नगर जिल्ह्यात मधल्या काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या व कापूस लागवड रखडली आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यात मधल्या काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या व कापूस लागवड रखडली आहे. यंदा आतापर्यंत सरासरीच्या 16 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात अकरा टक्के कापूस लागवड झाली आहे. आतापर्यंत पेरणी झालेले 83 हजार 301 हेक्टर क्षेत्रावरील पिकेही पावसाअभावी अडचणीत आली आहेत.
या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसात अनेक भागात तुरळकसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नगर जिल्ह्यात खरिपाचे सुमारे 5 लाख 50 हजार 317 हेक्टर क्षेत्र आहे. यंदा पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या, लागवडीची तयारीही जोरदार केली. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने सुरू झालेल्या पेरण्या थांबल्या. गेल्या दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने पेरण्याला आता फारसा वेग नाही. आतापर्यंत सरासरीच्या 16 टक्के पेरणी झाली असली तरी पेरलेलेही पावसाअभावी धोक्यात आहे. कापसाची अकरा टक्के लागवड झाली आहे. उडदाची पेरणी मात्र सरासरीच्या पुढे गेली असून, मुग, तुरीची पेरणी ससरासरीच्या अर्धी झाली आहे.
दोन दिवसात पाऊस
वेधशाळेच्या पुणे विभागाच्या संकेत स्थळावर दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तर विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर बहुतांश राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. मान्सूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता जाणवणार नाही. यंदा बदललेल्या हवामानाचाही अनुभव नागरिकांना मिळाला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. चक्रीवादळामुळेही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यांत देशभरात अनेक ठिकाणी पावसाचेच वातावरण होते. त्यानंतर आता मान्सून दाखल झाला आहे. यावेळीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पीक पेरणी क्षेत्र
भात 0
खरीप ज्वारी 0
बाजरी 15635
रागी 0
मका 4093
तूर 7256
मुग 21128
उडीद 18719
भुईमूग 278
तीळ 39
कारळे 5
सूर्यफूल 19
सोयाबीन 4333
कापूस 12183
(क्षेत्र हेक्टरमध्ये)
COMMENTS