कोणता झेंडा घेऊ हाती ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोणता झेंडा घेऊ हाती ?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने आपला तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अपक्ष आणि छोटया पक्षांचे आमदार सहाव्या खासद

परीक्षांचा सावळा गोंधळ
राजकीय वादळाचा अर्थ!
भारत-बांगलादेशातील तणाव !

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने आपला तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अपक्ष आणि छोटया पक्षांचे आमदार सहाव्या खासदारांचे भवितव्य ठरवणार असल्याचे एव्हाणा स्पष्ट झाले आहे. मात्र, 13 अपक्ष आमदार 16 छोटया पक्षाचे आमदार कोणत्या पक्षाला मतदान करावे, या विवंचनेत दिसून येत आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला जर मतदान केले तर, मंत्रिपद, महामंडळ यासारख्या अनेक पदांवर वर्णी लावता येऊ शकेल. मात्र दुसरीकडे भाजपविरोधात पंगा घेतला, तर आयकर, सीबीआय, ईडी सारख्या चौकशीचा फेरा मागे लागू शकतो, त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती असाच सवाल अपक्ष आणि छोटया पक्षाचे आमदार विचारत तर नाही ना ?
बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत, त्या मतांकडे शिवसेना आणि भाजपचा देखील डोळा आहे. मात्र बविआ कुणाला मतदान करते, यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे. या आमदारांला शिवसेना त्यांच्या मतदारसंघात मोठया प्रमाणात विकासनिधी देण्यासोबतच, महामंडळ, मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यास मंत्रिपद, यासह अनेक ऑफर देऊन झाल्या असतील. तर दुसरीकडे राज्यात भाजपची सत्ता नसली, तरी केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजप देखील त्यांना मोठया प्रमाणात ऑफर देऊ शकतो. याचबरोबर एमआयएम, समाजवादी, मनसे या सर्वच पक्षांचे मतदान कुणाला होते, यावर बरेच राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही, मात्र यानिमित्ताने आमदारांची पळवापळव होणार असून, यातील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मोठा भाव येणार हे निश्‍चित. यानिमित्ताने प्रत्येक पक्ष आपली ताकद अजमावून पाहणार यात शंका नाही. राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ते सर्व शक्ती पणाला लावून आपल्या दोन्ही उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार यात शंका नाही. मात्र दुसरीकडे भाजप देखील स्वस्थ बसणार नाही. कारण भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला, याचाच अर्थ भाजपने गणिताची जुळवाजुळव केल्यामुळेच आपला तिसरा उमेदवार दिला आहे.
भाजपकडून पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारांपैकी भाजपचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षांना मते दाखवावी लागतात. त्यामुळे सर्व आमदारांना ’व्हिप’ लागू केला जातो. याचा अर्थ सर्व आमदारांना पक्षाचा आदेश पाळणे अनिवार्य असते. अन्यथा त्या सदस्यावर पक्षाकडून कारवाई केली जाऊ शकते. परंतु अपक्ष आमदारांना हा ’व्हिप’ लागू होत नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचे महत्व या निवडणुकीत अधिक वाढले आहे. ही मते खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक पाहता राज्यसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतरच कुणाची मते फुटली, आणि कुणी कुणाला मतदान केले, हे स्पष्ट होणार आहे. परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून काँग्रेस पक्षांतर्गत आणि बाहेरुनही त्यांच्यावर टीका होते आहे. पण भाजपने जी तीन नावे महाराष्ट्रातून मैदानात उतरवली आहेत तीसुद्धा पाहण्यासारखी आहेत. पीयूष गोयल तर केंद्रात मंत्री आहेत आणि जुने भाजपा नेते आहेत. पण बाकीचे दोन, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, हे दोघेही मूळचे भाजपाचे नाहीत. त्यामुळे गेल्या काही काळापासून महाराष्ट्र भाजपावर जी टीका होते आहे, तीच चर्चा यानिमित्तानं पुन्हा होते आहे. भाजपात बाहेरुन आलेल्यांचं महत्वं एवढं का वाढलं आहे? अमरावतीचे अनिल बोंडे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेलं नाव आहे. पण शिवसेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरु करणारे बोंडे हे 2014 मध्ये भाजपात आले आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे बनले. राज्यसभेची सहावी जागा ज्यांनी चुरशीची केली आहे ते धनंजय महाडिक हेसुद्धा मूळ भाजपा केडरचे नव्हेत. शिवसेना ते राष्ट्रवादी ते भाजपा असा त्यांचा प्रवास आहे. 2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यापासून भाजपातलं इनकमिंग वाढले आहे.

COMMENTS