नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या अजूनही सुटल्या नसल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी अद्याप आंदोलन सुरू ठेवले आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब

देशमुख यांना दिलासा ; एक याचिका फेटाळली; लोकप्रियतेसाठी स्टंट
आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार
PFI च्या नावे भाजप आमदारास धमकीचे पत्र

नाशिक : एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या अजूनही सुटल्या नसल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी अद्याप आंदोलन सुरू ठेवले आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर या, दिवाळीनंतर तुमच्या मागण्या सोडवू असे आश्‍वासन दिले आहे. मात्र कर्मचार्‍यांच्या हातावर ऐन दिवाळीच्या सणांमध्ये तुटपुंजी रक्कम ठेवण्यात येत आहे. यामुळे नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचार्‍यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यातील तीन कर्मचार्‍यांपैकी एका कर्मचार्‍याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार हजार रुपये हाती आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा एसटी कर्मचार्‍यांचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. एसटी कर्मचार्‍यांनी एकीकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार पातळीवर त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, त्यावर अजून ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच इगतपुरी तालुक्यात दोन कर्मचार्‍यांनी आणि कळवणध्ये एका कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनी कर्मचार्‍यांमध्ये पराकोटीचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील दहा कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे एकाने रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर दुसर्‍याने गळफास घेण्याचा. कळवणमध्ये प्रमोद शिवाजी सूर्यवंशी (वय 38 रा. वाजगाव, ता. देवळा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांनी सुट्टी घेतली होती. त्यासाठी पगारी रजेचा अर्ज दिला. मात्र, ही सुट्टी मंजूर झाली नाही. परिणामी हातात फक्त दोन हजारांचा पगार आणि बोनस मिळून फक्त साडेचार हजार रुपये आहे. या पैशात दिवाळी कशी साजरी करायची, घर कसे भागायचे यातून त्यांनी विषारी औषध घेतले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांचावर उपचार सुरू आहेत.एसटी कर्मचार्‍यांना एच. आर. वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढे असतो. तरीही त्याच्यावर अन्याय होतो म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यात दिवाळी तोंडावर 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू करण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. सोबतच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचार्‍यांनी केल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.

सटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे : संदीप शिंदे
एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवण्याचा सध्या एकच मार्ग असून तो म्हणजे, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे होय. मात्र राज्य सरकार जर त्यावर निर्णय घेतला नाही, तर हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेवर मोर्चा काढू असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना वेळेववर वेतन दिले जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचार्‍यांनी प्राणाची आहुती दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उस्मानाबादमध्ये पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगार येथे विविध मागण्यासाठी एसटी कर्मचारी फास गळ्याला लावून झाडावर चढल्याची घटना ताजी असताना आता उस्मानाबाद आगाराच्या कर्मचार्‍याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. इतर कर्मचार्‍यांनी ऐनवेळी आत्मदहन करणार्‍या कर्मचार्‍याला पकडल्याने पुढील अनर्थ टळले. मागील तीन दिवसात आपल्या मागण्यांसाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ आहे.

COMMENTS