कांद्यामुळे आनंदाश्रू…घोडेगावला देशात सर्वाधिक आवक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्यामुळे आनंदाश्रू…घोडेगावला देशात सर्वाधिक आवक

कांदा कापला की डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अर्थात ती रासायनिक प्रक्रिया असते. पण कांद्याचे भाव पडले की शेतकर्‍यांच्या डोळ्यांत दुःखाश्रू उभे राहतात.

gevrai : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप l LokNews24
पुरवठा अधिकार्‍याच्या खुर्चीचा ताबा घेतला सेल्समनने
एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप

अहमदनगर/प्रतिनिधी-कांदा कापला की डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अर्थात ती रासायनिक प्रक्रिया असते. पण कांद्याचे भाव पडले की शेतकर्‍यांच्या डोळ्यांत दुःखाश्रू उभे राहतात. मात्र, मागचा शनिवार (19 जून) जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या डोळ्यात कांद्यामुळे आनंदाश्रू उभे करणारा ठरला. नेवासे तालुक्यातील घोडेगाव मार्केटमध्ये राज्यातील सर्वाधिक विक्रमी म्हणजे तब्बल 400 ट्रक कांदा आवक झाली. शिवाय या कांद्याला चांगला भावही मिळाला. 

    कांद्याला भाव मिळाला नाही की तो नेहमी उत्पादकांना रडवतो व दुसरीकडे बाजारात कांद्याचे भाव वाढले की सरकारे अस्वस्थ होतात. कांद्यामुळे केंद्र सरकार पडल्याचा इतिहासही आहे. अशा स्थितीत कांद्याची वाढत असलेली आवक व त्याला मिळत असलेला भाव शेतकर्‍यांसाठी समाधानकारक मानला जात आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतकर्‍यांची कांदा विक्रीही बंद होती. पण आता अनलॉकच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्याने पारनेर, नेप्ती उपबाजार समिती, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव व जिल्ह्यात अन्य ठिकाणीही कांद्यासह भाजीपाला आवक सुरू झाली आहे. मागील शनिवारी नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली होती. 19 जून रोजी घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी 400 ट्रक (74 हजार 870 गोणी) कांदा आवक या एकाच दिवशी झाली आहे. ही आवक राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटपेक्षा सर्वाधिक अशी होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे. छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, कांदा बारदाना विक्रेते, हमाल, ट्रक चालक, टेम्पो चालक आदींना रोजगार उपलब्ध झाला. राज्यात सर्वाधिक कांदा आवक ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आमच्याकडून सदैव शेतकरी हितास प्राधान्य दिले जाते, असे नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.

6 ते 8 कोटीची उलाढाल

एकाच दिवसात राज्यात सर्वाधिक कांदा आवक होणारे घोडेगावचे कांदा मार्केट आता देशभरात प्रसिद्ध झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव उपआवार येथील कांदा मार्केटमध्ये खुली लिलाव पद्धत विक्री नंतर तत्काळ पेमेंट व मालास योग्य भाव यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होते. शनिवारी झालेल्या विक्रमी कांदा आवकनंतर सुमारे 6 ते 8 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल झाली. उन्हाळी कांद्यास प्रति क्विंटल मोठा कांदा 1800 ते 2000, मध्यम मोठा 1600 ते 1800 रुपये, मध्यम माल 1500 ते 1700, गोल्टी 500 ते 1400 रुपये, अपवादात्मक 2300 ते 2500 रुपयाप्रमाणे भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. पुढेही कांदा भावात वाढ होईल, अशी शक्यता कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केली.

COMMENTS