एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

पारनेर/प्रतिनिधी - पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या विरोधात तेथील कर्मचार्‍यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. तहसीलदार देवरे यांची बदली करा किंव

वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल
आमदार निलेश लंके अडचणीत… अधिकाऱ्यांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार… I LOK News24
जिवाणू खते व माती,पाणी परीक्षण मूळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल – ना.गडाख

पारनेर/प्रतिनिधी – पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या विरोधात तेथील कर्मचार्‍यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. तहसीलदार देवरे यांची बदली करा किंवा आमची तालुक्याबाहेर बदली करा, अशी मागणी यावेळी कर्मचारी संघटनांनी केली. देवरे यांच्यासोबत काम करणारे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीच आता देवरे यांच्याविरोधात आंदोलनाला बसले असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची सुसाईड नोट ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संघटनांनी देवरे यांच्याबाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र, पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेने तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाहीचा आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार बुधवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले. तहसील कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी व तलाठी मंडल अधिकारी संघटना यात सहभागी झाली आहे. या दोनही संघटनांनी यापूर्वीच निवेदन देऊन कामबंदचा इशारा दिला होता. यावेळी कर्मचार्‍यांनी तहसीलदार देवरे यांची बदली करा, नाहीतर आमच्या तालुक्याबाहेर बदल्या करा, अशी मागणी केली. या वेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे, तलाठी व मंडलाधिकारी संघटनेचे अध्यक्ष एस. यु. मांडगे, मंडळ अधिकारी सचिन पोटे, पंकज जगदाळे, कदम, पवार आदी मंडख अधिकारी व तलाठी सामील झाले आहेत. देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले केल्याने पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू आहे.

मागण्यांची पूर्तता नसल्याने आंदोलन
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा- पारनेर प्रांताधिकारी सुधाकर भोसले व पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी सर्व कर्मचारी यांची बैठका घेवून कोविड -19च्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील जनतेची ससेहोलपट होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीस मान देवून व तत्कालीन कोविड-19 ची भीषण परिस्थिती पाहता चर्चा करून सर्व कर्मचारी यांनी तत्कालीन आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले होते. परंतु तक्रार अर्जात नमुद बाबींची पूर्तता आजही झालेली नाही. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 व कोव्हीड-19, सेल्टर कॅम्प मध्ये कर्मचारी यांनी स्वत: केलेला खर्च व ग्रामपंचायत निवडणूक 2020 मध्ये कर्मचार्‍यांनी स्वतःच्या खिशातून केलेला खर्च आजही अदा केलेला नाही, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहता तहसीलदार देवरे यांचे महिलांविषयी व सर्व कर्मचारी वर्गाविषयीचे दडपशाहीचे धोरण व चुकीचे कामे करण्याचा दबाव टाकण्याची कार्यपध्दती, नियोजनशून्य कारभार तसेच राजकीयदृष्ट्या सक्रीय होवून कारभार करणे आदी बाबींमुळे सर्व कर्मचारी वर्ग त्यांच्या कारभारास वैतागलेला होता व आजही वैतागलेलाच आहे. आजही तहसीलदार देवरे कर्मचार्‍यांना सूड भावनेची वागणूक देतात, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

अशी दिली जाते वागणूक
पारनेर तहसील कार्यालय येथील दाखल केलेले कलम 155 नुसार दुरुस्ती साठी ऑनलाईन मान्यतेसाठी प्रस्ताव असो अथवा हस्तलिखीत प्रस्ताव असो त्यावर तहसीलदार देवरे महिनोमहिने निर्णय घेत नाही. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी यांना जनतेच्या रोषास नाहक सामोरे जावे लागत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आढावा घेण्यास आले असता कामे न होण्याचे सर्व खापर कर्मचारी यांच्या माथी फोडले जाते. त्यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत कर्मचारी अथवा पथक यांनी कारवाई केलेली अनेक वाहने कुठलाही शासकीय दंड वसूल न करता सोडून आलेली आहेत व तहसीलदार पारनेर यांनी कोटयवधी रुपये रकमेचा शासकीय महसूल बुडविला आहे. त्याविषयी चौकशी व्हावी. कार्यालयीन खर्च निधीतून सन 2019-2020 व 2020-2021 च्या निधीतून कर्मचारी यांना साधी टाचणी देखील पुरविलेली नाही.तहसीलदार देवरे या क्षेत्रीय कर्मचार्‍यांबाबत नागरिकांमध्ये दोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात व वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यास सांगतात, असा दावाही करण्यात आला आहे. याबाबत निवेदनात उदाहरणही देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, दिनांक 29/07/2021 रोजी मौजे वनकुटे ता. पारनेर येथे जिल्हाधिकारी यांचा कोव्हीड आढाव्यानिमित्त दौरा असताना तेथील सरपंच व ग्रामस्थ यांना तलाठी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्याच्या सूचना केल्या. मात्र, तलाठी यांच्या कामकाजाविषयी नागरिकांच्या व सरपंच यांच्या कोणत्याही तक्रारी नसल्या कारणाने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या नाहीत. यावरुन तहसीलदार यांची कर्मचारी यांच्याविषयीची मनातील सूडभावना दिसून येते, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, तहसीलदार देवरे या महिला कर्मचार्‍यांना देखील चांगली वागणूक देत नाही. त्या पारनेरला तहसीलदार म्हणून हजर झाल्यापासून महिलांना वेळी-अवेळी बैठकांना बोलावणे, रात्री उशिरापर्यंत बैठका घेणे, दबाव टाकणे असे प्रकार चालू असतात. त्याबाबत त्यांना विनंती केली असता मीदेखील महिला आहे, असे त्या सांगतात. अशी परिस्थिती पाहता तहसीलदार देवरे या राजकीयदृष्ट्या सक्रीय
असल्यासारख्या वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचार्‍यांना त्याच्या बरे-वाईट परिणामास तोंड द्यावे लागते. तसेच कर्मचार्‍यांना वेगवेगळया प्रकारे धमक्या देत असतात त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांची पारनेर तालुक्यात सध्या काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे, याविषयी साकल्याने विचार करुन एकतर आम्हा सर्व कर्मचार्‍यांची तालुक्यातून बदली करावी किंवा तहसीलदार देवरे यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS