आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कंधार येथील श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानाच्या सुमारे 300 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या दिंडीचे नांदेड

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कंधार येथील श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानाच्या सुमारे 300 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या दिंडीचे नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील माळेगाव (यात्रा) येथे शुक्रवारी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना युवानेते प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, श्री साधू महाराज कंधारकर संस्थानाच्या दिंडीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नेहमीच तत्पर असतात. वारकरी संप्रदायाची ही ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी आवश्यक ते सहकार्य भविष्यातही सुरू राहील. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी टाळ, मृदंग, वीणा आणि भगवा ध्वज हातात घेऊन ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड नामघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. वारकर्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तिभाव यामुळे माळेगाव परिसराला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्वागत सोहळ्यास दिंडीचे प्रमुख ज्ञानोबा माऊली कंधारकर, ह.भ.प. एकनाथ महाराज, भास्कर महाराज कंधारकर, युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, लोहा नगर परिषदेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, नगरसेवक केशवराव मुकदम, भास्कर पवार, हरिभाऊ चव्हाण, शामआण्णा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य हंसराज पाटील, अर्जुन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने वारकरी भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. कै. गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या काळापासून गेल्या सुमारे 60 वर्षांपासून कंधार येथून पंढरपूरकडे जाणार्या श्री साधू महाराज कंधारकर संस्थानाच्या दिंडीचे स्वागत करण्याची परंपरा चिखलीकर कुटुंबीयांकडून जपली जात आहे. स्वागतानंतर वारकर्यांना स्नेहभोजनाचा प्रसाद देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत सर्व वारकर्यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दिंडीला नांदेड-लातूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भक्तिरस, हरिनामाचा अखंड गजर आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते.

COMMENTS