कारखान्यांची दुहेरी कर आकारणी होणार रद्द; महसूल मंत्री थोरातांची उद्योग मंत्री देसाईंशी चर्चा, नगरच्या उद्योजकांना दिलासा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारखान्यांची दुहेरी कर आकारणी होणार रद्द; महसूल मंत्री थोरातांची उद्योग मंत्री देसाईंशी चर्चा, नगरच्या उद्योजकांना दिलासा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या नागापूर एमआयडीसीमधील कारखानदारांकडून परिसरातील ग्रामपंचायतींसह औद्योगिक विकास महामंडळाकडूनही होणारी दुहेरी कर आकारणी आता

इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 
कोपरगावमध्ये डिझेल चोरी करणारे जेरबंद
कोरेगावमध्ये बिबट्याने घेतला कुत्र्याचा बळी ; वासरू जखमी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या नागापूर एमआयडीसीमधील कारखानदारांकडून परिसरातील ग्रामपंचायतींसह औद्योगिक विकास महामंडळाकडूनही होणारी दुहेरी कर आकारणी आता रद्द होण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मुंबईत भेट घेऊन या दुहेरी कर आकारणीसह नगरचे अन्य औद्योगिक प्रश्‍न मांडले. त्यावर त्यांनी ते सोडवण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाहीचे आदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. नगर एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मागील महिन्यात 10 जुलैला महसूल मंत्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व आमी संघटनेचे सदस्य असलेल्या उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकांचे विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्याच्या दृष्टीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी थोरात यांना साकडे घालून उद्योजकांचे प्रश्‍न सोडण्याची मागणी यावेळी केली होती. या बैठकीत थोरात यांनी उद्योजकांना न्याय देण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार करेल, असे सांगून मंत्रालयामध्ये यासंदर्भात उद्योग मंत्री देसाई यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दिली होती.

आधी पत्रव्यवहार, मग बैठक
नगच्या औद्योगिक प्रश्‍नांबाबत मंत्री थोरात यांनी उद्योग मंत्री तसेच संबंधित प्रश्‍नांच्या अनुषंगाने त्या-त्या विभागांच्या अधिकार्‍यांशी पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर मागील बुधवारी (25 ऑगस्ट) मंत्रालयात मंत्री थोरात यांनी उद्योग मंत्री देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उद्योजकांच्या प्रश्‍नावर चर्चा केली. यावेळी एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उद्योजकांच्या अनेक मागण्या सकारात्मकरित्या मार्गी लावण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत नगर एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलची भूखंड क्रमांक 36 वर उभारणी करून या ठिकाणी ट्रक चालकांसाठीच्या पार्किंग व्यवस्थेसह सुविधा केंद्र उभे करणे, सुलभ शौचालय, स्नानगृह, भोजनालय उभे करणे यासह आराखडा सादर करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना यावेळी करण्यात आल्या.

एकच कर आकारणी होणार
नाशिकला एमआयडीसीच्या विभागीय अधिकार्‍यांचे कार्यालय असल्याने नगरमधील उद्योजकांना विविध कामांसाठी सातत्याने नाशिकला खेट्या घालाव्या लागतात. उद्योजकांचा हा त्रास दूर व्हावा यासाठी नगर एमआयडीसीतील एरिया मॅनेजर यांना अधिक अधिकार देत उद्योजकांना नाशिकला जावे लागणार नाही, यासंदर्भात देखील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना देण्यात आली आहे. दुहेरी कर आकारणीच्याबाबतीमध्ये उद्योजकांनी प्रश्‍न मांडला होता. ग्रामपंचायत व औद्योगिक विकास महामंडख या दोन भिन्न यंत्रणांकडून कर संकलित करण्याऐवजी यापैकी एकाच यंत्रणेकडून कर संकलित करून तो एमआयडीसी प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये योग्यरीत्या वाटप करण्यासंदर्भामध्ये आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याच्या बाबतीमध्ये उद्योग मंत्र्यांकडून संबंधित अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

आता विस्तारीकरणाचा पाठपुरावा
मंत्रालयात मंत्री थोरात व उद्योग मंत्री देसाई यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली. ते म्हणाले, मंत्री थोरात यांनी पुढाकार घेत नगरच्या उद्योजकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्यामुळे एमआयडीसीमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्‍न मार्गी लागत असल्याबद्दल उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात देखील ना.थोरात यांच्या माध्यमातून उद्योजकांना कायम सर्वतोपरी साहाय्य करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, शहर एमआयडीसी विस्तारीकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नगर शहराला उद्योग नगरी करण्याच्या दृष्टीने नगर शहराला लागून असणार्‍या परिसरामध्ये एमआयडीसी क्षेत्राच्या विस्तारीकरणासाठी काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून व मंत्री थोरात यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर पूरक उद्योग निर्मितीसाठी संधी मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

आ. जगताप व काळेंतील संघर्ष पुन्हा रंगणार
नगर एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवण्याच्या श्रेयवादातून राष्ट्रवादीचे नगरचे आ. संग्राम जगताप व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यातील संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. आ. जगताप यांच्या पुढाकाराने उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे शनिवारी (28 ऑगस्ट) जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडे चार वाजता एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात नगर जिल्ह्यातील औद्योगिक सुविधा व अडचणींविषयी बैठक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या काळे यांनी महसूल मंत्री थोरात व उद्योग मंत्री देसाई यांच्यातील नगरच्या औद्योगिक प्रश्‍नांबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीची माहिती तटकरे यांच्या दौर्‍याच्या मुहूर्तावर जाहीर केली तसेच यानिमित्ताने शहर काँग्रेसने मांडलेल्या औद्योगिक प्रश्‍नांची माहितीही स्पष्ट केली. एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय अहमदनगर येथे पुर्ववत सुरू करणे, एमआयडीसी करिता स्वतंत्र महावितरण कक्ष सुरू करणे, ग्रामपंचायत कराची वसुली ग्रामपंचायतीच्यावतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करणे, जिल्ह्यासाठी सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालय पुणे येथे जोडणे व नगर येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रक व अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनल उभारणे आदी प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी मंत्री थोरातांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे आता नगरच्या एमआयडीसीवरून नगर शहराचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

COMMENTS