शिवसेनेतून फुटलेल्या गद्दारांना माफी नाही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेतून फुटलेल्या गद्दारांना माफी नाही…

जिल्हा प्रमुख प्रा. गाडेंचा इशारा, नगरला झाला जोरदार निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना कधीच माफी दिली जाणार नाही. पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत नगर शहर

 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ
आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवा – स्नेहलता कोल्हे
Sangmaner : संगमनेर मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना कधीच माफी दिली जाणार नाही. पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत नगर शहर व जिल्हा शिवसेना असून, ते जो निर्णय घेतील, तो पाळताना आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मंगळवारी येथे केले. दरम्यान, भाजप कूटनीतीने शिवसेना संपवू पाहात असून एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच आहे. पण आतापर्यंतच्या इतिहास पाहता शिवसेना जेव्हा फुटली, त्यानंतर ती अधिक जोमाने वाढत गेली, असा टोलाही प्रा. गाडे यांनी लगावला.
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहर व दक्षिण नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व नगर तालुक्यातील शिवसेनेचा मेळावा बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये झाला. यावेळी उपस्थित सर्वांनी हात वर करून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा व्यक्त करताना त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणीताई शेंडगे, मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, महिला आघाडी प्रमुख आशा निंबाळकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, संदेश कार्ले, श़रद झोडगे, बाळासाहेब दुतारे, राजेंद्र भगत, रफीक शेख़, आनंद लहामगे, रवी वाकळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फडणवीस कधी हसले का?
शिवसेना दोन्ही काँग्रेससमवेत गेल्याने व हिंदुत्व सोडल्याने बाहेर पडल्याचे एकनाथ शिंदेंसह बाकीचे आमदार सांगत असले तरी भाजपने दाखवलेल्या इडीच्या भीतीने त्यांनी पक्ष सोडल्याचा दावा करून प्रा. गाडे म्हणाले, आम्ही दोन्ही काँग्रेससमवेत गेलो, तर तुम्ही (भाजप) पहाटे अजित दादाच्या राष्ट्रवादीसमवेत शपथ घेतली, तेव्हा तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते ? भाजपनेच या 40 गद्दारांना इडीला सामोरे जाण्याची भीती घातली गेली आहे. मागील अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर कधी हास्य पाहिले का कोणी? मी कधी एकदा मुख्यमंत्री होईल, असे त्यांना झाले आहे व त्यामुळेच त्यांनी शिवसेनेतील गद्दारांना इडीची भीती दाखवली आहे, असा घणाघातही प्रा. गाडे यांनी केला. छगन भुजबळांनी 1992-93मध्ये 13जणांना घेऊन बंड केले. त्यातील 12जणांची नावे आजही आठवत नाहीत व ते सगळे गुरे वळायला गेले आहेत. केवळ शरद पवारांनी भुजबळांना ताकद दिल्याने ते राजकारणात राहिले. नारायण राणेही सातजण घेऊन गेले होते. पण बाकी सहाजणांची नावे सांगता येत नाही. राज ठाकरेही बाहेर पडल्यावर शिवसेनेवर फारसा फरक पडला नाही. भुजबळांना तर सामान्य शिवसैनिक नांदगावकरांनी पाडले, तर राणे दोनवेळा पडले व त्यांचा मुलगाही पडला. त्यामुळे आता बाहेर पडलेल्यांपैकी कितीजण पुढची टर्म निवडून येतील, ते पाहूच. एकनाथ शिंदे एखादी टर्म काढतील, पण पुढे सामान्य शिवसैनिक त्यांना अवघड करून टाकतील, असा दावा करून प्रा. गाडे म्हणाले, शिवसेनेचा जन्मच प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे आताचा संघर्ष आम्हाला नवीन नाही व यातून आम्ही पुन्हा उभारून वर येऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रस्थापित घराण्यांतील व्यक्तींना आपल्याकडे घेऊन भाजपने जास्त जागा जिंकल्या आहेत. पण त्यासाठीही या सर्वांना इडीची भीती दाखवली आहे, असा दावाही त्यांनी केला.

मोदी तसे जाहीर सांगतील?
हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढला होता. तरीही, बाबरी मशीद पडली तेव्हा भाजप नेत्यांनी जबाबदारी झटकली व हात वर केल्यावर शिवसैनिकांनी ती पाडली असेल तर मला त्याचा अभिमान असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनीच जाहीर केले होते, असे सांगून प्रा. गाडे म्हणाले, आता दोन्ही काँग्रेससमवेत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे भाजपवाले म्हणत असले तरी विधान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी कालही हिंदू होतो, आजही आहे व उद्याही असेल, असे जाहीर भाष्य केले होते व ते विधानभवनाच्या पटलावरही नोंदले गेले आहे. असे जाहीर भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेत करण्याची हिंमत आहे काय? असा सवाल करून प्रा. गाडे म्हणाले, लोकसभेत मी हिंदू आहे, असे मोदी बोलले तर महिनाभरात त्यांचे पद जाईल, याची भीती त्यांना आहे. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका करून प्रा. गाडे म्हणाले, 1990पासून शिवसेनेला संपवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही काँग्रेस आजही आमचे शत्रूच आहेत. पण मित्र म्हणवणारा घरभेदी भाजप अधिक घातक आहे. त्यामुळे कपटी मित्रापेक्षा राष्ट्रवादीसारखा दिलदार शत्रू बरा, म्हणून शिवसेना दोन्ही काँग्रेससमवेत गेली, असेही प्रा. गाडे म्हणाले. शिवसेनेतून बाहेर पडलेले अजूनही आम्ही सेनेत व उद्धव ठाकरेंसमवेत असल्याचे सांगत आहेत. पण आम्ही शिवसेनेत नाही, असे त्यांनी म्हटले असते तर त्यांना शिवसैनिकांचा उद्रेक दिसला असता, असा दावाही त्यांनी केला.
उद्धव दुसुंग यांनी प्रास्ताविक केले. या गद्दारांना शिवसैनिकांनीच नेते केले आहे. पण आता ते आपल्यातून गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांतून नवे नेते आपण घडवू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आशा निंबाळकर म्हणाल्या, सत्तेच्या लालसेपायी काही कुत्रे बाहेर पडले, पण दोन नंबरच्या धंदेवाल्या नेत्यांना पाठिंबा देणे सेनेच्या रक्तात नाही. एवढे सगळे घडूनही सोशल मिडियात ठाकरेंविरोधात कॉमेंटस नाहीत. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केेले. संदेश कार्ले म्हणाले, शिवसेना फोडणारांविषयी सामान्य माणसात संतप्त भावना आहेत. काहीजण तर पिस्तुल द्या, महाराष्ट्रात आले तर यातील एक-दोनजण तरी मारतोच, अशी भावना मांडतात. त्यामुळे हे गद्दार पुढच्या निवडणुकीत लोकांसमोर जाऊच शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. शहर प्रमुख संभाजी कदम यांनी कोरोना काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांचे जगभर नाव झाले. गद्दारांनी या सूर्याला ग्रहण लावले आहे, पण ते निघून जाईल व पक्ष प्रमुख पुन्हा तळपतील, असा विश्‍वास व्यक्त केला. फुलसौंदर म्हणाले, नामर्दाला मर्द करणारा हा पक्ष असून, अशी संकटे निघून जातील. पण भाजप हाच घरातील शत्रू असल्याने आम्ही पाय रोवून त्याच्याविरुद्ध उभे राहू, असा दावा केला. युवा सेना प्रमुख विक्रम राठोड म्हणाले, एवढा मोठा प्रहार झाला असतानाही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा संयम व ठाम निश्‍चय आम्हा शिवसैनिकांना ताकद देऊन जाणारा आहे, असे त्यांनी सांगितले. प्रकाश कुलट यांनी सूत्रसंचालन केले व दिलीप सातपुते यांनी आभार मानले.

शिंदेंची शेपटीच भाजपने कापली
भाजपची शिवसेना संपवण्याबाबत 1990मध्ये जी भूमिका होती, तीच आजही आहे व त्यामुळेच शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदेंना आता त्यांनी बदनाम करणे सुरू केले आहे. शिवसेनेतून फुटून नेता बनू पाहणार्‍या शिंदेंना दारू पाजून बोलायला लावले. पाण्यातून पाजल्याचे त्यांनीच कबूल केले. पण आता शिंदेंचा आदर राहिला का? भाजपने कूटनीतीने नेता बनू पाहणार्‍या शिंदेंचे शेपूटच कापून टाकले आहे, असा दावाही प्रा. गाडे यांनी केला.

शेंडगे ताई…त्या शिंदेच्या नादी लागू नका…
नगर शहरात दोन्ही काँग्रेसने प्रस्थापित कुटुंबातील महापौर केले. पण शिवसेनेने भगवान फुलसौंदर, शीलाताई शिंदे, सुरेखा कदम व आता रोहिणीताई शेंडगे या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना महापौर केले. त्यामुळे शेंडगे ताई, तुम्ही त्या शिंदेच्या (एकनाथ शिंदे) नादी लागू नका. त्याच्याकडे असलेले नगरविकास खाते आता सुभाष देसाईंकडे आले आहे व येत्या दोन-तीन दिवसात आपण त्यांच्याकडे जाऊन महापालिकेचे प्रश्‍न सोडवून घेऊ, अशी ग्वाही प्रा. शिंदे यांनी दिली.

COMMENTS