विष्णुपुरी येथील पुलाच्या एका भागाची रिटेनिंग वॉल (आधारभिंत) ढासळल्याच्या घटनेची संबंधित विभागाने गंभीर दखल घेऊन तांत्रिक व सखोल चौकशी करावी, अशी

विष्णुपुरी येथील पुलाच्या एका भागाची रिटेनिंग वॉल (आधारभिंत) ढासळल्याच्या घटनेची संबंधित विभागाने गंभीर दखल घेऊन तांत्रिक व सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे.
या घटनेमागील नेमके कारण शोधून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी, तसेच गुणवत्तेच्या सर्व बाबींची निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. भारतमाला योजनेअंतर्गत देशभरात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जात असून, विष्णुपुरी पुलाच्या घटनेचीही तितक्याच गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासणीत बांधकामातील त्रुटी, निष्काळजीपणा किंवा दर्जाबाबत कोणतीही उणीव आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांची सुरक्षितता या बाबींशी कोणतीही तडजोड होऊ नये. संबंधित यंत्रणांनी या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहून योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे.

COMMENTS