कुर्ला बस अपघात प्रकरण, हे जगातल्या कोणत्याही अपघातातील अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबईकरांच्या जीवनात दळणवळणाची साधने ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
कुर्ला बस अपघात प्रकरण, हे जगातल्या कोणत्याही अपघातातील अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबईकरांच्या जीवनात दळणवळणाची साधने ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यातील सर्वात मोठा घटक हा लोकल रेल्वे असून, दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे बेस्टच्या बसेस. या बसेस वरूनच दररोजच्या आपल्या उदरनिर्वाहाच्या साधन असलेल्या स्थळापर्यंत प्रवास करण्याचं एक विश्वसनीय आणि प्रमुख साधन म्हणजे बेस्ट बस! परंतु, कालचा अपघात पाहता जगातील अतिशय भीषण अशा अपघातांपैकी एक आहे; ज्याला मानवी चूक आणि यांत्रिक चूक या दोन्हीही चुकांचं मिश्रण कारणीभूत आहे. संजय मोरे नावाच्या चालकाने केलेला हा अपघात, तो दारू पितो अथवा नाही, स्वतःचा मानसिक तोल गेला की नाही, यापेक्षाही ज्या पद्धतीने हा अपघात झाला आहे, त्याचं गांभीर्य माध्यमांमध्ये चर्चेला यायला हवं! परंतु, चालक असलेला संजय मोरे हा दारू पीतो की नाही, यासाठी त्याच्या कुटुंबाच्या मुलाखती प्रसारमाध्यमं घेत सुटले आहेत. एका बाजूला ४९ लोक जखमी आणि सात जण ठार, असे भीषण स्वरूप असलेला हा अपघात, कुठल्याही परिस्थितीत चालकाला सहानुभूती व्यक्त करण्यासाठीसारखा नाही! यांत्रिक बिघाड जर एखाद्या बस मध्ये झाला असेल तर, त्याची कारणे काय हे शोधून काढलं पाहिजे. जर, असं असेल तर सदोष मनुष्यवधाचा एकूणच ती बस ज्या डेपोची होती, त्या डेपोतील सर्व तांत्रिक अधिकारी कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण, बस मधील बिघाड हा तांत्रिक असेल तर तो अचानक झालेला निश्चित नाही. तो काही काळापासून असेल. त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यास ते तसे स्पष्ट व्हावे. जर, चालक याचीच ती चूक असेल तर, निश्चितपणे ती काहीतरी भणंग अवस्थेतून झालेली असावी. परंतु, कुठल्याही परिस्थितीत ती चूक सामान्य लोकांची नाही. मृत पावलेल्या सात जणांपैकी पाच जण एका विशिष्ट धर्माचे आहेत. त्यामुळे त्या अपघाताकडे पाहण्याची दृष्टी ज्या पद्धतीने सौम्य होऊ पहते आहे, ते अतिशय निंदनीय आहे. माणूस हाडामासाचा जिवंत असणारा, तो मेला त्याचे दुःख मानवी समाजाला मोठ्या प्रमाणात असायला हवे. परंतु, अशा भीषण मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीलाच जर आपण सहानुभूतीच्या लाटेत नेत असू, तर, अशा प्रकारची गंभीर बाब अन्य कोणतीही असू शकत नाही. अशा चुका कोणत्याही माध्यमांनी करायला नको. कुर्ला हे कसं पाहिलं तर मुंबईचे अतिशय मध्यवर्ती स्टेशन आहे. या स्टेशनवरून हार्बर ही स्वतंत्र लाइन जाते. सेंट्रल लाईन तर आहेच! पण, त्याचबरोबर येथील बस डेपो हा वेस्टर्न आणि नवी मुंबई अशा दोघांना जोडणारा असल्यामुळे, कुर्ला बस डेपो हा नेहमीच गर्दीचा राहिलेला आहे. त्यामुळे, या ठिकाणी प्रवाशांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, हा विभाग लोकसंख्येच्या दृष्टीने दाट लोकवस्तीचाही आहे. चालकाने जो अपघात केला आहे, तो थेट वस्तीमध्ये बस घालून केला आहे. तो झाला असला तरी, तो अपघात केला आहे, असं म्हणणं जास्त जबाबदारीचे ठरेल. कारण या अपघातात मृत्यू पावलेले यांच्या विषयी अधिक माहिती आणि सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी चालक असलेल्या संजय मोरे संदर्भात जी रकानेच्या रकाने माध्यमातून भरून काढत आहेत, ती एका विशिष्ट दृष्टिकोनाची द्योतक आहेत. मानवी समाजाचा विसंवाद अशा पद्धतीने अपघाताच्या माध्यमातून करणारी कोणतीही गोष्ट निषेधार्य आहे. चालकाने केलेल्या अपघाताची तांत्रिक माहिती जरी अजून समोर यायची असली तरी, माध्यमांचा दृष्टीकोन ज्या पद्धतीने पुढे जातो आहे, ते पाहता ते अधिक बेजबाबदारपणे या प्रकरणाकडे पाहत आहेत. म्हणूनच या अपघातात ठार झालेल्या लोकांना आधी मदत होईल, ही तातडीची आणि गंभीर बाब असताना माध्यमं मात्र, चालकाविषयी सहानुभूती व्यक्त करणारे आणि त्याच्या कुटुंबाच्या मुलाखती प्रसिद्ध करून, या अपघाताच्या दुःखितांच्या जीवनात मीठ चोळत आहेत, असा याचा अर्थ होतो.
COMMENTS