कोरोना लसीकरणात नेहमी वादाचे ठिकाण ठरलेल्या माळीवाड्यातील मनपाच्या महात्मा फुले आरोग्य केंद्राने शुक्रवारी मोठा राजकीय धमाका केला.
अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना लसीकरणात नेहमी वादाचे ठिकाण ठरलेल्या माळीवाड्यातील मनपाच्या महात्मा फुले आरोग्य केंद्राने शुक्रवारी मोठा राजकीय धमाका केला. येथून एकजण लसी घेऊन बाहेर जात असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आणि त्यामुळे जुन्या महापालिकेत हायहोल्टेज पोलिटिकल ड्रामा रंगला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे आमने सामने आल्याने त्यांच्यात वादावादी व आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला. खरे तर हे तिघे लसी घेऊन जात असलेल्या व्हीडीओचा जाब मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना विचारायला आले होते. पण तो विषय राहिला बाजूला, पण या तिघात व त्यांच्या समर्थकांतच जोरदार शाब्दीक चकमक झडली.
काही क्षणात शहर व जिल्हाभर झालेल्या या विषयाने नगर मनपाचे राजकारण जोरदार टीआरपी गाठून गेले. याबाबतची माहिती अशी की, माळीवाड्यातील मनपाच्या आरोग्य केंद्रातून एकजण लसी घेऊन जात असल्याचा व्हीडीओ सोशल मिडियात आल्याने तो घेऊन बोराटे त्याचा जाब विचारण्यासाठी जुन्या महापालिकेत डॉ. बोरगे यांच्या दालनात गेले. हा व्हीडीओ भाजपच्या एका नेत्याने टाकला असल्याचे समजते. पण हा व्हीडीओ बोरगेंना दाखवून बोराटेंनी, असे प्रकार होत असतील तर लसीकरण केंद्र बंद करून टाका, अशी मागणी केली. त्यांचा हा संवाद सुरू असताना आ. जगताप तेथे आले. तो व्हीडीओ बोराटेंच्या माणसांनी व्हायरल केल्याचे त्यांचे म्हणणे होते तर तो नेमका कोणी पाठवला, याची माहिती घ्या, असे बोराटेंचे म्हणणे होते. यावरून या दोघात जोरदार शाब्दीक चकमक तेथे झाली. ती संपत नाही, तोच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तेथे धडकले. आमच्या भागातील लसीकरणाचे काय झाले, असा त्यांनी सवाल करताच तेथील जगताप समर्थकांनी, आधी आमचे तर मिटू दे, असे त्यांना सुनावले व त्यावरून तेही संतप्त झाले व त्यांनीही जोरदार आरोप-प्रत्याराोप सुरू केले.
समर्थक झाले गोळा, एकाने केली मध्यस्थी
जुन्या महापालिकेत जगताप, बोराटे व काळे समोरासमोर आले असून, त्यांच्यात वाद सुरू असल्याचे वृत्त काही वेळातच शहरभर पसरले व या तिन्ही नेत्यांचे समर्थक जुन्या महापालिकेत जमा झाले. बाहेरच्या बाजूला यामुळे चांगलीच गर्दी झाली होती. डॉ. बोरगेंच्या दालनात सुरू असलेल्या चर्चेवरून बाहेर विषय रंगू लागले व तणाव वाढू लागला होता. त्याचा अंदाज आल्याने एका जगताप समर्थकाने दालनातील चर्चेत मध्यस्थी करून सर्व नेत्यांना शांत केले. काही काळाने हा ड्रामा थंडावला व तिन्ही नेते आपापल्या समर्थकांसह निघून गेल्याने वातावरण मग निवळले. पण सोशल मिडियातून त्याची रंगतदार चर्चा सुरू होती.
दोघांचा बाईट..दोघांचे मौन
जुन्या महापालिकेतील हायहोल्टेज पोलिटिकल ड्राम्याशी संबंधित आ. जगताप, बोराटे, काळे व डॉ. बोरगे या चौघांपैकी फक्त काळे व बोरगे यांनी नंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जगताप व बोराटे यांनी मौन बाळगणे पसंत केले. काळे यांनी बोलताना, धक्काबुक्की झाल्याचा व गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप केला तर डॉ. बोरगे यांनी, मनपाच्या लसीकरण केंद्रातून लसी घेऊन जाण्याच्या व्हीडीओची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.
आदळआपट झाल्याची चर्चा
डॉ. बोरगेंच्या दालनात आधी बोराटे आले होते व नंतर जगताप आल्यानंतर कोणी कोठे बसायचे, यावरून खुर्च्यांची आदळआपट व वादावादी झाल्याचे बोलले जाते. पण या दोघांपैकी कोणीही नंतर पत्रकारांशी काही बोलले नसल्याने दालनात त्यांच्यात नेमके काय संवाद झाले, याची ऐकीव माहितीवरील खुमासदार चर्चा शहरात आहे.
COMMENTS