राजकारण की सत्तेचा तमाशा!

Homeताज्या बातम्यादखल

राजकारण की सत्तेचा तमाशा!

सत्ता माणसाला भलेबुरे संस्कार विसरायला लावते. वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध मोडीत काढते. सत्ता प्रशासकीय असो नाहीतर राजकीय एकजात सारे मुसळ केरात घालणाऱ्यां

शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मारुती अल्टो फक्त २ लाखांत खरेदी करा.
अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन.


सत्ता माणसाला भलेबुरे संस्कार विसरायला लावते. वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध मोडीत काढते. सत्ता प्रशासकीय असो नाहीतर राजकीय एकजात सारे मुसळ केरात घालणाऱ्यांची जातकुळी म्हणून या मंडळींकडे पहावे लागते. म्हणूनच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हटले जाते. अशी सत्ता प्राप्त करण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जातात.सारी ताकद पत प्रतिष्ठा पणाला लावून ही जेंव्हा सत्ता हुलकावणी देते तेंव्हा मानसिक संतूलन बिघडल्यासारखे वक्तव्य मुखातून बाहेर पडू लागतात. कधी यातून विनोद निर्माण होतो, तर कधी माणसांची परिक्षा होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली सुंदोपसुंदी पाहील्यानंतर कुणालाच परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचा निष्कर्ष दुर्दैवाने काढावा लागतो.


महाराष्ट्र आज वेगवेगळ्या आघाड्यांवर गंभिर परिस्थितीशी झगडत आहे.महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांनी बेजार केले आहे. लौकिकार्थाने भुमीपुत्र म्हणविणारे राज्यकर्ते आपल्या आईबापाला जाचणाऱ्या समस्यांकडे ढुंकूनही पहायला तयार नाहीत.राजकारणातील स्वार्थांध दिवट्यांकडून सातत्याने असा मातृपितृद्रोह होत असल्याने नियतीही वेळेवर सुड घेत असावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एक माणूस सदा सर्वकाळ सर्वांना फसवू शकत नाही. हा नियतीचा नियम आहे.राजकीय जातकुळीतील माणसाने सतत जनतेला फसविण्याचे काम केले आहे. कधी हे तर कधी ते असे आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी जनहिताकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष व्यक्तिगत आणि सामुहिक अधोगतीला कारणीभूत ठरले आहे. निसर्गात प्रत्येक पापाचा हिशेब ठेवण्याची व्यवस्था  आहे. योग्य वेळ येताच सव्याज हा हिशेब सादर होतो,राजकारणात आज जे चित्र दिसत आहे ते या सव्याज हिशेबाचाच परिपाक म्हणावा लागेल, कुरकुरीत चने भरलेले ताट समोर असतानाही दातच किडल्याने या चन्यांचा आस्वाद घेता न येणारा आणि दात मजबूत आहे पण चन्यांचे ताट भलताच कुणीतरी घेऊन पळाला अशा अवस्थेत जो संताप होतो, तसाच संताप आज राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मंडळींमध्ये पहायला मिळत आहे. सन २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सार्वाधिक १०५ आमदार निवडून आले असतांनाही शिवसेनेने दाखवलेल्या ताठर भुमिकेमुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास दुसराच कुणीतरी चावतो आहे हे पाहून भाजपाची अवस्था केस झडणाऱ्या प्राण्यासारखी झाली आहे वेदनांनी चिडचिड वाढली आहे. या चिडचिडीमुळे या नेत्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. बिघडलेल्या संतूलनातून अनेक गंभीर विषयाचे गांभिर्य हरवल्याचे दिसते आहे,आज महाराष्ट्र ज्या गंभिर परिस्थितीतून जातो आहे, त्या परिस्थितीत खंबीर विरोधी पक्ष म्हणून भुमिका बजावण्याची संधी असतांना भाजप अजूनही  सत्ता गमाविल्याचा अपघात विसरायला तयार नाही. आपण माजी आहोत हे वास्तव मान्य करायाला त्यांचे मन धजावत नाही.अजूनही सत्ता मिळविण्याची धुंदीत ही मंडळी तर्र राहून नको ते विनोद करू लागली आहे. इकडे आजी मंडळींमध्येही सारे काही आलबेल असून सर्वदूर आनंदी आनंद पहायला मिळत आहे.भाजपच्या भाषेत सांगायचे झाले तर असंगाशी संग म्हणजे अनैसर्गिक कृत्य करून शिवसेना पश्चाताप सोसत आहे. अर्थात भाजपाच्या या निरीक्षणांमध्ये प्रामाणिकपणापेक्षाही जुना रागच अधिक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही,हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तरी सत्ताधाऱ्यांचे वर्तन भाजप म्हणतो त्यापेक्षा वेगळे नाहीच. असंगाशीच संग आहे. कुठल्याच पातळीवर सत्तेत असलेले तिन्ही पक्ष एकमेकांच्या जातकुळीत बसत नाही, सत्तेच्या मळकटलेल्या धाग्याने त्यांना प्रासंगिक बांधले आहे, आज ना उद्या या धाग्याची वीण सैल होणारच आहे. हीच आशा भाजपाला लागून राहीली आहे, महाविकास आघाडीच्या शिंक्याला टांगलेले सत्तेच्या लोण्याचे मडके शिंके तुटून केंव्हा खाली पडते याची भाजपाला दबा धरून प्रतिक्षा आहे. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात जननेते नाहीतर तमासगीर गोळा झाले असून हा विनोदीपट महाराष्ट्राच्या नशिबी पडला आहे असेच खेदाने म्हणावे लागते.

COMMENTS