Homeताज्या बातम्या

अभिनेते धमेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

रघुवीर खेडकर, फर्नांडिस, लाड, धिंड यांना पद्मश्री केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला के

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
पुण्यात आगीची मोठी घटना घडली
विद्यार्थिनींच्या सरंक्षणासाठी सर्व शाळांना मिळणार होमगार्ड

रघुवीर खेडकर, फर्नांडिस, लाड, धिंड यांना पद्मश्री

केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सन 2026 साठीच्या प्रतिष्ठित 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह 13 व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर. माधवन, पॅरा-अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. पियूष पांडे, उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्रातील चौधांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. लोककला, वैद्यकीय सेवा, कृषी संशोधन आणि आदिवासी सांस्कृतिक वारसा या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रातील सेवाव्रती डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात मोलाचे योगदान देणारे परभणी जिल्ह्यातील शेतकरी श्रीरंग लाड आणि आदिवासी वारली संस्कृतीचा ठेवा जपणारे पालघरचे ‘तारपा सम्राट’ भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, समाजसेवा, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा व नागरी सेवा आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा गौरव प्रदान केला जातो. दरम्यान, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अन्य मान्यवरांमध्ये मध्य प्रदेशचे भगवंदास रायकर, ओडिशाचे चरण हेम्ब्रम व महेंद्र कुमार मिश्रा, उत्तर प्रदेशचे चिरंजी लाल यादव व डॉ. श्याम सुंदर, जम्मू-काश्मीरचे ब्रिज लाल भट्ट, केरळच्या कोल्लक्कयिल देवकी अम्मा, तमिळनाडूचे ओथूवर तिरुथानी, नागालँडचे सांग्युसांग एस. पोंगेनर, कर्नाटकचे अंके गौड़ा यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यादीत समावेश आहे.

अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा

अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा जपणारे आणि पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर तमाशा मंडळा’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण लोककलेला नवी ओळख मिळवून दिली. तमाशासारख्या पारंपरिक कलेला राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. त्यांच्या या सन्मानामुळे लोककला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैद्यकीय सेवेत आदर्श कार्य : डॉ. अर्मिडा फर्नांडिस

मुंबईतील सायन रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आणि ‘स्नेहा’ (डछएक-) संस्थेच्या संस्थापिका डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली ‘ह्युमन मिल्क बँक’ (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे तसेच झोपडपट्टी भागातील माता व बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य देश-विदेशात प्रशंसनीय ठरले आहे.

कृषी क्षेत्रातील प्रेरणा : श्रीरंग लाड

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. औपचारिक शैक्षणिक पदव्या नसतानाही, अनुभव आणि प्रयोगशीलतेच्या बळावर त्यांनी कापसाच्या उच्च उत्पादनक्षम वाणांचा विकास केला. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, एका सामान्य शेतकर्‍याचा हा राष्ट्रीय सन्मान कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरतो.

आदिवासी संस्कृतीचा जागर : भिकल्या लाडक्या धिंडा

पालघर जिल्ह्यातील वाळवंडे गावचे 90 वर्षीय ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आदिवासी वारली संस्कृतीतील ‘तारपा’ या पारंपरिक वाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सुमारे 150 वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा त्यांनी जपली असून, त्यांच्या कार्यामुळे आदिवासी लोकसंगीताचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचला आहे.

COMMENTS