7 गावठी कट्टे…8 काडतुसे…3 तलवारींसह 14 जण ताब्यात; श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

7 गावठी कट्टे…8 काडतुसे…3 तलवारींसह 14 जण ताब्यात; श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

अहमदनगर/प्रतिनिधी-शस्त्रांच्या सहायाने गुन्हे करणार्‍या टोळ्यांविरुद्ध जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील दोन-तीन दिवसांच्या विशेष सर्च

कामगारांनीही माथाडी मंडळात लेव्ही भरणा करावा
निळवंडेचे खुले कालवे व चार्‍या लाभक्षेत्रासाठी वरदान ः विलास गुळवे
 बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे दोन करडं ठार

अहमदनगर/प्रतिनिधी-शस्त्रांच्या सहायाने गुन्हे करणार्‍या टोळ्यांविरुद्ध जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील दोन-तीन दिवसांच्या विशेष सर्च ऑपरेशनमध्ये तब्बल 90च्यावर गुन्हेगारांच्या घरी पोलिस फौजफाट्याने छापे टाकून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारींसह 14जणांना ताब्यात घेतले. यातील एकजण अल्पवयीन असून, अन्य 13जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. श्रीरामपूर, नेवासे व राहुरी तालुक्यांमध्ये हे सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, वाळू तस्करी, चोर्‍या, दरोडे असे विविध गुन्हे सर्वाधिक घडणारे तालुके म्हणून नेवासे, श्रीरामपूर व राहुरी प्रसिद्ध आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये शस्त्रांचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे या गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी व संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या तिन्ही तालुक्यांशी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने विशेष सर्च मोहीम राबवली. या तीन तालुक्यांतील रेकॉर्डवरील 82 गुन्हेगारांच्या घरी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. सुमारे चारशेवर पोलिसांचा फौजफाटा यासाठी तैनात करण्यात आला होता. त्यांची वेगवेगळी पथके करण्यात आली होती. गोपनीयता पाळून हे ऑपरेशन राबवण्यात आले. या छाप्यांमध्ये 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व तीन तलवारी सापडल्या. या छापेमारीत 11जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एकजण अल्पवयीन आहे. याशिवाय राहुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील आरोपींच्या घरीही स्वतंत्ररित्या छापे मारण्यात आले. अशा सुमारे 8 ठिकाणी अशी तपासणी केली गेली. या प्रकरणात तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाळू तस्करीशीही संबंध
पकडण्यात आलेल्या 13जणांवर आर्म अ‍ॅक्टनुसार आधीच गुन्हे दाखल आहेत. शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे हे गुन्हे असून, यातील बहुतांश गुन्हेगार वाळू तस्करशी संबंधित आहेत. त्यांच्या घरी जेव्हा पोलिसांनी छापे मारले, तेव्हा काहीजणांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सर्च वॉरंटआधारे कारवाईचे नियोजन केले असल्याने नंतर फारसा अडथळा आला नाही. पोलिसांनी सुमारे सव्वा दोन लाखाची शस्त्रे या कारवाईत जप्त केली. ही शस्त्रे कोठून आणली, कशासाठी आणली, ही शस्त्रे जवळ बाळगण्याचा उद्देश काय होता, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. (सविस्तर वृत्त पान 8वर)

त्यात जिल्हा…नंबर वन
नगर जिल्ह्यात वाळू तस्करीसह चोर्‍या, दरोडे व अन्य गुन्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होतो. त्यामुळे सीआयडीच्या अहवालात नगर जिल्हा गावठी कट्टे वापरणार्‍या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून राज्यात एक नंबरला आहे. अर्थात गुन्हेगारांकडून गावठी कट्टे जप्त करण्याच्या पोलिसांच्या कारवाईतही नगर जिल्हा नंबर वन आहे.

COMMENTS