पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती

अहमदनगर/प्रतिनिधी-पत्रकार समाजात वावरत असतात, त्यामुळे त्यांना समाजात समजणार्‍या घटनांबाबत त्यांनी पालकमंत्र्यांसह प्रशासनाला विचारणा करणे चुकीचे नाह

पर्यटनाच्‍या दृष्टिने पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा विकास करणार. – मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे
जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना लगावला टोला
चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी-पत्रकार समाजात वावरत असतात, त्यामुळे त्यांना समाजात समजणार्‍या घटनांबाबत त्यांनी पालकमंत्र्यांसह प्रशासनाला विचारणा करणे चुकीचे नाही. ते त्यांचे काम आहे. पण म्हणून पालकमंत्र्यांना असे का विचारले असे म्हणून पत्रकारांना नोटिस देणे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांची बुधवारी झाडाझडती घेतली. दरम्यान, दैनिक सामनाचे नगरचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देखणे यांना मनपाने दिलेली नोटीस मागे घेत आहोत व त्यांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत तसेच या नोटिस प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त गोरे यांनी यावेळी दिली. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील रविवारी (15 ऑगस्ट) नगरला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नगर शहरातील कोविड लसीकरणातील त्रुटींबाबत प्रश्‍न उपस्थित केला. लसींची ख़ासगी विक्री होत असल्याच्या चर्चा असल्याचेही स्पष्ट केले. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना चौकशीच्या व दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित मनपा आयुक्त गोरे यांनी शहरातील लसीकरणाबाबत माहिती दिली. पण खुद्द पालकमंत्री मुश्रीफ यांचेही त्यामुळे समाधान झाले नाही व दाल मे कुछ काला असल्याचे दिसत असल्याने याबाबत चौकशी करण्याचे आदेशही दिले. या पार्श्‍वभूमीवर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दैनिक सामनाचे नगरचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देखणे यांना नोटीस बजावून, आयुक्त गोरे यांच्या निर्देशानुसार कोरोना लसींची खासगी विक्री होत असल्याबाबतच्या आपल्या तक्रारीचा तीन दिवसात खुलासा करण्याचे सांगितले. या प्रकारामुळे अहमदनगर प्रेस क्लबसह जिल्हाभरातील पत्रकारांतून संतप्त भावना उमटल्या व पत्रकारांची एकप्रकारे मुस्कटदाबी सुरू असल्याचा दावा केला गेला. पालकमंत्र्यांना काय विचारावे व काय विचारू नये, हे आता मनपा वा जिल्हा प्रशासन पत्रकारांना सांगणार काय, असे सवालही उपस्थित झाले.

परस्पर निघाली नोटीस?
देखणे यांना मनपाने दिलेल्या नोटिशीसंदर्भात अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यम समूहाचे प्रमुख डॉ. अशोक सोनवणे, दैनिक समाचारचे संपादक व शहर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष महेंद्र कुलकर्णी, दैनिक घडामोडीचे संपादक व शहर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बाबा जाधव, दैनिक नगर दवंडीचे संपादक राम नळकांडे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी देखणे आदींसह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच टीव्ही चॅनेलच्या प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मनपा आयुक्त गोरेही उपस्थित होते. यावेळी देखणे यांना मनपाने दिलेल्या नोटिशीबद्दल पत्रकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आयुक्त गोरेंना विचारणाही केली. त्यावेळी बोलताना आयुक्त गोरे यांनी संबंधित नोटीस आपल्याला न विचारता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर यांनी दिली आहे. पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत लसीकरणाबाबत झालेल्या विषयाबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे तसेच प्रश्‍न उपस्थित करणारे देखणे यांच्याशी या विषयावर तोंडी चर्चा करण्याचे त्यांना सांगितले होते. लेखी देऊन त्यांचा खुलासा घेण्याचे सांगितले नव्हते, असा गौप्यस्फोटही आयुक्त गोरे यांनी केला. तसेच आता डॉ. राजूरकर यांना याबाबत नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच देखणे यांना दिलेल्या नोटिशीबाबत दिलगिरी व्यक्त करतो व त्यांना दिलेली नोटीस मागे घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निघाली नोटीस
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी पत्रकारांनी विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी बोलताना प्रेस क्लबचे अध्यक्ष शिर्के यांच्यासह कुलकर्णी. डॉ. सोनवणे, जाधव, लहाडे आदींनी विविध मुद्दे उपस्थित केले. मंत्री वा प्रशासनाला समाजाच्या विविध समस्यांवर प्रश्‍न विचारण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना आहे. समाज जागृती व्हावी व प्रशासनालाही विविध सेवासुविधांमधील त्रुटींची माहिती मिळावी, असा त्यामागे उद्देश असतो. पण पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारल्यावर त्या दिवशी 15 ऑगस्टची सार्वजनिक सुट्टी असताना त्यादिवशी मनपा कार्यालय उघडून व जावक क्रमांक टाकून नोटीस तयार करण्याची दाखवलेली तत्परता मनपाच्या अन्य नागरी सुविधा नागरिकांना देण्याबाबत का दाखवली जात नाही, असा सवालही केला गेला. माध्यमांची भूमिका विद्रोहाची वा टोकाची नसते तर व्यवस्थेतील त्रुटी मांडण्याची व व्यवस्था सुधारून नागरिकांचे जीवनमान सुरळीत होण्यासाठीची असते. अशा स्थितीत मंत्री वा प्रशासनाला प्रश्‍न विचारण्याबाबत नोटीसा निघत असतील तर यापुढे प्रशासनाला विचारून पत्रकारांनी प्रश्‍न विचारावेत काय, असा सवालही केला गेला. यावेळी पत्रकारांच्या भड़ीमारामुळे आयुक्त गोरे निरुत्तर झाले व त्यांनी दिलगिरी व्यक्त करून हा विषय येथेच थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पत्रकारांनीही सामोपचाराने विषय थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत निशांत दातीर, अशोक झोटींग, संदीप कुलकर्णी, सूर्यकांत नेटके, भाऊसाहेब होळकर, उमर सय्यद, शब्बीर सय्यद, बाळासाहेब धस, मिलिंद बेंडाळे, मोहिनीराज लहाडे, राजू खरपडे, सुधीर पवार, दीपक रोकडे, प्रसाद शिंदे, अर्जुन राजापुरे, शुभम पाचारणे, संदीप दिवटे, केदार भोपे, मयूर मेहता, आबिद दुलेखान, बालकुणाल अहिरे, विनय देवतरसे, अतुल लहारे, श्रीराम जोशी, रोहित सोनवणे, सौरभ गायकवाड, मोहसीन अली कुरेशी, अमीर सय्यद, सुशील थोरात, सुभाष चिंधे आदींनी भाग घेतला.

डॉ. भोसलेंनी घेतली झाडाझडती
यावेळी बोलताना डॉ. भोसले यांनी मनपाने देखणे यांना विचारलेल्या खुलाशाबद्दल नाराजी व्यक्त केली व आयुक्त गोरे यांची झाडाझडतीही घेतली. समाजाच्या समस्या व प्रश्‍नांबाबत त्रुटी दाखवून प्रशासनावर टीका करणे वा सुविधा आणि प्रश्‍न सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते. पत्रकार समाजात वावरत असल्याने त्यांच्याकडून मांडल्या गेलेल्या मुद्यांचा गांभीर्याने विचार प्रशासनाने केला पाहिजे व त्यातील योग्य सूचना व मार्गगदर्शनाची अंमलबजावणीही केली पाहिजे. पण त्यांना नोटीसा देऊन त्यांचे खुलासे मागणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना नोटीसा देऊन त्यांच्यावर कारवाई करा, देखणे यांना दिलेली नोटीस मागे घ्या. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी त्रुटी दाखवल्याबद्दल त्यांचे स्वागत करून त्या त्रुटी सुधारण्याचे काम करा, अशा सूचनाही डॉ. भोसले यांनी आयुक्त गोरेंना केल्या.

डॉ. राजूरकरांनी व्यक्त केली दिलगिरी
अहमदनगर प्रेस क्लब पदाधिकारी व शहरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादक व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले व आयुक्त गोरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्यानंतर काही वेळातच मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे पत्र सामनाचे जिल्हा प्रतिनिधी देखणे यांना दिले. या पत्रात डॉ. राजूरकर यांनी म्हटले आहे की, कोव्हीड- 19 लसीकरण संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाबाबत दिलेल्या पत्राबाबत आपणास कळवू इच्छितो की, जे पत्र दिले, त्या पत्रामधील मजकूर हा अनावधानाने लिहिला गेला असल्याने त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या. सबब सदरचे पत्र रद्द करण्यात येत असून, ते मी मागे घेत आहे. तरी याबाबत मी व्यक्तीश: दिलगिरी व्यक्त करत आहे, असे स्पष्ट केले गेले आहे व या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व अहमदनगर प्रेस क्लबला देण्यात आल्या आहेत.

COMMENTS