फडणवीसांची वकिली कुणासाठी?

Homeसंपादकीयदखल

फडणवीसांची वकिली कुणासाठी?

पोलिसांना स्वतंत्रपणे कारभार करू द्यावा, त्यांच्या कारभारात हस्तक्षेप व्हायला नको, असं जे गळा काढून सांगत होते, तेच एखाद्यासाठी रात्री-बेरात्री पोलिस ठाण्याची पायरी चढत असतील, तर त्याला काय म्हणायचं?

सार्वजनिक – खाजगी क्षेत्रासाठी मोदींचा रोडमॅप !
वाचाळवीरांना मुसके बांधण्याची गरज!
पवार-मोदी भेट म्हणजे फडणवीसांना शहच !

पोलिसांना स्वतंत्रपणे कारभार करू द्यावा, त्यांच्या कारभारात हस्तक्षेप व्हायला नको, असं जे गळा काढून सांगत होते, तेच एखाद्यासाठी रात्री-बेरात्री पोलिस ठाण्याची पायरी चढत असतील, तर त्याला काय म्हणायचं? राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी एखाद्याला ताब्यात घेतल्यामुळं त्याच्यासाठी राडा करावा, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसलं. 

सामान्य लोक कायम म्हणतात, की ज्याची बाजू खर्‍याची आहे, त्याची वकिली करावी; परंतु तसं झालं, तर मग ज्याची बाजू खोट्याची आहे, त्याचं वकीलपत्र कुणी घ्यायचं, असा प्रश्‍न उपस्थित होईल. आपला अशील खरा आहे, की खोटा, याचा विचार न करता त्याला न्याय मिळवून देणं हे वकिलाचं काम असतं; परंतु आता राजकीय नेतेही कुणाचीही बाजू घ्यायला लागलेले असतात. त्याचं कारण राजकीय पक्षांच्या निधीत दडलेलं असतं. कंपन्यांनी चांगल्या-वाईचच मार्गानं मिळवलेल्या उत्पन्नातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात. खाल्ल्या अन्नाला जागणं जे म्हणतात, ते हेच असतं, की ज्यांनी पैसे दिले, त्यांना चुकीच्या कामातही पाठिशी घालणं. त्यासाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जात असतात.

पोलिसांच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप जे करतात, तेच पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप करतात, याला काय म्हणावं? रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार हे कळल्यानंतर ती कुणासाठी येणार, त्याचं वितरण कसं होणार, याची माहिती पोलिसांना घ्यावी असं वाटलं असेल, तर त्यात गैर काहीच नाही. पोलिस चौकशीला कुणालाही बोलवू शकतात. ब्रुक फार्माच्या संचालकांना चौकशीसाठी त्याच भावनेनं बोलवलं असेल, तर त्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांना काही गैर वाटायला नको होतं. चौकशी चुकीची असेल, तर त्यावर फडणवीस यांना आवाज उठविण्याचा अधिकार जरूर आहे; परंतु राज्य सरकारच्या कोणत्याही कृतीत गैर आहे, असं फडणवीस यांना वाटायला लागलं असावं. एकीकडं कोरोनाच्या संकटात सरकारबरोबर आहे, असं म्हणायचं आणि दुसरीकडं रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होण्याच्या संशयातून चौकशीला बोलवल्यामुळं आकांडतांडव करायचं, याला काय म्हणायचं? दरेकर यांनी दमणला जाऊन महाराष्ट्रासाठी पन्नास हजार इंजेक्शन देण्याचा चांगला निर्णय घेतला होता, त्यांच्या या चांगुलपणावर त्यांनीच पाणी फेरलं.

मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला रेमडसिवीर इंजेक्शनच्या जादा साठ्याबद्दल चौकशीसाठी बोलविल्यानंतर फडणवीस आणि दरेकर यांनी पोलिस ठाण्यांत जाऊन पोलिस अधिकार्‍यांना जाब विचारला. हे नाटय शनिवारी रात्री उशिरा चांगलंच रंगलं. त्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस, दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचं सूतोवाच केलं आहे. त्याला फडणवीस यांनी कारवाई करून दाखवाच, असं आव्हान दिलं. यावरून त्यांचं निर्ढावलेपण दिसतं. ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत पोलिस ठाण्यात गेले. या वेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब विचारला. एवढंच नाही, तर यादरम्यान भाजप नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्वजण वांद्रे-कुर्ला संकुलातील पोलिस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर ब्रुक फार्माच्या अधिकार्‍याला सोडण्यात आलं. या सर्व घडामोडीमोडींबाबत वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांना दिला. पोलिसांना मुंबईत जवळपास 50 हजार रेमडेसिवीर येत आहेत, याची माहिती मिळाली होती. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावलं. फडणवीस, दरेकर आणि लाड यांनी या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावलं आहे, असा सवाल केला. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली, तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीनं त्यांना बोलावण्यात आलं होतं. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. रेमडेसिवीरचा हा जो साठा आहे, तो नेमका कुठं जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितलं आहे. केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या ओएसडीनं दुपारी फोन करून धमकी दिल्यानंतर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात, या प्रामाणिक हेतूनं आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकार्‍याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे, असं त्यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर या प्रकरणी टीका केली आहे. औषध कंपनीच्या संचालकांना सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला चौकशीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात, असा मलिक यांनी केलेला सवाल रास्तच आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करू नये का, असा सवाल त्यांनी केला. एका व्यावसायिकासाठी फडणवीस व दरेकर मध्यरात्री धावून जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणतात हे आश्‍चर्यकारक आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सापडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध पेटलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका वृतपत्राचं कात्रणच ट्वीट केलं आहे. यात ब्रुक फार्मा कंपनीवरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारनं संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केल्याचं उघडकीस आल्यानंतर आता त्यावर फडणवीस आणि दरेकर यांना काय म्हणायचं आहे? गुजरातनं केलं ते योग्य आणि महाराष्ट्रानं केलं, ते चुकीचे असं तर त्यांना म्हणायचं नाही ना? रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍याप्रकरणी ज्या कंपनीवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, त्या कंपनीचं वकीलपत्र महाराष्ट्रातील भाजपचे नेते घेत आहेत. आव्हाड यांनी ट्वीट करून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ब्रुक फार्मा या कंपनीचं साठेबाजी करणं आणि औषधं काळ्या बाजारात विकणं त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे, असा पुरावाच आव्हाड यांनी दिला आहे.

COMMENTS