पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी -शरद पवार व नितीन गडकरी ही खूप मोठी माणसे आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठ त्यांना डॉक्टरेटशिवाय काय देऊ शकते? हे दोघेजण देशाचे

सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल
ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल
शब्दगंधची ऑनलाइन श्रध्दांजली सभा उत्साहात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी -शरद पवार व नितीन गडकरी ही खूप मोठी माणसे आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठ त्यांना डॉक्टरेटशिवाय काय देऊ शकते? हे दोघेजण देशाचे शायनिंग स्टार अर्थात चमकते व देदीप्यमान तारे आहेत, देशाला त्यांच्या कार्याबद्दल सदैव अभिमान असेल, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी पवार-गडकरी द्वयींचा सन्मान केला. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टरेट पदवी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी कोश्यारी यांनी पवार-गडकरी यांचे भरभरून कौतुक केले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात गुरुवारी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी होते. कार्यक्रमास प्रतिकुलपती (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी) व कृषि आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येेष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सहकार, कृषी, विकास आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यापीठाकडून कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
पवार यांचा सहकार, कृषी, बँकिंग, समाजकारण यातील अनुभव आणि कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्याकडे कुणीही यावे आणि या विषयावर बोलावे, त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. त्याच बरोबर गडकरी हे सर्वक्षेत्रातील मातब्बर आहेत. हातात घेतलेले काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे त्यांच्याकडून शिकावे. पंतप्रधान मोदी आणि गडकरी यांच्यात जणू नवनव्या योजना देशासाठी आणणे यात जणू स्पर्धा असते असे वाटते, असे गौरवोदगार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ,विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते. दीक्षांत भाषण डॉ. राठोड यांनी केले. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की,अशिक्षित,कष्टाळू आणि मातीला जागणारा शेतकरी हा कृषी विद्यापीठांचा आधार आहे. तो अडाणी असला तरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. विद्यापीठाने आता मातृभाषेत कृषी आणि कृषी तंत्रज्ञान शिकवले पाहिजे, ही काळाची गरज आहे, यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून ते म्हणाले, कोरोना साथ रोगात सर्व देश, उद्योग ठप्प झाले होते, मात्र कृषी उद्योग हा अविरत सुरू राहिला आणि देशाचे अर्थचक्र त्यामुळे सुरळीत राहिले, हे या देशातील शेतकर्‍यांचे देशाप्रती समर्पण आहे. त्यामुळे कृषी उद्योगाला कमी लेखू नका, आपल्या पूर्वजांनी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे उगाच सांगितलेले नाही, यावर कृषी विद्यापीठातून पदवी घेतलेल्या स्नातकांनी लक्ष दिले पाहिजे आणि आपले शिक्षण आणि अनुभवाचा वापर कृषी क्षेत्रासाठी केला पाहिजे, हे आपले कर्तव्य समजले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी कृषिमंत्री भुसे म्हणाले, कृषीची पदवी मिळविल्यानंतर त्यातील फक्त 10 ते 15 टक्के विद्यार्थी कृषीशी संबंधित क्षेत्रात कार्यरत राहतात. विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले क्षेत्र कुठलेही निवडा परंतु ज्या कृषीचे शिक्षण तुम्ही घेतले, त्या कृषिक्षेत्राशी तसेच शेतकर्‍यांशी प्रामाणिक राहुन शेतकर्‍याला संपन्न बनविण्यासाठी तुमचे सर्वोच्च योगदान द्या, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. राठौड दीक्षांत भाषणात म्हणाले की, कृषि शिक्षण हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी पदवी मिळविल्यानंतर उद्योजक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. कृषि शिक्षण अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्रातील गरज लक्षात घेवून त्याप्रमाणे बदल करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषि पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. गेल्यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे नऊ वाण, तीन कृषि यंत्रे व औजारे आणि एकूण 63 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकर्‍यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विस्तार शिक्षण क्षेत्रात देखील विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, साईबाबा विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. नरेंद्र दराडे, आ. किशोर दराड तसेच दत्तात्रय उगले, दत्तात्रय पानसरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य व दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विद्या शाखेचे उपकुलसचिव विजय दाभाडे आदींसह सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बापूसाहेब भाकरे आणि डॉ. भगवान देशमुख यांनी केले. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थांचे झाले कौतुक
यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. तसेच यावेळी 104 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 628 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 10 हजार 736 विद्यार्थ्यांना पदवी अशा एकूण 11 हजार 468 पदव्या प्रदान करण्यात आल्या. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन 2019-20 मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेली हर्षदा देसले, बी.एस्सी.मध्ये (उद्यान विद्या) प्रथम आलेली सोनाली माने, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला मृणाल मारणे तसेच सन 2020-21 मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेली प्रेरणा खोत, बी.एस्सी.मध्ये (उद्यान विद्या) प्रथम आलेला ऋषिकेश भवर, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला आदित्य जोशी यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

COMMENTS