कर्मचारी संपावर.. तहसीलदार मात्र एकट्या कामावर; पारनेरमध्ये आ. लंके-देवरे वाद दिवसेंदिवस चिघळण्याच्या मार्गावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मचारी संपावर.. तहसीलदार मात्र एकट्या कामावर; पारनेरमध्ये आ. लंके-देवरे वाद दिवसेंदिवस चिघळण्याच्या मार्गावर

पारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करीत

आ. लंके व देवरेंनी समन्वयाने काम करावे; अधिकारी महासंघाच्या कुलथेंचा सल्ला
आमदार निलेश लंके यांच्याशी झालेल्या वादानंतर तहसीलदार ज्योती देवरे पहिल्यांदाच बोलल्या…I LOK News24
तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष

पारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करीत संप सुरू केला आहे. तर दुसरीकडे नागरिकांची कुठलीही कामे अडू नये म्हणून स्वतः तहसीलदार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार व इतर अधिकारी नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत. एकीकडे कर्मचारी संपावर असताना देखील नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून स्वतः तहसीलदार कर्मचार्‍यांच्या भूमिकेतून नागरिकांची कामे मार्गी लावत असल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय झाला आहे. तहसीलदार देवरे मनमानी व दडपशाही करीत असल्याचा आरोप करून महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी, कारकून व इतर असे 41 कर्मचारी काम बंद आंदोलनात 25 ऑगस्टपासून सहभागी झालेले आहेत. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाबाबत तहसीलदार देवरे यांना कुठलीच लेखी कल्पना अथवा तक्रार मिळाली नसल्याचे देवरे यांनी सांगितले. कर्मचारी जरी संपावर असले तरी नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नसून मी स्वतः तसेच नायब तहसीलदार अविनाश रणदिवे व माळवे यांच्यासह इतर अधिकार्‍यांच्यामदतीने नागरिकांची कामे मार्गी लावत आहोत. महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू असून नागरिकांचे कामे अडून राहतील असा गैरसमज नागरिकांमध्ये असला तरी तसे काही न होता आम्ही स्वतः तहसीलदार व नायब तहसीलदार नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही. नागरिकांनी गैरसमज करू नये. कोणाची काही कामे असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही तहसीलदार देवरे यांनी केले आहे.

रुग्णालयाचे कामही सुरू
पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे देखील कामकाज तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. उंद्रे या 6 ऑगस्टपासून ग्रामीण रुग्णालयात हजर नाहीत तसेच दुसर्‍या मेडिकल ऑफिसर सुद्धा काम सोडून गेल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात अनेक कोव्हीड रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांचे उपचारासाठी हाल होऊ नये म्हणून तहसीलदार देवरे यांनी इतर डॉक्टरांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयातील कामकाज सुरळीत ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादात इतर कर्मचार्‍यांना संप करायला लावणे अतिशय चुकीचे आहे. दडपशाही होत असेल तर प्रशासनात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याची व्यवस्था आहे. परंतु तसे न करता रस्त्यावर उतरणे, हे सेवानियमांचे उल्लंघन आहे. अशा तलाठ्यांना तात्काळ निलंबित केले जावे, अशी मागणी पारनेर परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केली आहे.

पारनेरच्या समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे 30 पासून काम बंद
पारनेर तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनीही तहसीलदार देवरे यांच्या मनमानीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आहे. तहसीलदारांच्या मनमानी कारभारास कंटाळून आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सोमवार दिनांक 30 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोविड महामारीमध्ये आम्ही सर्व जीवाची पर्वा न करता समाजाची आरोग्य सेवा करत आहोत. गेली दोन वर्ष आम्ही कुठलीही सुट्टी न घेता स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. परंतु या दोन वर्षाच्या काळामध्ये आमच्या सोबत मनमानीपणे व हुकूमशाही पद्धतीने कारभार करून आमचा मानसिक छळ करत असून वेळोवेळी अपशब्द वापरून तहसीलदार ज्योती देवरे आरोग्य कर्मचार्‍यांचा अपमान करत असतात. वारंवार निलंबनाची धमकी देणे, खासगी पूर्णवाद कोविड सेंटरला काम करण्यासाठी कर्मचार्‍यांवर दबाव आणणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, सोशल मिडीयामध्ये डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे, अशा घटना गेल्या दोन वर्षात वारंवार घडल्या असून वेळोवेळी अर्जाद्वारे जिल्हा परिषद सी.ई.ओ., पारनेर तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविले आहे. तरी त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. आरोग्य आणीबाणी मुळे तसेच परिस्थिती गंभीर असल्याने आम्ही गेल्या दोन वर्ष हे सर्व निमूटपणे सहन करत आहोत. परंतु आता तहसीलदार देवरे या आम्हाला वारंवार धमक्या देत आहेत. तसेच पूर्णवाद भवन कोविड सेंटर येथे घडलेल्या भ्रष्टाचाराबाबत कुठेही वाच्यता केली तर आपणावर निलंबनाची कारवाई करेल, माझ्या अधिकारामध्ये तुम्हाला धडा शिकवेल, माझे अधिकार तुम्हाला माहीत नाहीत अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे तहसीलदार पारनेर यांच्यावर आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

COMMENTS