भाजपाला सलग सात वर्ष सर्वाधिक देणग्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाला सलग सात वर्ष सर्वाधिक देणग्या

राजकीय पक्षांना सामान्य जनता, कंपन्या, संघटना, संस्था आर्थिक स्वरूपात देणग्या देत असतात. प्रत्येक पक्षानुसार या देणग्यांचे आकडे बदलत असतात.

नाशिक मनपा नोकरभरतीत स्थानिक रहिवासी असणे गरजेचे 
तब्बल 48 हजार वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू सापडला रशियात
सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीलः शरद पवार

नवीदिल्लीः राजकीय पक्षांना सामान्य जनता, कंपन्या, संघटना, संस्था आर्थिक स्वरूपात देणग्या देत असतात. प्रत्येक पक्षानुसार या देणग्यांचे आकडे बदलत असतात. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपाला मिळणार्‍या देणग्यांचे आकडे सर्वाधिक राहिले आहेत. यंदादेखील भाजप देणग्या मिळवण्याच्या यादीत देशातील इतर सर्वच पक्षांच्या पुढे राहिला आहे. 2019-20 या वर्षात भाजपला मिळालेल्या देणग्यांचा आकडा तब्बल 750 कोटींच्या घरात आहे. याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा हा आकडा तब्बल पाचपटींहून अधिक आहे. सलग सात वर्षे देशात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळत असून याही वेळी भाजपच अव्वल स्थानावर आहे. 

राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. देशातील इतर पक्षांच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या देणग्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. आकडेवारीची तुलना केली असता देशात सर्वाधिक 750 कोटी रुपयांची देणगी भाजपला मिळाली असून याच काळात काँग्रेसला 139 कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला 59 कोटी, तृणमूल काँग्रेसला आठ कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 19.6 कोटी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 1.9 कोटी रुपये इतक्या रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. भाजपाला देणगी देणार्‍या कंपन्यांमध्ये भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या मालकीची ज्युपिटर कॅपिटल (15 कोटी), आयटीसी ग्रुप (76 कोटी), आधीची लोढा डेव्हलपर्स आणि आत्ताची मॅक्रोटेक डेव्हलपर्स (21 कोटी), बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी (35 कोटी), प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट (217.75 कोटी) आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट (45.95 कोटी) यांचा समावेश आहे. भाजपला सुधाकर शेट्टी यांच्या गुलमर्ग रिएल्टर्सकडूनदेखील ऑक्टोबर 2019मध्ये जवळपास 20 कोटींची देणगी मिळाली आहे. जानेवारी 2020मध्ये ईडीने सुधाकर शेट्टी यांची कार्यालये आणि घरांवर छापे टाकले होते. भाजपला मोठ्या प्रमाणावर देणगी देणार्‍यांमध्ये देशातील 14 शिक्षणसंस्थांचादेखील समावेश आहे. दिल्लीच्या मेवाड युनिव्हर्सिटीने दोन कोटी, कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंगने दहा लाख, सुरतच्या जी. डी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल व रोहतकच्या पठानिया पब्लिक स्कूलकडून प्रत्येकी अडीच लाख, भिवानीच्या लिटल हार्ट्स कॉन्व्हेंट स्कूलकडून 21 हजार तर कोटाच्या अ‍ॅलन करिअरकडून 25 लाखांची देणगी भाजपला मिळाली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (5 लाख), राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर ( 2 कोटी), अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू (1.1 कोटी) किरण खेर (6.8 लाख), मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे संचालक टी. व्ही. मोहनदास (15 लाख) यांचादेखील भाजपच्या देणगीदारांमध्ये समावेश आहे.

खरी रक्कम साडेसातशे कोटींहून अधिक

देणगीदारांची ही नावे आणि रक्कम ही फक्त ज्यांनी 20 हजारांहून जास्त देणगी दिली त्यांचीच आहेत. त्याखालची रक्कम देणार्‍या देणगीदारांची रक्कम यात समाविष्ट केल्यास हा आकडा 750 कोटींपेक्षा जास्त होऊ शकतो. तसेच, पक्षाच्या इलेक्टोरल बॉण्ड्समधून मिळणारे उत्पन्न अद्याप निवडणूक आयोगाकडे सादर झालेले नसल्यामुळे ती रक्कमही यामध्ये भर घालू शकते. या रकमेचे ऑडिट निवडणूक आयोगाला सादर करण्याची मुदर 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

COMMENTS