कुणी घेतेय आ. लंकेंची..तर कुणी देवरेंची बाजू; पारनेरच्या वादाचे राज्यभरात उमटले पडसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुणी घेतेय आ. लंकेंची..तर कुणी देवरेंची बाजू; पारनेरच्या वादाचे राज्यभरात उमटले पडसाद

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेर तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून उफाळून आलेल्या आमदार निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वादाचे पडसाद राज्यभर उमट

राज्यातील मंदिरं 10 दिवसांत उघडा : अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा l DAINIK LOKMNTHAN
शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी स्वयंचलीत तंत्रज्ञानाचा वापर करवा- कुलगुरू पाटील
Parner : पारनेरला तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार? : लोकायुक्तांकडे तक्रार l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेर तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून उफाळून आलेल्या आमदार निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वादाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. यात कुणी आ. लंकेंची बाजू घेत आहे तर कुणी तहसीलदार देवरेंना पाठिंबा देत आहे. या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार संघटनेने सोमवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे तर महाराष्ट्र राजपत्रित संघटनेनेही देवरेंसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली आहे. दरम्यान, पारनेर तालुका महसूल संघटनेच्या 41 सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवले असून, तहसीलदार देवरे यांच्याकडून मनमानी व दडपशाही होत असल्याची तक्रार केली आहे.
तहसीलदार देवरे यांची सुसाईट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर व त्यात त्यांनी आ. लंके यांच्यावर निशाणा साधल्यावर अनेक संघटना सक्रिय झाल्या आहेत. मनसेने देवरे यांना पाठिंबा दिला तर येथील स्मायलिंग अस्मिता संघटनेने देवरेंवर टीका करताना अडचणीत आल्यावर मराठा असल्याची जाणीव त्यांना झाल्याचा दावा केला. त्यानंतर आ. लंके व देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपापली बाजू मांडली. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातूनही या विषयावर पडसाद उमटू लागले आहेत.

पोलिसांनी घेतली दखल
तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात चौकशी करण्यासाठी व त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांचे एक पथक पारनेरला गेले होते, असे सांगण्यात आले. या संदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात यापूर्वीच पारनेरच्या पोलिस निरीक्षकांनी त्यांची भेट घेतली होती. यात देवरे यांनी मी आत्महत्या करणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा आमच्या गृह विभागाच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनाही त्यांच्याकडे पाठविले होते. सोनवणे यांची देवरे यांच्याशी चर्चा झाली. देवरे यांनी स्पष्टपणे, मी असे काही करणार नाही. मी माझे कार्यालयीन कामकाज करत आहे. माझा आता असा कोणताही विचार नाही. माझ्याकडून आत्महत्येच्या विचारात काही बोलले गेले होते, पण माझ्या डोक्यात असे काही विचार सध्या नाहीत, असे देवरे यांनी सोनवणे यांच्याकडे स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षाही देवरे यांनी पोलिसांकडे दाखविली आहे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

नेमले चौकशी पथक
तहसीलदार देवरे ऑडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्रिसदस्यीय समिती तयार केली आहे. या समितीच्या अध्यक्ष पुनर्वसन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ या आहेत तर सदस्य म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड सदस्य आहे. या समितीने देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू केली आहे.

संघटना झाल्या सक्रिय
देवरे यांच्या समर्थनात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे. यात देवरे प्रकरणी राज्यस्तरावरून वरिष्ठ महिला अधिकार्‍यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तात्काळ स्थापन करून या समितीमार्फत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. तसेच सोमवारी (23 ऑगस्ट) राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांना निवेदन देऊन देवरे यांचा सातत्याने मानसिक छळ करून त्रास देणार्‍या सामाजिक व राजकीय घटकांवर कारवाई करावी तसेच देवरे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, की पारनेरच्या तहसीलदार देवरे या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना त्यांना काही स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि खंडणीखोर समाज कंटकांनी मानसिक आणि शारीरिक वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. कोविड आपदग्रस्त स्थितीत प्रशासकीय कामकाज बजावत असताना काही खंडणीखोर समाजकंटकांना खंडणी उकळताना कायदेशीररित्या प्रतिबंध करण्याचा धिरोदात्त प्रयत्न या महिला प्रशासकीय अधिकार्‍याने केला आहे. राजकीय नेतृत्वाने आणि वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने अशा परिस्थितीत अधिकार्‍याच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्यांचे मनोधर्य उंचावणे गरजेचे आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

त्या अहवालाचीही चर्चा
तहसीलदार देवरे यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांना एक कसुरी अहवाल पाठवला असल्याने तोही आता चर्चेत आला आहे. देवरे यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल पाठवून कारवाईची शिफारस केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. प्रशासनाकडून मात्र अधिकृतपणे याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. काही प्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे तसेच अवैध वाळू उपसा, अकृषक प्रकरणे अशा काही प्रकरणांत अनियमितता आढळून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आल्याचे बोलले जाते. एकूण 16 तक्रारी आणि मुद्द्यांवर ही चौकशी होऊन त्यातील जमीन वाटप, अवैध वाळू प्रकरणी दंड आणि साठा जप्ती करण्यात हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकरणांत देवरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला तसेच देवरे यांनी सरकारी कामात नितांत सचोटी आणि कर्तव्यपरायणता ठेवलेली नाही, कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे, असेही काही मुद्दे यात असल्याचे समजते.

देवरेंना न्याय मिळावा-देसाई
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप गंभीर आहे. त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. त्यांची दीपाली चव्हाण होता कामा नये, जिवंतपणीच देवरे यांना न्याय मिळावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. देवरे यांनी लोकप्रतिनिधींवर आरोप केले आहेत. त्यांची तातडीने चौकशी व्हायला हवी. देवरे यांनी लिहिलेली हकीगत योग्यच आहे. एखादी महिला जर चांगले काम करून आपल्या पुढे जात असेल तर नक्कीच तिला दीड शहाणी, आगाऊ असे म्हटले जाते. देवरे यांना ज्या लोकप्रतिनिधीने त्रास दिला आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. मात्र ही चौकशी जर लोकप्रतिनिधी लावणार असतील तर ती कधीच नि:पक्षपातीपणे होणार नाही, अशी भूमाता ब्रिगेडची भूमिका आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

वरिष्ठांद्वारे चौकशी करा-डॉ. गोर्‍हे
तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांतर्फे करावी अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. यासंदर्भात देवरे यांच्याशी डॉ. गोर्‍हे यांनी स्वतः संपर्क केला. त्यानंतर गोर्‍हे यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले आहे. देवरे प्रकरणात विभागीय आयुक्त स्तरावरील चौकशी चालू असून महसूल विभागामार्फतदेखील या घटनेमध्ये लक्ष घालण्यात आलेले आहे. नगरचे जिल्हाधिकारी भोसले यांच्याशी डॉ.गोर्‍हे यांनी संपर्क करुन या प्रकरणाचा आढावा घेतला. देवरे यांच्या प्रकरणात महिला अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू आहे. येत्या सात दिवसात अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती भोसले यांनी डॉ. गोर्‍हे यांना दिली. या प्रकरणावर बोलताना लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांमध्ये काही वेळा मतभेद निर्माण होतात. कधी कधी विशेष हक्कांचा प्रश्‍नदेखील तयार होतो. दुसर्‍या बाजूला प्रशासनातील काही लोकं महिला अधिकार्‍यांवर किंवा इतरांवर कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल. या दृष्टीकोनातून या चौकशीमधील तपशीलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोर्‍हे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी-थोरात
पारनेरच्या तहसीलदार देवरे यांच्या व्हायरल झालेल्या ’त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये नेमका कोणाचा दोष आहे हे तपासून पाहण्यात येणार असून विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. थोरात म्हणाले की, या प्रकरणाचे नेमके स्वरूप काय आहे ? ही ऑडिओ क्लिप कशासाठी तयार केली ? यात कोणाचा दोष आहे याची तपासणी करण्यात येणार आहे.

COMMENTS