भाजपत बंडाचे मतलबी वारे

Homeसंपादकीय

भाजपत बंडाचे मतलबी वारे

भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. या पक्षात बंड होऊ शकत नाही, असे सांगितले जात असले, तरी पक्षांतर्गत गटबाजीने आता या पक्षालाही ग्रासले आहे.

राष्ट्रीय दर्जा का गेला ? 
वेळकाढूपणामुळेच आजची परिस्थिती
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट?

भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. या पक्षात बंड होऊ शकत नाही, असे सांगितले जात असले, तरी पक्षांतर्गत गटबाजीने आता या पक्षालाही ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे कणखर नेते असतानाही पक्षात बेदिली, गटबाजी, दुफळी आहे. उत्तराखंडमध्ये नेतृत्वात बदल करण्यात आला. कर्नाटकमध्ये आमदारांनी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करूनही त्यांना मात्र भाजपने अभय दिले. 

    भाजपने मंत्री, मुख्यमंत्रिपदासाठी 75 वर्षांची वयोमर्यादा घालून दिली असली, तरी येदियुरप्पा यांच्याबाबतीत ते नियम डावलण्यात आले. एका ठिकाणचे बंड शमविण्यात यश आले, तर अन्य तीन ठिकाणी बंडाचे वारे वाहायला लागले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजप सोडणार्‍यांची संख्या वाढली आहे. तिथे भाजपत असलेल्यांनीच भाजपची संभावना फ्रॉड पक्ष अशी केली आहे. तिकडे जयपुरात प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यातून विस्तव जात नाही. उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात नाराजी असून त्यांच्या दिल्लीवारीनंतर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवायची, याचा निर्णय दिल्लीतून होईल, असे सांगत योगींविरोधात नाराजी प्रदर्शित केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरून जनतेची माफी मागत आहेत. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजप कार्यकर्ते भाजप फ्रॉड पक्ष आहे म्हणत ध्वनिक्षेपकावरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसेच हुगळी जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजप कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे; मात्र भाजपचा असा आरोप आहे, की या सार्वजनिक माफीनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवले आणि धमकावले असणार आहे. या माफीनाम्यामध्ये सांगण्यात आले, की भाजपने गोड बोलून गळ घातली होती; पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवे. सैथियामध्ये तर भाजपचे 300 कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये परतले. भाजपचे माजी युवा मोर्चा मंडल अध्यक्ष तपस साहा सांगतात, की आम्ही चुकून भाजपमध्ये गेलो. आम्ही ममता यांच्या कामाच्या समर्थनार्थ तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहोत. धनियाखलीमध्ये आपल्या आडगेपणाच्या आणि वाईट वर्तनाबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि अनेकांनी आता नव्याने सुरुवात करणार असल्याचे सांगितले. हुगळीमध्ये भाजप नेत्यांनी असा दावा केला, की त्यांच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. राजस्थानच्या राजकीय वर्तुळात आता काँग्रेस पाठोपाठ भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि सतीश पुनीया यांच्या गटात वाद आहे. या वादामुळेच तर तिथे ’ऑपरेशन लोटस’यशस्वी होऊ शकले नाही. राजस्थान भाजप मुख्यालयातील पोस्टरवरून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा फोटो गायब झाला आहे. नव्या होर्डिग्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्याव्यतिरिक्त गुलाब चंद कटारिया आणि सतीश पुनिया यांचे फोटो लावण्यात आले आहेत, तर दुसर्‍या होर्डिंगवर दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो आहेत. वाद झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी होर्डिंग्सवर कोणाचे फोटो लावावेत हा पक्षाच्या कमिटीचा निर्णय असतो. ते कोणत्याही नेत्याचे काम काम नाही. असे बदल होत राहतात. नवीन लोक येतात आणि जुने जातात ही परंपरा आहे, असे सांगताना अप्रत्यक्ष वसुंधराराजे यांच्यावर टीका केली आहे. भाजप आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भाग असणार्‍या वसुंधराराजे यांचा फोटो पोस्टरवरून हटवल्यामुळे समर्थक नाराज झाले आहेत. वसुंधराराजे समर्थक म्हणतात, की राजस्थानात वसुंधरा राजे महत्त्वाच्या नेत्या आहेत. वसुंधराराजेंविना भाजपला राजस्थानात सत्ता मिळवता येऊ शकत नाही. वसुंधराराजे आणि भाजप नेतृत्वामध्ये झालेल्या कलहानंतर वसुंधराराजेंचा फोटो हटवला; परंतु यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिकडे पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे जुने नेते आणि कार्यकत्यार्ंनाही आपल्या ताफ्यात ओढण्याचे काम तृणमूल काँग्रेसने सुरू केले आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत 25 जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे. मुकुल रॉय यांच्या भरवशावर ज्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याबाबत रणनीती आखली जात आहे. आतापर्यंत सब्यासाची दत्ता, राजीव बनर्जी, प्रबीर घोषालसारख्या नेत्यांसोबत मुकुल रॉय यांचा फोनवरून संपर्क झाला आहे. हे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे म्हटले जात आहे. भाजपच्या जुन्या नेत्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे. उत्तर प्रदेशात  

2022 ची विधानसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमे आपले तर्कवितर्क लढवण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजपला जो फिडबॅक मिळाला आहे, त्यानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील अव्यवस्थेचे आरोप आणि आमदार-खासदारांविरोधात असलेल्या नाराजीमुळे पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊ शकते. त्या पार्श्‍व भूमीवर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची सत्ता पुन्हा कशी येईल याबाबत विचार करण्यासाठी लखनऊपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची चर्चा सुरू आहे.

COMMENTS