कर्जत/प्रतिनिधी ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे अहमदनगर जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा कर्जत येथे दौरा होत असताना स्वतःला व्हिजनरी समज
कर्जत/प्रतिनिधी ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे अहमदनगर जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा कर्जत येथे दौरा होत असताना स्वतःला व्हिजनरी समजणारे कर्जत जामखेडचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पोस्टरबाजी करत नकारात्मक प्रसिद्धी मिळविण्याचा केलेला खटाटोपाची खमंग चर्चा मतदारसंघात होत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी करून कर्जत जामखेडच्या जनतेने इशारा दिला आहे. जिल्हा बॅकेतील सत्ता परिवर्तन आणि कर्जत येथील संचालक निवडीतील नाट्यामुळे कर्जत- जामखेडचे आमदार अस्वस्थ आहेत कारण दोन्ही घटनांमध्ये त्यांच्या पक्षाच्याच निकटवर्तीयांकडून त्यांना शह देण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षात आमदारांचे नेतृत्व स्विकारण्यास कार्यकर्ते तयार नाहीत असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे असे वाटत असल्याचे भाजपाचे कर्जत तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड व सरचिटणीस शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा चमत्कारिक गोष्टी करत असतो. नागालँडमध्ये मुख्यमंत्र्याला पाठिंबा पण भाजपला नाही असे चमत्कारिक दावे ते करत असतात. तसाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यामध्येही घडला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे कर्जतचे आहेत आणि त्या मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत. जे स्वतःला पवार साहेबांचे वैचारिक वारसदार समजतात ? आणि त्यांचा पक्ष त्यांना भावी मुख्यमंत्री ? 2019 च्या विधानसभेत जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष करतात, यात किती तथ्य आहे? याचा प्रत्यय त्यांच्याच युवकच्या जिल्हाध्यक्षाने त्यांचा राजीनामा मागून उघड केले आहे. जिल्हाध्यक्ष फाळके यांचा राजीनामा मागण्याची खेळी हा पोरकटपणाचा कळसच म्हणावा लागेल. परंतु संघटनेत कनिष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकार्याचा राजीनामा मागतात आणि वैचारिक वारसदार म्हणवणार्या आमदारांकडून याबाबत ब्र शब्दही उच्चारला जात नाही हे अधिकच चमत्कारिकच म्हणावे लागेल.फाळके हे साहेबांचे निकटवर्तीय म्हणवले जातात, निदान तसे सांगितले तरी जाते. त्यांचा राजीनामा मागणे म्हणजे एक तर त्यांची उपयुक्तता संपली असे वाटावे. इतक्या अपमानजनक पद्धतीने राजीनामा मागणे म्हणजे संघटनेत सर्व आलबेल नसल्याचे दिसते. आ. रोहित पवार यांचे चाललेले राजकीय अध:पतन हा एकंदरीत सामाजिक जाणिवेच्या अध:पतनाचाच भाग आहे. त्यांचा राजकीय दर्जा ढासळत चाललेला दिसत आहे. स्वतःच्या संघटनेत इतका सावळागोंधळ असताना इतर पक्षातील लोकांना सल्ला देणे त्यांनी बंद करावे. रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांचा मान आणि जेष्ठांचा सन्मान याची काळजी करू नये, तो आमचा आम्ही करूच. पण तुमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची हकालपट्टीची मागणी आमदार, खासदाराऐवजी धाकट्या जिल्हाध्यक्षांना करण्यास भाग पाडणे हे कितपत संयुक्तिक असल्याचा सवाल त्यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेत्याचा बळी दिला जातोय – स्वतःच्याच मतदार संघातील ज्येष्ठ सहकार्याचा अपमान कनिष्ठ सहकार्यांकडून का करवला? किंवा राष्ट्रवादीतील पवार घराण्यात सुरु असलेल्या सुप्त संघर्षात एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यास भारतीय जनता पार्टीला किंचितही स्वारस्य नाही. परंतु आमदार रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीच्या मंचावरील मान- अपमानाच्या कल्पना ज्या पद्धतीने रंगवत आहेत ते पाहता या सर्व गोष्टीची दखल घ्यावी लागली. तुमचे वैफल्य तुम्हाला लखलाभ. त्यामुळे त्रिशंकू अवस्थेतील जिल्हाध्यक्ष यांची मात्र गोची झाली असल्याचे पप्पूशेठ धोदाड व शेखर खरमरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS