सत्य प्रेम आणि अहिंसा ही संन्यस्त जीवनाची मूलभूत तत्वे आहे. सन्यस्त जीवनाचा अर्थ होतो की जीवनामध्ये कोणत्याही भौतिक संपत्तीची अथवा लाभाची अपेक्षा न
सत्य प्रेम आणि अहिंसा ही संन्यस्त जीवनाची मूलभूत तत्वे आहे. सन्यस्त जीवनाचा अर्थ होतो की जीवनामध्ये कोणत्याही भौतिक संपत्तीची अथवा लाभाची अपेक्षा न ठेवता कोणत्याही पाशात न टाकता भाषण मुक्त जीवन जगत असताना सर्वसामान्य समाजाला अध्यात्माचा मार्ग, जो अंतर्मुख करणारा आहे, तो समजावून सांगणे, हे अभिप्रेत असते. योग गुरूच्या नावाने देशात अध्यात्मिक नेतृत्वाचं स्वतःलाच करणारे रामदेव बाबा हे कधी राजकारणाच्या विषयावर अनुषंगिक राहिले, ही भारतीय समाजाला समजले देखील नाही. कधीकाळी सत्ता बदलासाठी ज्या रामदेव बाबांनी त्याकाळी जाणवणारी महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या अनुषंगाने थेट सत्ता बदलाचा प्रस्ताव ठेवला होता, आणि जनतेला आव्हान केले होते की, तुम्हाला स्वस्त पेट्रोल – डिझेल आणि स्वस्त वस्तू पाहिजे की प्रचंड महागाई? असे प्रश्नार्थक आवाहन करत थेट सत्ता बदलाचे सूतोवाचही केले होते. मात्र, आज त्याच रामदेव बाबांना हरियानातील कर्नाल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरून प्रचंड राग आला. बाबा केवळ राग येऊनच थांबले नाही तर, त्या पत्रकाराला पुन्हा असा प्रश्न विचारला तर तुझे बरे होणार नाही, अशा शब्दात धमकावले. याचा अर्थ बाबा एका अर्थाने हिंसाचाराला चिथावणी देत आहेत, असाच होतो. शिवाय बाबा अशी चिथावणी देऊनच थांबत नाहीत, तर, ‘मी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते, त्यावर तू माझे काय करून घेणार आहे’, असा उलट प्रश्न पत्रकाराला विचारून बाबांनी किती आक्रमक रूप धारण केले याचा, ‘याची देही याची डोळा’ त्यांनी साक्षी दिली. एकंदरीत ज्या बाबांनी देशाच्या जनतेला विश्वासात घेण्यासाठी ज्या जनतेला महागाई कमी करण्याचीच नव्हे, तर सर्वात स्वस्ताई या देशात निर्माण करण्याची ग्वाही दिली होती, आणि त्यासाठी आपल्या योगगुरू होण्याच्या भूमिकेतून त्यांनी भारतीय समाजाला जे आश्वासन दिले होते, ते आश्वासन बाबा पाळू शकले नाहीत! याची शहानिशा सांगतांना ते सरकारला दोषही देण्यासाठी तयार नाहीत. याउलट सरकारला अनेक कामे करावी लागतात, असे सांगत या महागाई धोरणाचे ते अप्रत्यक्षरीत्या समर्थनही करतात असेच आजपर्यंत दिसून आले आहे. मध्यंतरीच्या काळात रामदेवबाबांनी थोडीफार जनतेच्या हिताची विधाने करायला सुरुवात केली होती. परंतु, त्यावेळी त्यांच्याही बदनामी सत्राला सुरवात झाली होती, आणि हे संकेत पाहताच बाबा नरमले होते. विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे, डिझेल – पेट्रोल सर्वाधिक स्वस्त करण्याचे, जीवनावश्यक वस्तूंच्या कडाडलेल्या किमती अत्यंत कमी करण्याच्या, अशा विविध आश्वासनांची खैरात रामदेवबाबांनी जनतेच्या दरबारात त्या वेळी राजकीय सत्ता बदल करण्यासाठी केली होती. योगगुरु रामदेव बाबांच्या या आवाहनाला भारतीय समाजाने व लोकांनी दुजोरा दिला आणि त्यांचा संदेश प्रत्यक्षात अमलात आणण्याची कृती आपल्या राजकीय मतदानातून त्यांनी व्यक्त केली. परंतु बाबांनी दिलेली आश्वासने जसे कसलेल्या एखाद्या राजकीय नेत्याकडून पाळले जात नाही, त्याच प्रकारचा अनुभव जनतेला बाबांकडून देखील आला. परंतु बऱ्याच वेळा बाबा थेट सत्तेवर नसल्यामुळे त्यांच्याकडून थेट तशी अपेक्षा करणे गैर आहे, असे युक्तिवाद करणारे म्हणतात. परंतु ज्या सत्तेने रामदेवबाबांना पुढे करून त्यांच्या माध्यमातून देशात मतप्रक्रिया घडवली त्या रामदेवबाबांना सत्तेत आलेल्या पक्षाने एवढे दुर्लक्षित करावे, हा देखील एक मासलेवाईक नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल. यावेळी बोलताना रामदेव बाबा हेदेखील म्हणाले की जनतेने अटीतटीच्या काळात अधिक श्रम केले पाहिजे परंतु रामदेव बाबा हे विसरतात की जनतेला रोजगार देण्याच्या प्रक्रियेतच वर्तमान सरकार अपुर्णच पडले नाही तर रोजगारच निर्माण केला गेला नाही, हे उघड सत्य आहे. बाबा स्वतःला संन्यासी असूनही अधिक क्रियाशील म्हणतात. परंतु सन्यास घेऊनही बाबा कॉर्पोरेट व्यापाराच्या उलाढालीत अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विसंगतीही जनतेच्या नजरेत आता येऊ लागली आहे. त्यामुळे बाबांवरचा कमी होत जाणारा विश्वास यामुळे त्यांची चिडचिड होऊ लागली आहे, हेच खरे वास्तव आहे! त्यामुळे आता सर्वसामान्य लोक हा प्रश्न विचारू लागले आहेत की, ‘बाबा को गुस्सा क्यू आता है!’
COMMENTS