महाराष्ट्र शरमेने हिरमुसला !

Homeसंपादकीयअग्रलेख

महाराष्ट्र शरमेने हिरमुसला !

आज अवघ्या महाराष्ट्राने मान शरमेने खाली घातली.महाराष्ट्राच्या तमाम दीपस्तंभांचा कधी नव्हे एव्हढा अवमान या भुमीवर झाला.केवळ सत्तेसाठी आसूसलेल्या कथित

लोकन्यूज २४ Live : दुपारच्या बातम्या… महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांचा आढावा… (Video)
मंत्रीपरिषद विस्ताराचा अर्थ !
महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोनाची लाट कायम

आज अवघ्या महाराष्ट्राने मान शरमेने खाली घातली.महाराष्ट्राच्या तमाम दीपस्तंभांचा कधी नव्हे एव्हढा अवमान या भुमीवर झाला.केवळ सत्तेसाठी आसूसलेल्या कथित जनसेवकांनी या महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवली.राजकारणातील साधन शुचिता उकळून तीचा चोथा केला.या राजकारण्यांना अक्षरशः कंबरेचे सोडून डोक्यावर घेण्याचेही भान ठेवले नाही.पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात जो अश्लाघ्य प्रकार घडला त्याची महाराष्ट्राच्या भौगोलीक,राजकीय,सामाजिक,सांस्कृतीक जडणघडणीत ज्यांनी संसारावर तुळशीपञ ठेवून हयात खर्ची घातली त्या प्रत्येकाची आज घोर निराशा झाली असेल. जिथून कुठून त्यांचा पुण्यात्मा हा सारा तमाशा पहात असेल त्यांच्या तोंडून सहजपणे याची केला होता का अट्टाहास? असा प्रश्न स्वतःसाठी नक्कीच पडला असेल. महाराष्ट्राची राजकीय परंपरा नेहमीच अजात शत्रू या धारणेवर विकसीत होत आली आहे,त्याचे दृश्य अदृश्य परिणाम विधीमंडळाच्या सभागृहातूनही सकारात्मकपणे उमटले आहेत.सभागृहात एखाद्या मुद्यावर कितीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी त्याचे प्रतिबिंब सभागृहाबाहेरच्या वातावरणात कधीही उमटले नाहीत.राज शिष्टाचाराच्या मर्यादा सांभाळूनच सन्माननीय सदस्यांनी आपली भुमिका मांडली आहे.महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात अनेक जेष्ठ सदस्यांनी ऐतिहासिक कामगीरी नोंदवल्याची नोंद आहे,त्यांच्याही कारकिर्दीत कितीतरी वेळा बाका प्रसंग उभे राहिल्याचे दाखले उपलब्ध आहेत.मात्र सभागृहात सर्वोच्च सर्वाधिकारी असलेल्या घटनात्मक पदाची मानहानी झाल्याचा दाखला उपलब्ध नाही.
भारातीय जनता पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी मात्र ही श्रीमंत परंपरा धुळीला मिळवल्याचे जगाने पाहीले.मुळात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू होत असताना काहीतरी वेगळे घडवून आणण्याचा भाजपचा इरादा देहबोलीतून प्रारंभापासूनच पाझरत होता.विशेषतः ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात ना.भुजबळ हे ठराव सादर करीत असतानाच त्यात खोडा खालण्याचा इरादा सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांच्या हरकतीने स्पष्ट झाला होता.सभागृह कामकाजाची नियमावलीविषयी सतत प्रबोधन करण्याच्या तयारीत असलेले फडणवीस इथे मात्र स्वतःच शिरस्ता तोडू पहात होते.ठरावच दाखल नसताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचे औचित्य काय? तरीही सन्माननीय अध्यक्षांनी त्यांचा मान ठेवून बोलण्याची संधी दिली.स्मशान शांततेत बोलणे झाल्यानंतर मंत्र्यांचे उत्तर तेव्हढ्याच शांततेत ऐकण्याइतकी संवेदनशीलता विरोधकांनी दाखवली नाही. नामदार अध्यक्ष ठरावाचे वाचन करीत असतानाच काही सदस्य हौदात उतरून अध्यक्षांसमोर गोंधळ करू लागले.माईकची ओढाताण करू लागले.वारंवार ताकीद देऊनही गोंधळ थांबत नाही म्हणून प्रथेप्रमाणे अध्यक्षांनी कायकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. गोंधळानंतर तहकूब झालेले कामकाज पुन्हा सुरू होते तेंव्हा ज्या मुद्यावरून तहकूबी झाली तो मुद्दा नव्याने चर्चेत येत नाही.हा शिष्टाचार आहे.मात्र साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या मंडळींनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन शिवीगाळ धक्काबुकी करून संस्कृतीचा परिचय दिला,आणि इथेच सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. अध्यक्षांनी आपले अधिकार वापरून बारा सदस्यांना वर्षभरासाठी निलंबीत केले आहे.वर्षभर हे सन्माननीय सभागृहाच्या आवारात येऊ शकत नाहीत.याचाच दुसरा अर्थ या वर्षभरात विरोधकांचे संख्याबळ बारा ने कमी झाले आणि सरकारची स्थिरता वर्षभरासाठी भक्कम झाली असाही काढला जाऊ शकतो,अर्थात हे निलंबन मागे घेण्यासाठी विरोधक अध्यक्षांना प्रस्ताव देऊ शकतात.तो प्रस्ताव नाकारला गेला तर न्यायालयात दाद मागीतली जाऊ शकते.हंगामी अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांनी दाखवलेली तांत्रिक प्रगल्भता लक्षात घेता न्यायालयाही विरोधकांच्या हाती काही खास लागेल असे वाटत नाही.कदाचित नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही निलंबन मागे घेतले जावे म्हणून प्रस्ताव येऊ शकतो.जरतर मध्ये काहीही घडू शकते हे खरे असले तरी तुर्तास महाराष्ट्र शरमेने हिरमुसला आहे हे नक्की.

COMMENTS