नेस्को जंबो सेंटरमध्ये दीड हजार रुग्णांची सोय करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेस्को जंबो सेंटरमध्ये दीड हजार रुग्णांची सोय करणार

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या करत संपवली जीवनयात्रा
साळेगाव येथील शंकर विद्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
आजचे राशीचक्र रविवार, १० ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. या वेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त (विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त (पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते. डॉ. अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेल्या कराराची माहिती दिली. 

दरम्यान, या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन- सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे देसाई यांनी मान्य केले व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील असे स्पष्ट केले. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन महापालिका अधिकार्‍यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल. रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. 

डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात यात भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरीक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. नेस्को संकुलात आतापर्यंत एक लाख 17 हजार व्यक्तींचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज सहा हजार व्यक्तींचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

COMMENTS