डंका सर्वत्र पिटला जातोय. गृहलक्ष्मी नवअवतारी देवी आहे. अष्टभूजांनी घरातील आणि ऑफिस- मधील सर्व कामे करत असते. ती आजी, आई, मावशी, आत्या, काकू, बहीण, प
डंका सर्वत्र पिटला जातोय. गृहलक्ष्मी नवअवतारी देवी आहे. अष्टभूजांनी घरातील आणि ऑफिस- मधील सर्व कामे करत असते. ती आजी, आई, मावशी, आत्या, काकू, बहीण, पत्नीच्या रूपात असते. मुलगी नि सुन अशी तिची आधुनिक रुपे. ती आई, आजीप्रमाणे प्रेमळ, आत्या मावशीप्रमाणे व्यवहारी, काकी मामीप्रमाणे रितीरिवाज पाळणारी. पत्नी बहिणीप्रमाणे प्रेमाने भारावून जाणारी, थोड्याशा गोड बोलण्याने मेणासारखी विरघळणारी जशी बाहूलीच.
पण सख्यांनो तुम्ही स्वतःचा एवढा उदोउदो करता,स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा गोडवा गाता असा गोडवा पुरूषांनी कधी गायलाय का? ही स्त्री नवदुर्गा आहे, सहस्त्र करांनी कामे करते,घराबाहेरच्याही जबाबदार्या सांभाळते.तर नाही असेच उत्तर असेल. आपणच स्त्रियां आपल्याविषयी लिहित असतो,बोलत असतो.पुरूषवर्ग असा कधीच शब्द बोलत नाहीत की बाई तू सर्वगुणसंपन्न आहेस. ते त्यांचे श्रेष्ठत्व सादर करतात, मी आहे म्हणून तू सुरक्षित आहेस मी काम करतो तुम्हाला पोसतो. पण ते हेही विसरतात की बाई घरी असते ती का कमी काम करते? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तिचा हात अविरत चालूच असतो. वर्षाचे 365 दिवस ती राबत असते. पण पुरूषवर्ग बोलतो का कधी की बाई 365 दिवस तू काम करतेस ते 364 दिवस करा मी एक दिवस तुझे सारे काम करतो तर नाही! असेच उत्तर मिळेल. स्त्रियांनी जन्माला येतानाच सर्व घरगुती कामांचा, जबाबदार्यांचा ठेका घेतलेला असतो. तिला त्यातून मोकळीक नसते. आपण हे पाहतो की एकाच घरात मुलगा मुलगी असेल तर मुलीला स्वयंपाक, धुणी-भांडी, दळणकांडण सर्व काम शिकवले जाते. तिच्याकडून करून घेतले जाते. परंतु मुलगा मात्र मैदानावर खेळायला रिकामा! असे का? हल्ली तरी मुली शिक्षणाच्या बाबतीत, अर्थार्जनाच्या बाबतीत सर्वत स्वयंभू आहेत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडल्या आहेत आणि स्वकमाई करत आहेत. मग घरातले सर्व कामांचा वाटा तिनेच का उचलावा? पुरुषांनी का नाही? घरातील ज्येष्ठ व्यक्ती देखील स्त्रीलाच काम सांगत असते. पुरुषांनी टीव्ही बघत, मोबाईलवर खेळत किंवा गप्पा मारत दिवाणखान्यात बसायचे आणि स्त्रियांनी मात्र दळणकांडण, नीट निवडा अशी सर्व कामे स्वयंपाक घरात बसून करायची! स्त्री जातीवर हा जन्मल्यापासूनच अन्याय होत आहे.
या अन्यायाला वाचा कोणी फोडायची? सर्वत्र पुरुषांची मक्तेदारी असताना स्त्रीच्या अन्यायाविरूद्ध कोण आवाज उठवणार ? स्त्रीच स्त्रीची जणू शत्रू आहे. ती आपल्या मुलाला खानदानाचा दिवा समजते. परंतु हा खानदानाचा दिवा तिला शेवटपर्यंत साथ देतो का? स्वतःचे लग्न होईपर्यंत बरोबर तो आईकडून, ताई कडून आपली सर्व कामे करून घेतो. एकदा का लग्न झाले की त्याची आई आणि ताई कडूनची गरज संपते. तो पत्नीकडून सर्व कामे करून घेतो आणि आई, ताईला तांदळातील खड्याप्रमाणे बाहेर फेकून देतो. परंतु मातृहृदय त्या मुलासाठीच तडफडत राहते. ती आपल्या मुलीला मुलगा समजू शकत नाही. मुलगी म्हणजे परक्या घरचे धन! ती दुसर्या घरात जाणार! तिचा आपल्याला काय उपयोग ?अशी मानसिकता जोवर बदलत नाही तोपर्यंत स्त्रीचा पूर्णार्थाने सन्मान होत नाही.आता तर महिला पुरूषांच्या बरोबरीने कार्यालयात काम करत आहेत. ऑफिसमधुन घरी आल्यानंतर घरातील स्वयंपाक, मुलांचा अभ्यासही सर्व त्याच सांभाळत आहेत. पुरुष मात्र कार्यालयातून आला की टीव्हीसमोर बसेल किंवा पलंगावर आडवा होईल. बायकांना अष्टभुजा म्हटले आहे. परंतु कोणतेही काम त्या लिलया पार पाडतात म्हणून. त्यांना ही शरीर आहे, मन आहे, थकवा येतो. या गोष्टीचा विचार पुरुष वर्गाकडून कधी होईल का? म्हणूनच एक सखी या नात्याने मी सांगते जरा स्वतःकडेही लक्ष द्या. आपलं सगळं तरुणपण घर संसार ,’चूल नि मूल’ यातच जाते.यातच चाळीशी गाठली की नटणे,थटणे करायला शोभत नाही. लोकं काय म्हणतील! समाजाला काय वाटेल? त्याच्यामुळे आपण पण फॅशन करायला धजावत नाही. लहानपणापासून जबाबदारीचे ओझे डोक्यावर साठवत ह्या स्त्रिया अशाच वाढत जातात आणि एके दिवशी असे वाटू लागते की आपण काय जीवन जगलो? आपले स्वतःचे जीवन जगायला आपण विसरलोच. म्हणूनच सख्यांनो चूल नि मूल तरी सांभाळाच. परंतु आपलेही जीवन जगा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या हौशी मौजी आपणच पूर्ण करायच्या आहेत. जीवन क्षणभंगुर आणि अनमोल आहे. त्याचा पूर्ण लाभ घेऊया. म्हणजे पुन्हा पश्चातापाची पाळी येणार नाही. पटलं नां सख्यांनो तुम्हांला?
लेखिका : सौ. भारती सावंत, मुंबई
COMMENTS