखंड किसान मंचचे अध्यक्ष भोपाळ सिंग स्पष्टपणे सांगतात, की टिकैत यांच्या मेळाव्यांत आम आदमी पक्षाचे बॅनर आणि झेंडे दिसतील. ही चळवळ भटकली आहे. टिकैत आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला बळी पडले आहेत. भोपाळसिंग यांनी 26 मार्च रोजी डेहराडून येथे  टिकैत यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार घातला होता. लाल किल्ल्यावरील हिंसाचारानंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हीएम सिंह यांनी स्वत: ला वेगळे केले आहे. राकेश टिकैत यांच्या संघटनेचे धर्मेंद्र मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते  म्हणाले, की  टिकैत यांना आंदोलनाचा चेहरा व्हायचे नसून त्यांना शेतकरी आंदोलन पुढे नेण्याची इच्छा आहे. टिकैत यांना निवडणूक लढवायची असती, तर त्यांना यापूर्वी ही ब-याचदा संधी आली होती. निवडणुकीच्या राजकारणात जाण्याचा अजिबात हेतू नाही.  यावरून शेतकरी संघटनांतील वाद किती पराकोटीला गेले आहेत, हे लक्षात येते.  

COMMENTS