शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर ; आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर ; आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण

महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या जुळवून घेण्याच्या सूचनेनुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असे ठरले आहे.

‘इन्फ्लूएंझा’ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे ः आ. आशुतोष काळे
विरोधकांना हार दिसत असल्यामुळेच हल्ला ः उत्कर्षा रूपवते
दूध उत्पादकांची लुटमार थांबवावी-संभाजी रक्ताटे

अहमदनगर/प्रतिनिधी-महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या जुळवून घेण्याच्या सूचनेनुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असे ठरले आहे. येत्या एक-दोन दिवसात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ येथे येऊन उमेदवारी व अन्य नियोजन जाहीर करतील, असे स्पष्टीकरण शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिले. दरम्यान, काँग्रेसबाबत आपल्याला काहीही माहीत नाही. पण, ते जर आमच्या समवेत आले तर त्यांनाही बरोबर घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नगरच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक 30 जूनला ऑनलाईन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आ. जगताप यांनी, महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत मला आता काही सांगता येणार नाही. पण मुंबईत वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनेनुसार निवडी होणार आहेत आणि तसे मध्यंतरीच्या मुंबईतील वरिष्ठांच्या भेटीची छायाचित्रेही हे स्पष्ट करून गेले आहे, असे स्पष्ट केले. शिवसेनेच्या काही नगरसेवकांशी माझी चर्चा झाली आहे. या दोन्ही पक्षांची समन्वय समिती केली असून, तिचे प्रमुखपद स्थायी समिती सभापती अविनाश घुले पाहतात, ते दोन्ही पक्षांच्या सर्व संबंधित नगरसेवकांच्या संपर्कात आहेत, असे सांगून आ. जगताप म्हणाले, माझ्या काही हातात नाही व मी उमेदवारही नाही. लोकशाही प्रक्रियेनुसार निवड होत असते. नगरसेवक सर्व ठरवत असतात. अर्थात माझ्याही मताला किंमत असते. पण जेव्हा आमच्या नगरसेवकांना काही अडचण नाही, तेव्हा मला असायचे काही कारण नाही. नगरसेवकांनी जर वेगळी भूमिका मांडली तर मला काही लोकांशी चर्चा करावी लागते. पण बहुतांश निर्णय नगरसेवकच घेतात, असेही आ. जगतापांनी सांगितले. भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर असा काही विषय नव्हता. वरच्या सूचनांनुसारच व जुळवून घेण्याच्या आदेशानुसारच हे सारे सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याचा विषय आला नाही. आता मनपा सत्तेत राष्ट्रवादी उपमहापौरपदाच्या माध्यमातून सहभागी होणार आहे व ते नावही पक्षाचे नेते जाहीर करतील, असे सांगून आ. जगताप म्हणाले, सत्तेतील काँग्रेस सहभागाबद्दल मी निर्णय कसा घेऊ शकतो? पण ते येत असतील तर त्यांना समवेत घेतले जाईल, कारण, त्यांच्या माध्यमातून त्या-त्या भागाच्या विकासाला चालना मिळते. शिवाय तसेही मागच्यावेळेला ते आमच्या बरोबर होतेच, असेही सूचक भाष्य जगताप यांनी केले. दरम्यान, महापौरपद सव्वा-सव्वा वर्षे वाटपाबाबत आता काही ठरलेले नाही व त्याबाबतही वरिष्ठच निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाचजण इच्छुक

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीन इच्छुकांची नावे ठरवली असली तरी आणखी दोन इच्छुकांची नावे माझ्याकडे आहेत, असे आ. जगताप यांनी स्पष्ट केल्याने पक्षाच्या समन्वय समितीने ठरवलेल्या गणेश भोसले, मीना चोपडा व विनित पाऊलबुद्धे या तीन नावांव्यतिरिक्त अन्य दोन नावे कोणती आहेत, याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. तसेच या पाच इच्छुकांपैकी कोणाची अंतिम वर्णी लागते, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

COMMENTS